Search This Blog

Sunday, May 3, 2020

अनोळखी हे प्रेम - Part 5

       
     
             अभयला असं अचानक आलेला पाहून ऋतिकाला पहिल्यांदा काहीच सुचलं नाही. पण नंतर तो आलाय हेच खूप होतं  तिला. आपण अभयशी फक्त ह्या एक दोन भेटीत कसंकाय कनेक्ट होऊ शकतो ह्याचं तिला आश्चर्य वाटत होतं. ना ओळख ना पाळख किंवा आधी कधी बघितलंही नाही ह्याला कधी. मग याच्यासाठीच एवढी बेचैनी का?  का आपण त्याच्यासाठी एवढं करतोय? त्या दिवशी त्याचा ऍक्सीडेन्ट झालेला तर आपल्या जीवाची नुसती घालमेल चालू होती. आणि तोसुद्धा  ओळख असल्यासारखा वागत होता. खूप जुनी ओळख असल्यासारखा. जसा काही माझा जिवलग मित्रच आहे. पण हा कसा असेल माझा जिवलग मित्र. एकच होता माझा लहानपणीच जिवलग. विचार करता करता ऋतिकाला आपल्या लहानपणीच्या बेस्ट फ्रेंडची आठवण झाली. आयुष्याच्या धावपळीमध्ये ते लहानपणीचे सुखाचे क्षण कसे मुठीत धरलेल्या वाळूप्रमाणे निसटून गेले होते. परत कधी हातात न येण्यासाठीच. 

          'म्याऊ.  हो म्याऊच. आमच्या बाजूच्या बंगल्यात राहायचा. एकदम श्रीमंत. पण त्या श्रीमंतीचं काय नव्हतं त्याला एवढं.  माझा बालपणीचा जिवलग मित्र. मीच नाव ठेवलं होतं त्याचं. सारखा आपला मांजरींसोबत खेळात असायचा. म्हणून मीच लाडाने त्याचं नाव ठेवून दिलं होत. त्याला ते आवडायचं नाही. बोलायचा, काय मुलींसारखं नाव ठेवलंय माझं. पण मी त्याला त्याच नावाने हाक मारायचे. मग रागाने यायचा माझ्या मागे मला मारायला. पण नंतर त्याला पण सवय झाली त्याची. मग मी ह्या नावाने हाक मारल्याशिवाय तो ऐकायचा पण नाही. आणि हो त्याने काय नाव ठेवलं होतं माझं. चिऊ. हा तेच. तो म्याऊ आणि मी चिऊ. मॅचिंग नाव शोधून काढलं त्याने माझ्यासाठी. काय तर म्हणे मी चिमणीसारखी सारखं चिवचिव करत असते. कसे होतो ना आम्ही. एकदम निरागस. निःस्वार्थ मैत्री. त्याने कधीच मला एकटीला सोडून साधं चॉकलेट देखील खाल्लं नाही. मी आल्याशिवाय ते कव्हर सुद्धा काढायचा नाही तो. मी आले कि आधी मला देऊन मगच तो खायचा. मीसुद्धा आईने दिलेला शिरा आधी त्याला भरवूनच खायचे मी. प्रत्येक गोष्ट शेअरिंगने.

               आम्ही नेहमी सोबत असायचो. एकत्र शाळेत जायचो. एकत्र यायचो. शाळेत जायला मी रडायला लागले मला समजवायला यायचा आणि इवल्याश्या हाताने माझ्या इवल्याश्या डोळ्यातून आलेलं पाणी पुसायचा. मग काय जादूच. म्याऊसोबत चिऊ शाळॆत. मी एक वेळ आई बाबांचं ऐकायचे नाही. पण म्याऊ बोलला कि स्वारी तयार. होताच तसा तो. माझा जिवलग.

                पण नंतर त्याच्या आईवडिलांच्या ऍक्सीडेन्ट नंतर तो दिसलाच नाही. त्याच्या बंगल्यातपण नाही दिसला कधी. कोणीच राहत नव्हतं त्यांनतर तिथे.  कुठे गायब झाला अचानक काय माहित. दिसलाच नाही अजूनपर्यंत. किती शोधलं असेल त्याला आपण. पण कुठेच पत्ता नाही लागला आपल्यलाला. इव्हन सोशल साईट्सवर पण ट्राय केलं. पण तरीसुद्धा नाही भेटला कुठे. कसं भेटणार आपल्याला त्याचं खरं नाव तरी माहिती होतं का? सांगितलं होतं त्याने तेव्हा. पण कुठे लक्षात राहतंय एवढं. आपण तर म्याऊच बोलायचो त्याला. आता कुठे असेल तो ? काय करत असेल? मला ओळखेल का नाही भेटल्यावर, काय माहित? एवढेशे होतो आपण तेव्हा. गोबऱ्या गालाचा म्याऊ आता कसा दिसत असेल? आता पण तसेच असतील का त्याचे ते गोबरे गाल? छे छे! नसतील. आता तो मोठा झाला असेल. मस्त पेर्सनालिटी असेल त्याची आता. पण? असेल कुठे तो? म्याऊ....' विचार करत असताना ऋतिकाच्या डोळ्यात टचकन पाणी आलं म्याऊच्या आठवणीने. तिच्या लहानपणीच्या जिवलग मित्राची तिला आज अचानक आठवण आली होती. तिचा लहानपणीच म्याऊ. इतके दिवस तिला तो विस्मरणात गेला होता. १० वर्षं झाली होती त्याला तसा गायब होऊन. तो तसा गेल्यानंतर थोडे दिवस ऋतिका खूप रडली होती तिच्या लाड्क्या म्याऊसाठी. पण नंतर जशी जशी ती मोठी होत गेली तशी इतर मित्रमैत्रिणींच्या गराड्यात ती हा म्याऊ विसरून गेली होती. या सगळ्या चांदण्यांत तिचा चंद्र कुठेतरी हरवला होता. कुठंतरी धुक्यांत विरून गेला होता.

           डोळ्यातलं पाणी पुसता पुसता तिला आणखी रडायला येत होतं. का आपण त्याला असं विसरून गेलो, म्हणून स्वतःलाच प्रश्न विचारत होती. एकच तर मित्र होता आपला तो, बाकी सगळे मतलबी आहेत. सगळे त्यांच्या कसल्या ना कसल्या फायद्यासाठी  आपल्याशी मैत्री करून आहेत. म्याऊला कसलाच स्वार्थ नव्हता. एकदा लहानपणी शाळेतून येत असताना तिची चप्पल कुणीतरी चोरली होती. येताना ऊन खूप होतं. तिचे पाय उन्हाने भाजत होते. हे बघून म्याऊने आपली बुटं काढून तिला घालायला दिली आणि स्वतः अनवाणी चालायला लागला. आणि त्याला ऊन्हाचा त्रास होतोय हे बघून आपण त्याची बुटं परत त्याच्या पायात घातली. परत अनवाणी चालायला लागलो. हे त्याला बघवलं नाही. मी बुटं घालत नाही आणि त्याच्याकडून हा त्रास बघवत नाही. करणार काय? पण ह्याने त्यावर उपाय शोधलाच. पट्ठ्याने मला पाठकुळी घेतलं आणि चालू लागला. प्रॉब्लेमच सॉल्व्हड. हे आठवून ऋतिका खुद्कन हसली. एवढ्याश्या म्याऊला मैत्री कळत होती तेव्हा आणि आपण ह्याच म्याऊला पूर्णपणे  विसरून गेलो होतो, म्हणून तिला तेवढंच दुःखही झालं. तिला स्वतःचाच राग आला.

             लहानपणीची मैत्री हि कधीच विस्मरणात जात नाही. कधी ना कधी ती आठ्वतेच. ऋतिकाला सुद्धा तिचा लहानपणीचा म्याऊ अचानक आठवला होता. पण त्याला शोधणार कसं? इतक्या दिवसांत नाही भेटला कधीच तो. कदाचित तोही आपल्यासारखाच  विसरला असेल का मला? असा ऋतिकाला प्रश्न पडला. नाही नाही. तो नाही विसरू शकणार आपल्याला. कदाचित विसरलादेखील असेल. नाहीतर एव्हाना भेटला असता तो परत मला. ऋतिकाचं मन खट्टू झालं. तिला काहीतरी आठवलं. अचानकच तिला अभयची आठवण झाली. कदाचित आपला म्याऊ हा अभय तर नसावा. पण असं कसं शक्य आहे? त्याने ओळखलं असतं मला लगेच मी त्याची चिऊ आहे म्हणून. आणि तसंही म्याऊ हा खूप श्रीमंत घरातला होता आणि हा अभय अगदी साधाच वाटतोय. त्याची श्रीमंतीचं जाऊ दे. पण आपला म्याऊ मैत्रीमध्ये जास्त श्रीमंत होता. तो त्याच्या जवळपासही नाहीय.  म्याऊसारखा  एकही गुण नाहीय अभयकडे. छे छे. . . काय विचार करतोय आपण. आपला म्याऊ कुठे आणि हा अभय कुठे. पण मग अभयला पाहताच आपलं हृदय एवढं धडधडतं का? आणि त्याला बघूनच ते शांत होतं. तो जवळपास असला कि एक अनामिक ओढ खेचत असते मला सारखी त्याच्याकडे. हे नक्की काय आहे? काहीही असलं तर हा अभय आपला म्याऊ असू शकत नाही. आणि जर हाच आपला म्याऊ असला तर. तर काय? त्यानेच आधी आपल्याला ओळखलं असतं. अभयकडे बघून जराही वाटत नाही कि तो म्याऊ आहे म्हणून. नसेलच तो म्याऊ.

               ऋतिकाचं मन म्याऊच्या आठवणीत एवढं भिजलं होतं कि क्षणभर तिला हा कालपरवा अचानक भेटलेला अभयच तिचा म्याऊ वाटून गेला. अभयच म्याऊ आहे आहे असं तिचं अंतर्मन तिला सांगत होतं. पण त्याची पुष्टी तिला होत नव्हती. म्याऊबद्दल तिला खास आपुलकी होती पण अभयबद्दलची ओढही तिला गप्प बसू देत नव्हती. नक्की काय ते तिला कळत नव्हतं. म्याऊ कि अभय आणि म्याऊच अभय असं दुहेरी परिणाम तिच्या मनात उमटत होतं. शेवटी तिने गणपती बाप्पाला हात जोडून म्याऊला लवकरात लवकर आपल्याला भेटवायला सांगितले. आता गणपती बाप्पाच तिला ह्यातून बाहेर काढू शकत होते. इतकी वर्षे आपण त्याला विसरून गेलो होतो पण आता म्याऊची आठवण तिला अस्वस्थ करत होती आणि इकडे अभयबद्दल तिची अनामिक ओढ तिच्या मनात घर करत होती.  बात उस पुराने रिश्ते कि थी, जो इस दौर में पिछे छुट गया था. जैसे कि कोई नायाब हिरा फिरसे कोयले कि खान मे दफन हुआ हो. और उसे वापस ढुंढना हो. 



               दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी गाडीने एका प्रशस्त गेटमधून आत प्रवेश केला आणि आलिशान बंगल्याजवळ येऊन थांबली. तसे अभय आणि निखिल गाडीमधून खाली उतरले. निखिल तर आ वासून पाहतच राहिला.  बंगला नव्हताच तो राजमहाल होता. एखाद्या महागड्या मॅगझिनच्या मुखपृष्ठावर दाखवतात तसा. नेत्रदीपक. सहज नजरेत मावतच नव्हता. मान पूर्ण उजवीकडून फिरून डावीकडे वळली तरी संपत नव्हता एवढा आलिशान बंगला होता तो. पांढऱ्या रंगात असलेला तो महाल पाहून निखिलला वाटलं हा तो अमेरिकेचा व्हाईट हाऊस तर नसेल ना. त्याचा तसा आ बघून अभय हसला. म्हणाला,
"अरे निख्या, तोंड तरी बंद कर कि रे. का गिळून टाकतो बंगला एवढा मोठा आ वासून" असं म्हणून अभय आणखी हसायला लागला. तसा निखिल म्हणाला,
"काय रे अभ्या कोणाचं घर आहे हे? कुणाच्या बंगल्याजवळ घेऊन आलाय तू बाबा?"

"अरे हो. तुला सांगितलं होतं ना सकाळी आपण घरी चाललोय म्हणून. विसरलास का? मग घरीच आलोय ना आपण आता." अभयने सांगितले.

"काय बोलतोस अभ्या? हे तुझं घर आहे ? एवढा मोठा बंगला आहे तुझा. बंगला सोड राजमहाल आहे हा. आपण तर जिंदगीत कधी एवढा मोठा बंगला नाही बघितला कधी. साल्या त्या आमदाराचा पण बंगला एवढा मोठा नाहीय"

"हो माझं काय म्हणतोय साल्या आपलं म्हण. मी आणि तू काय वेगळा नाहीयेस. जो मेरा है वो तेरा है और व तेरा है वो मेरा. काय बोलतोस."

"साल्या ते सगळं जाऊ दे. एवढा करोडपती असून आणि एवढा मोठा बंगला राहायला असताना तू तिकडे एवढ्याश्या खोलीत कसं काय राहिलास रे? धन्य आहेस भाऊ तू." निखिल त्याला हात जोडत म्हणाला.

"हा ते सगळं बघू नंतर. आता आत येणारेस कि इथेच उभं राहून आणखी आ वासनारेस." अभय त्याच्या खांद्यावर हात टाकत म्हणाला.

"हा चल"

         निखिल तसेच डोळे मोठे करत तो महाल पहात होता. तिथली शानोशौकत बघत होता. आणि तसतसं मनातल्या मनात अभयबद्दल त्याचं मैत्रिप्रेम आणखी वाढत होतं. ते दोघे चालत चालत दारापाशी आले. पाठीमागून बॉबी अंकल त्यांच्या बॅगा सांभाळत येत होते. तिथं येताच एक तेजस्वी आणि खानदानी रुबाब पण तितकाच साधेपणा  असलेली वयस्कर स्त्री हातात निरंजनाचं ताट घेऊन त्यांच्या स्वागताला उभी होती. सोबत इतर नोकर चाकर होतेच. ती स्त्री आणि इतर जण अभयकडे कौतुकाने पाहत होते. त्या स्त्रीला पाहताच अभय स्मितहास्य करून तिच्या चरणी झुकला.

"आजी"

"आयुष्यमान भव् यशस्वी भाव्" गोड हसून त्यांनी अभयला आशीर्वाद दिला.

त्यांचा आशीर्वाद घेऊन अभयला बरं वाटलं. त्याचं बघून निखिलपण त्यांचा आशीर्वाद घ्यायला झुकला.

"आजी तू कशाला आलीस खाली बरं नसताना तुला. मी आलोच असतो ना तुला भेटायला तुझ्या खोलीत. आधीच तुझी तब्येत ठीक नाहीय. काल जसं बॉबी अंकल ने फोन करून कळवलं तुझी तब्येत ठीक नाहीय ते, तसं  मी आलो लगेच आज. आता नको काळजी करुस. मी आलोय तुझ्या जवळ आता." अभय आजीच्या जवळ जात म्हणाला.

"हो अभय. लेकरा तुला बघून खूप बरं वाटलं बघ. कालचा आजार कुठच्या कुठं पळाला बघ आज तुला बघितलं कि" आजी म्हणाली," चल दमला असशील प्रवासाने खूप. आत ये."

निखिलकडे पाहत आजी म्हणाली,
"तू निखिल ना? अभय सांगत असतो खूप तुझ्याबद्दल. ये बाळा आत." आजी म्हणाली आणि अभय, निखिल एकत्र आत आले. आता ह्याने कधी सांगितलं आपल्याबद्दल आजीला ह्याचा विचार करत तो सोबत चालत होता त्यांच्या. आतमधून तो महल बघून निखिल तर चक्रावूनच गेला होता. एवढी श्रीमंती तो पहिल्यांदाच बघत होता. त्याला अजून खरं वाटत नव्हतं हे. सगळं स्वप्नात बघितल्यासारखी त्याची रीऍक्शन होती. आजीला त्यांच्या बेडरूममध्ये सोडून अभय आणि निखिल अभयच्या बेडरूमकडे निघाले.

                  कालच्या अभयला आलेल्या कॉलचं आणि आज अचानक निघण्याचं कारण आता निखिलला कळलं होतं. आजीला बरं नाही हे पाहून अभय आहे तसंच सोडून आला होता सगळं. अभयने तर आधी  एकच सरप्राईज सांगितलं होतं आणि इकडे त्याला एकावर एक सरप्राईज भेटत होते. आणि खरंतर ऍक्चुअल सरप्राईज बाकी होतं त्याचं अजून. अभयच्या आजीला पाहून त्यालाही खूप छान वाटत होतं. एवढी श्रीमंत असून एवढी साधी असलेली माणसं तो प्रथमच पाहत होता. एवढा थाट असूनही कुठे जरादेखील गर्वाचा स्पर्श नाही. सगळंच अनोखं. नाहीतर साला तो आमदार. किती घमेंड आहे साल्याला. त्याच्या शंभरपट श्रीमंती आहे इथे. पण घमेंड जरासुद्धा नाही. सगळा राजदरबारी थाट होता इकडे आणि माणसंही राजपरिवारासारखीच. 

                      अभयच्या बेडरूममध्ये आल्यावर अभय फ्रेश व्हायला निघून गेला. तोपर्यंत निखिल त्याची बेडरूम न्याहाळत बसला. किती मोठी बेडरूम होती त्याची. अक्खा ३ बीएचके चा फ्लॅट बसेल त्या एकट्या बेडरूममध्ये. एवढ्या मोठया खिडक्या आणि त्यावर लावलेले पडदे हवेने उडत होते. हवा आणि उजेड भरपूर. तिथेच समोर गॅलरी कम टेरेस होता. म्हणजे गॅलरी नव्हतीच ती. टेरेस वाटावं एवढा मोठा स्पेस होता समोर. तिथे चारही बाजूने वेगवेगळ्या प्रकारची झुडपे लावून आणि खाली गवत अंथरून गार्डन सारखं तयार केलं होतं. आणि आतमध्ये एवढा मोठा गोल किंगसाईझ बेड. त्यावर मखमली बेडशीट्स आणि तितकीच मऊशार गादी. समोर एवढी मोठी स्क्रीन आणि स्पिकर्स. एका बाजूला पुस्तक भरून मांडणी होती तर एका बाजूला जिमचं थोडंसं साहित्य होतं. एका खिडकीच्या इथे कॉम्प्युटर लावलेला होता.

                        अभय आला तेव्हा निखिलला तसं बघून थोडंसं हसला आणि त्याला आवाज देत म्हणाला,
"निख्या, सगळं निरीक्षण करून झालं असेल तर जा आता फ्रेश होऊन ये."

"अभ्या. कसला भारी बेडरूम आहे बे तुझा. आईशपथ. एकच नंबर. हे सगळं बघून मी तर हैराणच झालोय कि तू हे सगळं सोडून कसं काय राहू शकलास बाबा तिकडे?"

त्याचा प्रश्न ऐकून अभयला हसायला आले. कारण जेव्हापसून अभयने त्याला आपल्याबद्दल सांगितलंय तेव्हापसून निखिल एकच गोष्ट सारखी विचारत होता.

"अरे निख्या. तुला सांगितलं तर सगळं. आणि ह्या बघतोय ना ह्या सगळ्या गोष्टी आजीने आता लावल्या असतील. कारण इतके दिवस तर नव्हतो मी इकडे.  जा आता फ्रेश होऊन ये. नंतर मग तुला तुझी बेडरूम भेटेल जा" अभय त्याला समजावत म्हणाला.

"मला पण भेटेल माझी बेडरूम?" निखिल आश्चर्याने म्हणाला. कारण स्वतःची बेडरूम तेही या महालामध्ये. भारीच एकदम.

"हो बाबा. जा आता लवकर ये फ्रेश होऊन. जाम भूक लागलीय मला. एकतर कालपासून कंटिन्यू प्रवास करतोय. आता भूक कंट्रोल नाही होत आहे मला."

"हा हा येतो थांब." निखिल उड्या मारतच पळाला.
           
                थोड्यावेळाने फ्रेश होऊन बाहेर आला तर अभय भिंतीवरल्या  एका फोटोकडे टक लावून बघत होता. आईवडिलांचा फोटो होता त्याच्या. तो बघताना त्याचे डोळे भरून आले होते.

"निख्या, खूप लहान होतो रे कळत सुद्धा नव्हतं धड. पहिलीदुसरीला असेन. तेव्हा सोडून गेले रे मला आईबाबा." असं म्हणून रडायला लागला. त्याला तसं पाहून निखिलने त्याला सावरलं. काय बोलायचं ते कळत नव्हतं. अभयला फक्त सांत्वन देऊ शकत होता तो. थोड्यावेळाने अभय स्वतःहूनच शांत झाला. तसं निखिल म्हणाला,
"आपल्या हातात काही नसतं रे अभय, नियतीच्या खेळापुढे कोणाचं काही चालत नाही. जे झालं ते आपण बदलू शकत नाही. पण जे आपल्या हातात आहे त्याची काळजी तर नक्की घेऊ शकतो. आजीची खुप काळजी घेऊ आपण."

"हो निखिल." अभय डोळे पुसत म्हणाला."कधी काय होईल याची काही गॅरंटी नसते रे म्हणून मी माझ्या आयुष्यातल्या सगळ्यांना जपत असतो. कोणी नाहीय जास्त माझं ह्या जगात. आजी आणि तूला सोडून." आणि उठून निघाला.

"मी आहे मित्रा तुझ्यासोबत" असं म्हणून निखिलपण त्याच्या पाठोपाठ निघाला त्याच्या खांदयावर हात टाकून.

            जाताना निखिलचं अचानक पुस्तकांच्या इथं ठेवलेल्या एका लहान फोटोफ्रेम कडे लक्ष गेलं. २ लहान मुलं गोड हसताना कोणीतरी त्यांचा फोटो काढला होता. त्याशिवाय ते निरागस हास्य कैद नसतं झालं त्या फोटोत. तो फोटो बघून निखिलने अभयला विचारलं,
"अभ्या, कोणाचा फोटो आहे रे हा? म्हणजे हि दोघे कोण आहेत फोटोतली"

अभयने मागे वळून बघितले. तो त्या फ्रेमजवळ गेला. ती फ्रेम उचलून हातात घेतली आणि क्षणभर तिच्याकडे पहिले आणि म्हणाला,
"हि चिऊ, माझं लहानपणीचं प्रेम आणि हा मी,  म्याऊ."

To be Continued in Part 6.....