Search This Blog

Sunday, May 2, 2021

अनोळखी हे प्रेम - Part 10

   



"आज मौसम बड़ा बेईमान है

बड़ा बेईमान है, आज मौसम

आने वाला कोई तूफ़ान है

कोई तूफ़ान है, आज मौसम....." 

              निखिल खूप दिवस झाले टपरीवरचा चहा प्यायला नव्हता म्हणून हॉस्पिटलच्या जवळ असलेल्या टपरीवर चहा प्यायला आला होता. तेव्हा तिथे रेडिओवर हे गाणं लागलं. तेही खरंच होतं म्हणा. कारण आजचं वातावरण बघून तरी असंच वाटत होतं. ढगाळ वातावरण तयार झालं होतं. हवेत गारवा जाणवू लागला होता. सकाळीच असं ढगाळ वातावरण बघून काहीजण आज जोरदार पाऊस येणार असल्याचा अंदाज बांधत होते. तिथे टपरीवर त्यांच्या कंपनीतले काही एम्प्लॉईजपण होते. त्यांनी ओळखू नये म्हणून निखिल थोडं अंतर ठेवून उभा होता. असं वातावरण अभयला खूप आवडतं, साला आता इथे असता तर लगेच कधी पाऊस येईल आणि कधी मी भिजायला जाईल असं सारखं म्हणत बसला असता. निखिलला अभयचं पावसाचं वेड माहिती होतं. त्याच्या आठवणीने त्याच्या चेहऱ्यावर दुःखद छटा उमटली. तो अभयला खूप मिस करत होता. 

                काल जे झालं ते एका अर्थाने बरंच झालं होतं. निदान त्या दोघांमधल्या एकाला तरी कळलं होतं कि, आपलं लहानपणीचं प्रेम आपल्या जवळच आहे म्हणून. ऋतिका तर काल तिला कळाल्यापासन घरीच नव्हती गेलेली.  रात्रीपण तिथेच अभयजवळ सोफ्यावर झोपली होती. आणि आज सकाळी तशीच उठून आपल्या कामाला लागली होती. ऋतिकाला अभयजवळ तसंच थोड्यावेळासाठी सोडून निखिल जरा बाहेर आला होता. निखिलला ऋतिकासाठी मनापासून वाईट वाटत होतं. नशिबाने एखाद्यासोबत इतकंही वाईट वागू नये, असंच त्याला तिच्यासाठी वाटत होतं. कारण सरळ होतं. तिने ज्याची आजपर्यंत वाट बघितली ते तिचं लहानपणीचं प्रेम तिला अशा अवस्थेमध्ये परत भेटावं ह्यापेक्षा कमनशिबीपणा दुसरा काय असू शकतो. निखिलने विचार करता करता आपला चहा आणि सिगरेट संपवली. पाऊस चालू व्हायच्या आधी हॉस्पिटलमध्ये गेलं पाहिजे, नाहीतर उगाच भिजायला होईल. कारण आपल्याला अभयसारखं पावसात भिजायला काही आवडत नाही. म्हणून नकोच ते भिजणं, असं म्हणत तो पळत हॉस्पिटलकडे निघाला. पण तेवढ्यात ढगांचा गडगडाट होऊन जोरदार पावसाला सुरवात झालीच.  आणि नाही म्हटलं तरी निखिल थोडा पावसात भिजलाच. तो तसाच चरफडत पावसाला शिव्या घालत आत आला. 

              ऋतिका तिच्या रुटीन चेकअपला गेली होती. म्हणून निखिल अभयजवळ जाऊन बसला. बाहेर मुसळधार  पावसाला  सुरुवात झाली होती. वारा आपला जोर दाखवत होता. विजा कडाडत होत्या आणि तेवढ्याच जोराने ढग गर्जत होते. जणू काही वादळच सुटलं होतं बाहेर. निखिलला मघाशी ऐकलेल्या गाण्याची आठवण झाली आणि मनातल्या मनात म्हणाला, च्यायला खरंच तुफान आलं की. 

                     निखिल लॅपटॉपवर काहीतरी काम करत होता. तेवढ्यात त्याला जाणवलं कि अभयच्या हाताची हालचाल होतेय. त्याचा हात थरथरतोय. म्हणून त्याने पटकन ऋतिकाला कॉल करून बोलावून घेतलं. तशी ऋतिका धावतपळतच आली. तिच्यासोबत आणखी एक तिचे सिनियर डॉक्टर होते. त्यांनी अभयला तपासलं. आणि एक हलकीशी स्माईल देत ऋतिकाकडे पाहत निखिलला म्हणाले,

"गुड न्यूज आहे. अभय शुद्धीवर यायचा प्रयत्न करतोय. कुठल्याही क्षणी त्याला जाग येईल."

 तसा ऋतिकाचा चेहरा उजळला. अभय शुद्धीवर येतोय हे पाहून तिला खूप आनंद झाला होता. निखिल तर उड्या मारायचाच बाकी होता. 

"ऋतिका तू इथेच थांब. तुझी गरज लागेल इथे.  मला एका व्हिजिटकरता जावं लागणार आहे. सो टेक केअर ऑफ हिम." असं म्हणून ते डॉक्टर निघून गेले. ऋतिकाने ताबडतोब एका नर्सला काही इंजेक्शन्स आणायला सांगितली. अभय खूप दिवसांनी शुद्धीवर येत असल्यामुळे त्याला शुद्धीवर आल्यावर त्याच्या जवळचं कोणीतरी समोर असायला हवं होतं. म्हणून ऋतिका निखिलला म्हणाली,

"निखिल, तुला अभयजवळ थांबावं लागेल. कारण डोळे उघडताना त्याला आपलं कोणीतरी समोर दिसलं कि तो पटकन शुद्धीवर येईल."

"हो ते ठीक आहे ऋतिका, पण त्याच्या जास्त जवळ तुम्ही आहात. म्हणजे त्याची चिऊ आहे. मग मी का?" निखिलने विचारले. 

"अरे निखिल, अभय मला चिऊ म्हणून नाही तर ऋतिका म्हणून ओळखतोय. त्याला अजून कुठे माहितीय कि मी चिऊ आहे म्हणून. आणि तसंही माझ्यापेक्षा जास्त वेळ तू त्याच्यासोबत राहिलाय. सो प्लिज." ऋतिका त्याला समजावत म्हणाली. 

"हम्म बरं." असं म्हणून अभय निखिलजवळ जाऊन उभा राहिला. 

              अभय शुद्धीवर येत होता हळू हळू. तेव्हा निखिल त्याच्याजवळ आणि ऋतिका त्याच्या दुसऱ्या बाजूला उभी होते. अभयच्या तोंडून अस्फुटसा आवाज येत होता. काय बोलतोय हे न समजून निखिलने आपले कां त्याच्या तोंडाजवळ नेले तसं त्याला थोडंफार ऐकू आलं. तो चिऊचं नाव घेत होता सारखं आणि मध्येच 'निख्या माझी चिऊ कुठाय, तिला घेऊन ये माझ्याजवळ' असं म्हणत होता. त्याच्या तोंडून आपलं म्हणजेच चिऊचं नाव ऐकून ऋतिका आनंदून गेली. तिच्या डोळ्यांतून हलकेच अश्रुंचे दोन थेंब ओघळले. निखिलच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य होते. 

                अभय हळूहळू पापण्यांची उघडझाप  करत डोळे किलकिले करून पाहत होता. कारण खूप दिवसांनी डोळे उघडत असल्यामुळे त्याचे डोळे तिथल्या उजेडाला सरावेपर्यंत त्याला डोळे उघडून पाहायला थोडा त्रास होणारच होता. ऋतिकाने पटकन काही औषधं इंजेक्शनमधून सलाईनमध्ये सोडली. अभय आता पूर्ण शुद्धीवर आला होता. त्याने डोळे उघडून बघितले. निखिल त्याच्या बाजूलाच बसला होता. ऋतिका समोर उभी होती. त्या दोघांकडे बघून त्याने हलकेच एक स्माईल दिली आणि उठून बसायचा प्रयत्न करू लागला. निखिल त्याला उठून बसायला मदत करू लागला. तसं ऋतिकाने अडवलं,

"अभय, लगेच उठू नकोस. तुला पटकन उठता नाही येणार. थोडा वेळ विश्रांती घे, तुझ्या शरीराला नॉर्मल अवस्थेमध्ये येऊ दे. मग उठून बस. ओके." ऋतिका प्रेमाने त्याला म्हणाली. मोठ्या मुश्किलीने तिने ओठांवर आलेलं म्याऊ हे नाव अडवलं होतं. 

"निखिल, अभयला थोडा वेळ आराम करू दे आता. आपण येऊ थोड्या वेळाने." असं म्हणून ऋतिका बाहेर जायला वळली. पण खरंतर तिला आपल्या डोळ्यांत आलेलं पाणी पुसायचं होतं. अभयच्या नजरेतून हो गोष्ट सुटली नाही, पण त्याला विश्रांतीची गरज असल्यामुळे त्याला थोडी भोवळ आल्यासारखी झाली आणि तो झोपेच्या अधीन झाला. निखिलदेखील त्याला आराम करायला देऊन ऋतिका पाठोपाठ बाहेर आला. 

            ऋतिका कॉरिडॉर मधल्या खिडकीजवळ येऊन उभी होती. खिडकीतून ती धो  धो  कोसळणाऱ्या पावसाला  पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर आनंद होता, एक समाधान होतं. पण डोळ्यांत एकप्रकारची काळजी होती. अस्वस्थता होती. मनात एक बेचैनी कायम होती. डोक्यात विचारांचं थैमान होतं. निखिल तिच्या बाजूला येऊन उभा राहिला. 

"ऋतिका" त्याने तिला आवाज दिला. 

"हंम्म" तिला माहिती होतं निखिल असणार ते, म्हणून तिने नुसता हुंकार भरला. नजर तशीच बाहेर कोसळणाऱ्या पावसावर होती. 

"आता कसं वाटतंय? म्हणजे अभय शुद्धीवर आलाय. तुमच्या समोर आहे तो. काही वेळा मध्ये त्यालाही तुमची खरी ओळख पटेल. तयार आहात ना तुम्ही?" निखिलने तिला विचारले. 

"माहित नाही. एवढे दिवस मी ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होती तो दिवस आज जवळ येऊन ठेपलाय.  पण मनाची तयारी नाही झालीय माझ्या अभयसमोर जायची. त्याला कशा रीतीने भेटू तेच कळत नाहीय. एका बाजूने त्याला भेटायची ओढ कायम आहे तर दुसऱ्या बाजूने त्याची काय प्रतिक्रिया असेल ह्याची भीती आहे. मी जसं त्याची वाट पहिली तशी त्यानेसुद्धा पहिली असेल का रे? जशी मी त्याच्या ओढीने त्याच्याकडे ओढली जात होते तसं त्यालादेखील वाटलं असेल का कधी? जशी माझ्या मनात हुरहूर दाटायची तशी त्यालाही वाटत असेल का रे? असे एक ना अनेक प्रश्न डोक्यांत थैमान घालतायत रे निखिल." ऋतिका आपल्या मनातली घालमेल निखिलला समजावण्याचा प्रयत्न करत होती. 

"ह्याचं उत्तर एकच आहे ऋतिका. होय" असं म्हणून निखिलने तिला अभयबद्दल सगळं सांगून टाकलं. कसं तो तिच्यासाठी वेडा झाला होता. तिच्याबद्दल त्यालाही तीच अनामिक ओढ कायम होती. तोदेखील तिच्या आठवणीने बेचैन व्हायचा. सारखं चिऊ चिऊ करायचा. आपल्या चिऊवरच्या प्रेमात ऋतिका येतेय म्हणून त्याने कसं तिला टाळलं होतं आणि आता त्याचा ऋतिकाला भेटल्यावर ऍक्सीडेन्ट कसा झाला इथपर्यंत सगळं काही. ऋतिका हे सगळं ऐकून अचंबित झाली. आणि एक प्रकारे समाधानदेखील वाटलं तिला. कारण आपल्यासारखाच आपला म्याऊ देखील आपल्यासाठी थांबला होता. खरंच ती ह्या क्षणाला स्वतःला खूप नशीबवान समजत होती. 

                 सगळं सांगून झाल्यावर निखिल ऋतिकाला म्हणाला,

"ऋतिका तुमच्या दोघांमध्ये तीच ओढ होती. तेच एक अदृश्य बंध होते ज्याने तुम्हाला आजतायगत जखडून ठेवले होते. तुम्ही दोघेही आपल्या लहानपणीच्या प्रेमाला विसरलेले नव्हता. उलट परत भेटून पण अनोळखी असताना पण तुमच्यात ती अनामिक भेटीची ओढ कायम होती. पण तुम्ही एकमेकांना ओळखत नसल्यामुळे आणि तुम्हाला माहित नसल्यामुळे तुम्हाला तुमच्या पहिल्या प्रेमाशी विश्वासघात करायचा नव्हता. म्हणून तुम्हाला एकमेकांबद्दल प्रेमाच्या उत्कट भावना  येऊन पण तुम्ही दोघेही आपल्या लहानपणीच्या प्रेमाशी इमानदार राहिलात. खरंच यार. ग्रेट आहात तुम्ही दोघे. नाहीतर आजकालच्या ह्या क्षणिक प्रेमाच्या दुनियेत तुमच्यासारखं एकमेकांपासून दूर राहून पण  एकमेकांशी अतूट राहिलेलं नातं खूप रेअर आहे. हॅट्स ऑफ टू यू" निखिल म्हणाला. 

"निखिल असं काही नाहीय रे. फक्त आपण ज्याच्यावर प्रेम करतो ना त्याच्याशी लॉयल राहण्याची भावना असली ना कि आपण त्याची कितीही वाट पाहू शकतो. हीच तर ताकद असते खऱ्या प्रेमाची, जे आपल्याला दुसऱ्या कोणाचा होऊ नाही देत. मग तो आपल्या जवळ असूदेत किंवा लांब. त्याने काहीच फरक पडत नाही. प्रेम हि खूप सुंदर भावना आहे रे. तू देखील अनुभवलं असशील जर तु कोणावर खरं प्रेम केलं असेल तर." ऋतिका म्हणाली. 

"नाही ना ऋतिका, अजून कोणी तसं भेटलंच नाही खरं प्रेम होण्यासारखं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्या गावच्या नाहीयेत. पण मला तुमच्यासारखे मित्र भेटले ना ह्यातच सगळं आलं. प्यार नही मिला  तो क्या हुआ,यार  तो ऐसे मिले है जो किसी प्यारसे कम नही." निखिल आपल्या नेहमीच्या स्टाईल ने म्हणाला आणि हसू लागला. त्याचं बोलणं ऐकून ऋतिकाला देखील हसू फुटलं. खरंच होतं ते. निखिलसारखा मित्र प्रत्येकाला मिळू दे असच ऋतिकाला वाटलं. 

         त्यांचं बोलणं चालू असतानाच एक नर्स त्यांच्याकडे आली आणि ऋतिकाला म्हणाली,

"डॉक्टर, अभय सरांना जाग आलीय. चला लवकर." 

          तिचा निरोप ऐकून ऋतिका आणि निखिल लगेच जायला निघाले. जाताना निखिलने ऋतिकाला अभयसमोर नॉर्मल राहायला सांगितले. मी सगळं प्लॅन करून करतो व्यवस्थित म्हणून त्याने तिला सध्या तरी काहीच बोलू नका म्हणून बजावले. कारण निखिलला त्याच्या मित्राला एक छान सरप्राईज द्यायचं होतं. 

            अभयला व्यवस्थित जग आली होती आणि तो त्यांचीच वाट बघत होता. त्या दोघांना एकत्र आलेलं पाहून त्याला ह्या दोघांची ओळख कधी झाली हेच कळेना. कारण त्याच्यामते तो काही वेळासाठी बेशुद्ध होता. पण त्याला आता खरं काय ते कळणार होतं. निखिलने अभयला उठून बसायला मदत केली. ऋतिका त्याची सलाईन चेक करत होती. तिने अभयला एकदा तपासले आणि बाजूला उभी राहिली. अभय उठून बसताच निखिलने त्याला मिठी मारली. अभयला समजेना निखिलने त्याला का मिठी मारली ते. म्हणून तो त्याला म्हणाला. 

"काय रे निख्या, काय झालं तुला. अचानक अशी मिठी का मारलीस? आणि डोळ्यांत पाणी का आहे तुझ्या?" अभयला काहीच समजत नव्हतं. 

"काही नाही रे अभ्या असंच. साल्या एवढ्या दिवसांनी तुझ्याशी बोललो ना म्हणून जरा इमोशनल झालो. बाकी काही नाही" निखिल म्हणाला. ऋतिका तिथेच त्यांचा भरतमिलाप बघत  डोळ्यांत येणारं  पाणी थांबवत उभी होती. 

"एवढ्या दिवसांनी म्हणजे? अरे आताच तर माझा ऍक्सीडेन्ट झालेला ना थोड्या वेळापूर्वी. थोडा वेळच तर मी बेशुद्ध होतो ना. मग" अभय गोंधळून म्हणाला. 

तसं निखिलने ऋतिकाकडे पाहिलं. ऋतिकाने त्याला नजरेनेच हे सगळं नॉर्मल आहे असं सांगितलं. तेव्हा तो परत अभयला म्हणाला,

"अभ्या, लेका थोड्या वेळा पूर्वी नाही रे दीड महिन्यापूर्वी तुझा ऍक्सीडेन्ट झालेला होता आणि तू फक्त थोडा वेळ नाही, तर चांगला दीड महिना कोमात होता." 

"काय बोलतोस निख्या? मी कोमामध्ये होतो, ते पण दीड महिना. बापरे! मग मला कसं कळलं नाही ते? "अभय आश्चर्यचकित होऊन म्हणाला. 

त्याचा तो प्रश्न ऐकून ऋतिका खुद्कन हसली. आपला म्याऊ अजुनपण तसाच निरागस आहे हे पाहून तिला बरं वाटलं. 

"अबे ये, कोमात असल्यावर तुला कसं कळेल तू कोमात आहेस ते? काय पण? कोमात जाऊन तुझ्या डोक्यावर तर परिणाम नाय ना झाला?" निखिल त्याला म्हणाला."डॉक्टर चेक करा जरा ह्याला." 

"हो पण मला काय माहिती ते? मी कुठे सारखा सारखा कोमात जातो ते माहित असायला." अभय म्हणाला. 

त्या दोघांचं बोलणं चालू होतं. ते पाहून ऋतिकाला हसायला येत होतं. ह्यांचं असंच बोलणं चालू राहिलं तर अभयला काहीच कळणार नाही आणि निखिलपण त्याला समजावून समजावून दमेल. म्हणून ऋतिकाच पुढे होऊन अभयला  म्हणाली,

"अभय, मी सांगते ऐक. तुझा दीड महिन्यांपूर्वी ऍक्सीडेन्ट झाला होता. तेव्हा तुझ्या डोक्याला खूप मार लागला होता आणि खूप रक्त वाहून गेलं होतं. त्याच्यामुळे तू कोमात गेला होतास. तेव्हापसून तुझ्यावर इथे आमच्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट चालू होती. निखिलपण इथेच असायचा नेहमी. तुझ्या ट्रीटमेंटचा सगळा खर्च त्यानेच केलाय. तुला ह्या स्पेशल रूम मध्ये ठेवण्यापासून ते बाकी सगळ्या गोष्टी त्यानेच केल्यात. खूप काळजी घेतली त्याने तुझी. तू शुद्धीवर यावास म्हणून तो खूप प्रयत्न करत होता." 

             अभय हे सगळं ऐकत होता. निखिलने आपल्यासाठी हे सगळं केलेलं पाहून त्याला आतून खूप बरं वाटलं होतं. ऋतिका इथे डॉक्टर आहे हेही त्याला नव्यानेच कळत होतं. पण त्याला ऋतिकाचं निखिलच्या बाजूने बोलणं जरा अजबच वाटलं. कारण तिला अभयबद्दल खरी माहिती नव्हती. आणि तिचा असच समज होता कि, अभय एक सर्वसामान्य मुलगा आहे आणि निखिल त्याचा श्रीमंत मित्र आहे. आणि आपल्या मैत्रीपायी निखिल हे सगळं करतोय. निखिलने अभयबद्दल खूप गुप्तता बाळगली असल्याने ऋतिकाचा असा समज झाला होता. 

             ऋतिकाचं बोलणं ऐकून अभयने चमकून निखिलकडे बघितलं. त्याने एक डोळा मिचकावत आपले खांदे उडवले. तुझ्याकडे नंतर बघतो मी, आता बाहेर जा तू. असं त्याला नजरेनेच सांगून अभय ऋतिकाला म्हणाला,

"ऋतिका खूप धन्यवाद तुझे. तू हे सगळं माझ्यासाठी केलंस ते. तेही आपली जास्त ओळख नसताना."

"ओळख नाही असं कसं म्हणतोस तू अभय. तुला आठवत नाहीय का आपण ह्याआधीदेखील भेटलोय ते." ऋतिका त्याचं ते अनोळखीपणाचं बोलणं ऐकून कळवळून म्हणाली. 

"हो आठवतंय गं. पण आपली जास्त भेट झालीच कुठे?" अभयचं हृदय ऋतिकाशी बोलताना परत एकदा धडधडू लागलं होतं. 

"हो पण त्या एवढ्याश्या भेटीत पण आपली ओळख झालीच होती ना? हे तू विसरलास का?" ऋतिका स्वतःला कसंतरी थांबवत होती. तिला त्याला आताच सांगावंसं वाटत होतं कि, तूच माझा म्याऊ आहेस अन् मी तुझी चिऊ. त्यासाठी ती धडपडत होती.  

"नाही गं. विसरलेलो नाहीय मी काही. पण काहीतरी होतं जे मला अडवत होतं, म्हणून. . ." अभय बोलता बोलता  मध्येच थांबला. त्याला एवढ्याश्या बोलण्याने पण दम लागला होता. त्याला त्रास झालेला पाहून ऋतिकाने तो विषय तिथेच थांबवला. 

"बरं असू दे अभय. आपण नंतर बोलूयात ह्यावर. आराम कर आता तू." असं म्हणून ऋतिका त्याला आराम करायला सांगून निघून गेली. 

              बाहेर उभा असलेला निखिल ऋतिका  गेल्याचे पाहून लगेच आत आला. त्यांचं बोलणं चालू असताना तो बाहेर निघून गेला होता मघाशी. अभय डोळे बंद करून विचार करत होता. त्याला झोपलेलं पाहून तो खिडकीजवळ जाऊन उभा राहिला. निखिल आल्याची चाहूल लागली म्हणून अभयने डोळे उघडले आणि त्याला आवाज दिला. अभयचा आवाज ऐकून निखिल त्याच्याजवळ आला. 

"अरे तू तर झोपलेलास ना? कशाला उठलास मग? आराम करायचा ना." निखिल म्हणाला. 

"झोप नव्हती लागत यार. ऋतिकापण आताच गेली बाहेर. तिच्याशीच बोलत होतो." अभय म्हणाला. 

"काय बोलली मग तुझी ऋतिका?" निखिल मस्करी करत म्हणाला. 

"माझी ऋतिका? हो का?" अभय एक डोळा वर करत म्हणाला. 

"हो मग, साल्या तुझीच आहे ना. एवढं सगळं करतेय ती बिचारी तुझ्यासाठी. तुझा ऍक्सीडेन्ट झाल्यापासून ते आजपर्यंत तिने काय नाय केलं तुझ्यासाठी. तू कोमात असताना तर सारखं तुझ्याजवळच असायची ती. जास्त कधी घरी देखील जात नव्हती. तू शुद्धीवर आलाय तेव्हा कुठे तिच्या जीवात  जीव आलाय.  नशीब ती डॉक्टर आहे ते,तिने सगळं स्वतः लक्ष देऊन तुझी ट्रीटमेंट केलीय. नशीब काढलंस लेका. एवढी चांगली मुलगी तुझ्यावर जीव ओवाळून टाकतेय. खरंच यार, ऋतिका तुझ्यावर खूप प्रेम करते. कसं ते माहिती नाही, पण तिचा जीव आहेस लेका तू. एवढं तरी मला कळलंय ह्या दिवसांत." निखिल म्हणाला. 

अभय त्याचं ऐकत होता. ऋतिका आपल्यासाठी एवढं सगळं का करतेय, हेच त्याला कळत नव्हतं. मान्य आहे कि,तिलासुद्धा आपल्याबद्दल ओढ असेल पण हे प्रेम वगैरे त्याला सगळं नवीन होतं. निखिल सांगतोय म्हटल्यावर हे खरंच असणार आहे. पण अभयला चिऊ वरचं प्रेम ऋतिकाबद्दल विचार करण्यापासून थांबवत होतं. 

"हा यार ते आहेच, पण निख्या चिऊ असताना मी तिचा विचार नाही करू शकत. भलेही ऋतिका बद्दल मलासुद्धा एक ओढ आहे पण माझं पाहिलं प्रेम चिऊच आहे. मी फक्त तिचाच आहे. तिला मी फसवू नाही शकत निख्या." अभय म्हणाला. 

"हो अभ्या माहितीय मला, पण चिऊ कधी भेटणार तुला. तू साधं तिला शोधण्याचा प्रयत्न पण नाही केलास ह्या दिवसांत. फक्त चिऊची आठवण काढून ती तुझ्या जवळ येणार आहे का?" निखिल त्याला डिवचत म्हणाला. 

"अरे निख्या मीआपल्या कंपनीच्या कामात बिझी होतो. माहितीय ना तुला. मग. आणि आता तिला मी कसंही करून शोधणारच आहे. नाही राहू शकत मी आता तिच्याशिवाय" अभय म्हणाला. 

"हो अभ्या. पण एक सांगू,  तिला आता तुला शोधायची गरज नाहीय. फक्त मनापासून तिला हाक मार. ती इथेच आहे जवळपास तुझ्या. तुझी हाक ऐकून ती नक्कीच येईल तुझ्याकडे. असं माझं मन सांगतंय." निखिल अभयला थोडाफार अंदाज देत होता. म्हणून त्याने त्याला कोड्यात सांगितले. डायरेक्ट सांगितलं असतं तर काही मजाच राहिली नसती त्याच्या सरप्राईजची. 

"तुला कसं माहिती निख्या?" अभयने प्रश्न केला. 

"असंच रे. मला आतून असं वाटतंय. का? मन काय फक्त तुलाच एकट्याला आहे का? तुलाच घडणाऱ्या गोष्टींचा अंदाज येऊ शकतो का फक्त साल्या?  अपना भी सिक्स्थ सेन्स काम करता है भिडू " निखिल म्हणाला. 

"अच्छा हो का? क्या बात है. तुझा सिक्स्थ सेन्स कधीपासून काम करायला लागला रे निख्या" असं म्हणून अभय हसायला लागला. त्याला  निखिलपण हसायला लागला. 

"बरं निख्या मला एक सांग, ऋतिका मघाशी असं का म्हणत होती तुझ्याबद्दल कि, तू माझी सगळी ट्रीटमेंट केलीय. सगळं खर्च तू केलायस माझा आणि बाकी सगळं. तू काय सांगितलंय तिला नेमकं माझ्याबद्दल. मी कोण आहे हे सांगितलेलं तर दिसत नाहीय तू. मग दुसरं काय सांगितलंस तिला?" अभयने मघाशी त्याच्या मनात आलेला प्रश्न विचारला. 

तसा निखिल अजूनच हसायला लागला. 

"हसतोय काय निख्या? सांग कि मुर्खा, तिला काय भलतंसलतं नाय ना सांगितलंस माझ्याबद्दल काही?" अभय म्हणाला. 

"नाही रे अभ्या. मी तिला काहीच नाही सांगितलंय. उलट तू कोण आहेस हे मी सगळ्यांपासून लपवून ठेवलंय. एवढं कि हॉस्पिटलच्या समोर असलेल्या आपल्या ब्रँच ऑफिसमध्ये पण अजून महित नाहीय कि, तुझा ऍक्सीडेन्ट झालेला ते. आजीला पण नाही सांगितलंय अजून. फक्त बॉबी अंकलना सांगितलंय आणि त्यांना अभय आणि मी कंपनीच्या कामानिमित्त अचानक बाहेरगावी जायला लागलं असं सांगायला सांगितलं. आपल्या काही ठराविक गार्ड्सनाच फक्त माहितीय हे. नको काळजी करुस. मी सगळी सेक्युरिटी घेतलीय. आणि ऋतिकाचं म्हणशील तर तिला तू नक्की कोण आहेस ते माहिती नाहीय. तिला असंच वाटतंय कि, तू एक सामान्य माणूस आहे जो तिला ह्या आधी काही वर्षांपूर्वी भेटला होता. आणि ती मला ओळखत नव्हती म्हणून तिला असं वाटतंय कि, मी एक फार मोठा श्रीमंत माणूस आहे आणि तू माझा एक गरीब मित्र आहेस. तुझा ऍक्सीडेन्ट झाला तेव्हा मी तिथे नशिबाने होतो आणि नंतर मैत्रीखातर मीच तुझी या हॉस्पिटलमध्ये  चांगल्या प्रकारची ट्रीटमेंट करतोय. म्हणून तुला मघाशी ती तसं म्हणाली."

निखिलचं बोलणं ऐकून अभयला हसूच आलं.

"अच्छा असं आहे तर. मी ह्या एका श्रीमंताचा गरीब मित्र आहे तर. गुड." अभय निखिलला टोमणा मारत म्हणाला. 

"अरे मी थोडी सांगितलं तिला. तिनेच स्वतःच तो समज करून घेतला. मग मी तरी कशाला काय बोलू. नंतर तू आणि ती बघून घेशील म्हणून मी जसं आहे तसं ठीकच म्हटलं." अभयचा टोमणा निखिलला लागला होता. 

"निख्या अरे मस्करी करतोय. मस्त काम केलंस लेका. बरं झालं तू तिला कळू नाही दिलंस ते आणि बाकीच्यांना पण." अभय निखिलचं कौतुक करत म्हणाला. 

"हा फिर ठीक है, तेरे लिये इतना तो कर हि सकता हू  मेरे यार." असं म्हणून निखिलने अभयच्या हात थोपटला. 

"हा मेरे भाई." असं म्हणून अभय निखिलला मिठी मारायला गेला. पण ते त्याला जमलंच नाही. कारण त्याला अजून स्वतःहून उठून बसता येत नव्हतं. म्हणून मग निखिलनेच त्याला हसून मिठी मारली. 

               ऋतिका अभयशी कसं बोलायचं त्याचा विचार करत होती.  ह्यामध्ये निखिल तिची मदत करणार होता. पण तरीसुद्धा आपल्यालाच त्याला सामोरं जायचं होतं. आपल्याला आपल्याच प्रेमाला  भेटायला भीती का वाटावी, ह्याचंच तिला आश्चर्य वाटलं.  तेही खरंच होतं म्हणा. तिला तशी भीती वाटणं स्वाभाविकच होतं. कारण अभयला ती अगोदर भेटली होती आणि त्याच्याबद्दल नाही म्हटलं तरी तिच्या मनात प्रेमभावना आल्या होत्या. आणि आता तिला तोच अभय तिचा म्याऊ आहे कळल्यावर त्याच्या समोर जायची भीती वाटत होती. कारण अप्रत्यक्षपणे आपण त्याला फसवल्याची भावना तिच्या मनात घर करत होती. तो काय विचार करेल  आपल्याबद्दल? आपण त्याला फसवलं असं तर त्याला वाटणार नाही ना? ह्याची एक अनामिक भीती तिला वाटत होती. त्याला भेटायच्या ओढीची जागा आता भीतीने घेतली होती.

                 अभयला ह्या बद्दल काही कल्पनाच नव्हती. तो फक्त ऋतिका आणि चिऊचाच विचार करत होता. चिऊला कसं शोधता येईल हेच तो बघत होता. आणि त्याबरोबरच ऋतिकाबद्दलच्या त्याच्या भावनांना तो समजून घ्यायचा प्रयत्न करत होता. 

                आणि इकडे निखिल ऋतिका आणि अभयला, अर्थातच चिऊ आणि म्याऊला कसं  भेटवता येईल ह्याचं प्लॅनिंग करत होता. त्याला त्यांची लवकरात लवकर भेट घडवून आणायची होती. तो त्याच विचारात होता. कारण लहानपणी एकमेकांपासून वेगळे झालेले दोन प्रेमी जीव आता भेटणार होते. त्यांची ती भेट अविस्मरणीय व्हावी अशी  निखिलची मनापासूनची प्रामाणिक इच्छा होती. आपल्या जिवलग मित्राला त्याचं प्रेम इतक्या वर्षांनी परत भेटणार म्हटल्यावर त्याला खूप आनंद झाला होता. फक्त त्यांचा तो  पुनर्मीलन सोहळा लवकरच पार पडावा ह्याचा तो विचार  करत होता.