Search This Blog

Sunday, May 2, 2021

अनोळखी हे प्रेम - Part 10

   "आज मौसम बड़ा बेईमान है

बड़ा बेईमान है, आज मौसम

आने वाला कोई तूफ़ान है

कोई तूफ़ान है, आज मौसम....." 

              निखिल खूप दिवस झाले टपरीवरचा चहा प्यायला नव्हता म्हणून हॉस्पिटलच्या जवळ असलेल्या टपरीवर चहा प्यायला आला होता. तेव्हा तिथे रेडिओवर हे गाणं लागलं. तेही खरंच होतं म्हणा. कारण आजचं वातावरण बघून तरी असंच वाटत होतं. ढगाळ वातावरण तयार झालं होतं. हवेत गारवा जाणवू लागला होता. सकाळीच असं ढगाळ वातावरण बघून काहीजण आज जोरदार पाऊस येणार असल्याचा अंदाज बांधत होते. तिथे टपरीवर त्यांच्या कंपनीतले काही एम्प्लॉईजपण होते. त्यांनी ओळखू नये म्हणून निखिल थोडं अंतर ठेवून उभा होता. असं वातावरण अभयला खूप आवडतं, साला आता इथे असता तर लगेच कधी पाऊस येईल आणि कधी मी भिजायला जाईल असं सारखं म्हणत बसला असता. निखिलला अभयचं पावसाचं वेड माहिती होतं. त्याच्या आठवणीने त्याच्या चेहऱ्यावर दुःखद छटा उमटली. तो अभयला खूप मिस करत होता. 

                काल जे झालं ते एका अर्थाने बरंच झालं होतं. निदान त्या दोघांमधल्या एकाला तरी कळलं होतं कि, आपलं लहानपणीचं प्रेम आपल्या जवळच आहे म्हणून. ऋतिका तर काल तिला कळाल्यापासन घरीच नव्हती गेलेली.  रात्रीपण तिथेच अभयजवळ सोफ्यावर झोपली होती. आणि आज सकाळी तशीच उठून आपल्या कामाला लागली होती. ऋतिकाला अभयजवळ तसंच थोड्यावेळासाठी सोडून निखिल जरा बाहेर आला होता. निखिलला ऋतिकासाठी मनापासून वाईट वाटत होतं. नशिबाने एखाद्यासोबत इतकंही वाईट वागू नये, असंच त्याला तिच्यासाठी वाटत होतं. कारण सरळ होतं. तिने ज्याची आजपर्यंत वाट बघितली ते तिचं लहानपणीचं प्रेम तिला अशा अवस्थेमध्ये परत भेटावं ह्यापेक्षा कमनशिबीपणा दुसरा काय असू शकतो. निखिलने विचार करता करता आपला चहा आणि सिगरेट संपवली. पाऊस चालू व्हायच्या आधी हॉस्पिटलमध्ये गेलं पाहिजे, नाहीतर उगाच भिजायला होईल. कारण आपल्याला अभयसारखं पावसात भिजायला काही आवडत नाही. म्हणून नकोच ते भिजणं, असं म्हणत तो पळत हॉस्पिटलकडे निघाला. पण तेवढ्यात ढगांचा गडगडाट होऊन जोरदार पावसाला सुरवात झालीच.  आणि नाही म्हटलं तरी निखिल थोडा पावसात भिजलाच. तो तसाच चरफडत पावसाला शिव्या घालत आत आला. 

              ऋतिका तिच्या रुटीन चेकअपला गेली होती. म्हणून निखिल अभयजवळ जाऊन बसला. बाहेर मुसळधार  पावसाला  सुरुवात झाली होती. वारा आपला जोर दाखवत होता. विजा कडाडत होत्या आणि तेवढ्याच जोराने ढग गर्जत होते. जणू काही वादळच सुटलं होतं बाहेर. निखिलला मघाशी ऐकलेल्या गाण्याची आठवण झाली आणि मनातल्या मनात म्हणाला, च्यायला खरंच तुफान आलं की. 

                     निखिल लॅपटॉपवर काहीतरी काम करत होता. तेवढ्यात त्याला जाणवलं कि अभयच्या हाताची हालचाल होतेय. त्याचा हात थरथरतोय. म्हणून त्याने पटकन ऋतिकाला कॉल करून बोलावून घेतलं. तशी ऋतिका धावतपळतच आली. तिच्यासोबत आणखी एक तिचे सिनियर डॉक्टर होते. त्यांनी अभयला तपासलं. आणि एक हलकीशी स्माईल देत ऋतिकाकडे पाहत निखिलला म्हणाले,

"गुड न्यूज आहे. अभय शुद्धीवर यायचा प्रयत्न करतोय. कुठल्याही क्षणी त्याला जाग येईल."

 तसा ऋतिकाचा चेहरा उजळला. अभय शुद्धीवर येतोय हे पाहून तिला खूप आनंद झाला होता. निखिल तर उड्या मारायचाच बाकी होता. 

"ऋतिका तू इथेच थांब. तुझी गरज लागेल इथे.  मला एका व्हिजिटकरता जावं लागणार आहे. सो टेक केअर ऑफ हिम." असं म्हणून ते डॉक्टर निघून गेले. ऋतिकाने ताबडतोब एका नर्सला काही इंजेक्शन्स आणायला सांगितली. अभय खूप दिवसांनी शुद्धीवर येत असल्यामुळे त्याला शुद्धीवर आल्यावर त्याच्या जवळचं कोणीतरी समोर असायला हवं होतं. म्हणून ऋतिका निखिलला म्हणाली,

"निखिल, तुला अभयजवळ थांबावं लागेल. कारण डोळे उघडताना त्याला आपलं कोणीतरी समोर दिसलं कि तो पटकन शुद्धीवर येईल."

"हो ते ठीक आहे ऋतिका, पण त्याच्या जास्त जवळ तुम्ही आहात. म्हणजे त्याची चिऊ आहे. मग मी का?" निखिलने विचारले. 

"अरे निखिल, अभय मला चिऊ म्हणून नाही तर ऋतिका म्हणून ओळखतोय. त्याला अजून कुठे माहितीय कि मी चिऊ आहे म्हणून. आणि तसंही माझ्यापेक्षा जास्त वेळ तू त्याच्यासोबत राहिलाय. सो प्लिज." ऋतिका त्याला समजावत म्हणाली. 

"हम्म बरं." असं म्हणून अभय निखिलजवळ जाऊन उभा राहिला. 

              अभय शुद्धीवर येत होता हळू हळू. तेव्हा निखिल त्याच्याजवळ आणि ऋतिका त्याच्या दुसऱ्या बाजूला उभी होते. अभयच्या तोंडून अस्फुटसा आवाज येत होता. काय बोलतोय हे न समजून निखिलने आपले कां त्याच्या तोंडाजवळ नेले तसं त्याला थोडंफार ऐकू आलं. तो चिऊचं नाव घेत होता सारखं आणि मध्येच 'निख्या माझी चिऊ कुठाय, तिला घेऊन ये माझ्याजवळ' असं म्हणत होता. त्याच्या तोंडून आपलं म्हणजेच चिऊचं नाव ऐकून ऋतिका आनंदून गेली. तिच्या डोळ्यांतून हलकेच अश्रुंचे दोन थेंब ओघळले. निखिलच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य होते. 

                अभय हळूहळू पापण्यांची उघडझाप  करत डोळे किलकिले करून पाहत होता. कारण खूप दिवसांनी डोळे उघडत असल्यामुळे त्याचे डोळे तिथल्या उजेडाला सरावेपर्यंत त्याला डोळे उघडून पाहायला थोडा त्रास होणारच होता. ऋतिकाने पटकन काही औषधं इंजेक्शनमधून सलाईनमध्ये सोडली. अभय आता पूर्ण शुद्धीवर आला होता. त्याने डोळे उघडून बघितले. निखिल त्याच्या बाजूलाच बसला होता. ऋतिका समोर उभी होती. त्या दोघांकडे बघून त्याने हलकेच एक स्माईल दिली आणि उठून बसायचा प्रयत्न करू लागला. निखिल त्याला उठून बसायला मदत करू लागला. तसं ऋतिकाने अडवलं,

"अभय, लगेच उठू नकोस. तुला पटकन उठता नाही येणार. थोडा वेळ विश्रांती घे, तुझ्या शरीराला नॉर्मल अवस्थेमध्ये येऊ दे. मग उठून बस. ओके." ऋतिका प्रेमाने त्याला म्हणाली. मोठ्या मुश्किलीने तिने ओठांवर आलेलं म्याऊ हे नाव अडवलं होतं. 

"निखिल, अभयला थोडा वेळ आराम करू दे आता. आपण येऊ थोड्या वेळाने." असं म्हणून ऋतिका बाहेर जायला वळली. पण खरंतर तिला आपल्या डोळ्यांत आलेलं पाणी पुसायचं होतं. अभयच्या नजरेतून हो गोष्ट सुटली नाही, पण त्याला विश्रांतीची गरज असल्यामुळे त्याला थोडी भोवळ आल्यासारखी झाली आणि तो झोपेच्या अधीन झाला. निखिलदेखील त्याला आराम करायला देऊन ऋतिका पाठोपाठ बाहेर आला. 

            ऋतिका कॉरिडॉर मधल्या खिडकीजवळ येऊन उभी होती. खिडकीतून ती धो  धो  कोसळणाऱ्या पावसाला  पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर आनंद होता, एक समाधान होतं. पण डोळ्यांत एकप्रकारची काळजी होती. अस्वस्थता होती. मनात एक बेचैनी कायम होती. डोक्यात विचारांचं थैमान होतं. निखिल तिच्या बाजूला येऊन उभा राहिला. 

"ऋतिका" त्याने तिला आवाज दिला. 

"हंम्म" तिला माहिती होतं निखिल असणार ते, म्हणून तिने नुसता हुंकार भरला. नजर तशीच बाहेर कोसळणाऱ्या पावसावर होती. 

"आता कसं वाटतंय? म्हणजे अभय शुद्धीवर आलाय. तुमच्या समोर आहे तो. काही वेळा मध्ये त्यालाही तुमची खरी ओळख पटेल. तयार आहात ना तुम्ही?" निखिलने तिला विचारले. 

"माहित नाही. एवढे दिवस मी ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होती तो दिवस आज जवळ येऊन ठेपलाय.  पण मनाची तयारी नाही झालीय माझ्या अभयसमोर जायची. त्याला कशा रीतीने भेटू तेच कळत नाहीय. एका बाजूने त्याला भेटायची ओढ कायम आहे तर दुसऱ्या बाजूने त्याची काय प्रतिक्रिया असेल ह्याची भीती आहे. मी जसं त्याची वाट पहिली तशी त्यानेसुद्धा पहिली असेल का रे? जशी मी त्याच्या ओढीने त्याच्याकडे ओढली जात होते तसं त्यालादेखील वाटलं असेल का कधी? जशी माझ्या मनात हुरहूर दाटायची तशी त्यालाही वाटत असेल का रे? असे एक ना अनेक प्रश्न डोक्यांत थैमान घालतायत रे निखिल." ऋतिका आपल्या मनातली घालमेल निखिलला समजावण्याचा प्रयत्न करत होती. 

"ह्याचं उत्तर एकच आहे ऋतिका. होय" असं म्हणून निखिलने तिला अभयबद्दल सगळं सांगून टाकलं. कसं तो तिच्यासाठी वेडा झाला होता. तिच्याबद्दल त्यालाही तीच अनामिक ओढ कायम होती. तोदेखील तिच्या आठवणीने बेचैन व्हायचा. सारखं चिऊ चिऊ करायचा. आपल्या चिऊवरच्या प्रेमात ऋतिका येतेय म्हणून त्याने कसं तिला टाळलं होतं आणि आता त्याचा ऋतिकाला भेटल्यावर ऍक्सीडेन्ट कसा झाला इथपर्यंत सगळं काही. ऋतिका हे सगळं ऐकून अचंबित झाली. आणि एक प्रकारे समाधानदेखील वाटलं तिला. कारण आपल्यासारखाच आपला म्याऊ देखील आपल्यासाठी थांबला होता. खरंच ती ह्या क्षणाला स्वतःला खूप नशीबवान समजत होती. 

                 सगळं सांगून झाल्यावर निखिल ऋतिकाला म्हणाला,

"ऋतिका तुमच्या दोघांमध्ये तीच ओढ होती. तेच एक अदृश्य बंध होते ज्याने तुम्हाला आजतायगत जखडून ठेवले होते. तुम्ही दोघेही आपल्या लहानपणीच्या प्रेमाला विसरलेले नव्हता. उलट परत भेटून पण अनोळखी असताना पण तुमच्यात ती अनामिक भेटीची ओढ कायम होती. पण तुम्ही एकमेकांना ओळखत नसल्यामुळे आणि तुम्हाला माहित नसल्यामुळे तुम्हाला तुमच्या पहिल्या प्रेमाशी विश्वासघात करायचा नव्हता. म्हणून तुम्हाला एकमेकांबद्दल प्रेमाच्या उत्कट भावना  येऊन पण तुम्ही दोघेही आपल्या लहानपणीच्या प्रेमाशी इमानदार राहिलात. खरंच यार. ग्रेट आहात तुम्ही दोघे. नाहीतर आजकालच्या ह्या क्षणिक प्रेमाच्या दुनियेत तुमच्यासारखं एकमेकांपासून दूर राहून पण  एकमेकांशी अतूट राहिलेलं नातं खूप रेअर आहे. हॅट्स ऑफ टू यू" निखिल म्हणाला. 

"निखिल असं काही नाहीय रे. फक्त आपण ज्याच्यावर प्रेम करतो ना त्याच्याशी लॉयल राहण्याची भावना असली ना कि आपण त्याची कितीही वाट पाहू शकतो. हीच तर ताकद असते खऱ्या प्रेमाची, जे आपल्याला दुसऱ्या कोणाचा होऊ नाही देत. मग तो आपल्या जवळ असूदेत किंवा लांब. त्याने काहीच फरक पडत नाही. प्रेम हि खूप सुंदर भावना आहे रे. तू देखील अनुभवलं असशील जर तु कोणावर खरं प्रेम केलं असेल तर." ऋतिका म्हणाली. 

"नाही ना ऋतिका, अजून कोणी तसं भेटलंच नाही खरं प्रेम होण्यासारखं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्या गावच्या नाहीयेत. पण मला तुमच्यासारखे मित्र भेटले ना ह्यातच सगळं आलं. प्यार नही मिला  तो क्या हुआ,यार  तो ऐसे मिले है जो किसी प्यारसे कम नही." निखिल आपल्या नेहमीच्या स्टाईल ने म्हणाला आणि हसू लागला. त्याचं बोलणं ऐकून ऋतिकाला देखील हसू फुटलं. खरंच होतं ते. निखिलसारखा मित्र प्रत्येकाला मिळू दे असच ऋतिकाला वाटलं. 

         त्यांचं बोलणं चालू असतानाच एक नर्स त्यांच्याकडे आली आणि ऋतिकाला म्हणाली,

"डॉक्टर, अभय सरांना जाग आलीय. चला लवकर." 

          तिचा निरोप ऐकून ऋतिका आणि निखिल लगेच जायला निघाले. जाताना निखिलने ऋतिकाला अभयसमोर नॉर्मल राहायला सांगितले. मी सगळं प्लॅन करून करतो व्यवस्थित म्हणून त्याने तिला सध्या तरी काहीच बोलू नका म्हणून बजावले. कारण निखिलला त्याच्या मित्राला एक छान सरप्राईज द्यायचं होतं. 

            अभयला व्यवस्थित जग आली होती आणि तो त्यांचीच वाट बघत होता. त्या दोघांना एकत्र आलेलं पाहून त्याला ह्या दोघांची ओळख कधी झाली हेच कळेना. कारण त्याच्यामते तो काही वेळासाठी बेशुद्ध होता. पण त्याला आता खरं काय ते कळणार होतं. निखिलने अभयला उठून बसायला मदत केली. ऋतिका त्याची सलाईन चेक करत होती. तिने अभयला एकदा तपासले आणि बाजूला उभी राहिली. अभय उठून बसताच निखिलने त्याला मिठी मारली. अभयला समजेना निखिलने त्याला का मिठी मारली ते. म्हणून तो त्याला म्हणाला. 

"काय रे निख्या, काय झालं तुला. अचानक अशी मिठी का मारलीस? आणि डोळ्यांत पाणी का आहे तुझ्या?" अभयला काहीच समजत नव्हतं. 

"काही नाही रे अभ्या असंच. साल्या एवढ्या दिवसांनी तुझ्याशी बोललो ना म्हणून जरा इमोशनल झालो. बाकी काही नाही" निखिल म्हणाला. ऋतिका तिथेच त्यांचा भरतमिलाप बघत  डोळ्यांत येणारं  पाणी थांबवत उभी होती. 

"एवढ्या दिवसांनी म्हणजे? अरे आताच तर माझा ऍक्सीडेन्ट झालेला ना थोड्या वेळापूर्वी. थोडा वेळच तर मी बेशुद्ध होतो ना. मग" अभय गोंधळून म्हणाला. 

तसं निखिलने ऋतिकाकडे पाहिलं. ऋतिकाने त्याला नजरेनेच हे सगळं नॉर्मल आहे असं सांगितलं. तेव्हा तो परत अभयला म्हणाला,

"अभ्या, लेका थोड्या वेळा पूर्वी नाही रे दीड महिन्यापूर्वी तुझा ऍक्सीडेन्ट झालेला होता आणि तू फक्त थोडा वेळ नाही, तर चांगला दीड महिना कोमात होता." 

"काय बोलतोस निख्या? मी कोमामध्ये होतो, ते पण दीड महिना. बापरे! मग मला कसं कळलं नाही ते? "अभय आश्चर्यचकित होऊन म्हणाला. 

त्याचा तो प्रश्न ऐकून ऋतिका खुद्कन हसली. आपला म्याऊ अजुनपण तसाच निरागस आहे हे पाहून तिला बरं वाटलं. 

"अबे ये, कोमात असल्यावर तुला कसं कळेल तू कोमात आहेस ते? काय पण? कोमात जाऊन तुझ्या डोक्यावर तर परिणाम नाय ना झाला?" निखिल त्याला म्हणाला."डॉक्टर चेक करा जरा ह्याला." 

"हो पण मला काय माहिती ते? मी कुठे सारखा सारखा कोमात जातो ते माहित असायला." अभय म्हणाला. 

त्या दोघांचं बोलणं चालू होतं. ते पाहून ऋतिकाला हसायला येत होतं. ह्यांचं असंच बोलणं चालू राहिलं तर अभयला काहीच कळणार नाही आणि निखिलपण त्याला समजावून समजावून दमेल. म्हणून ऋतिकाच पुढे होऊन अभयला  म्हणाली,

"अभय, मी सांगते ऐक. तुझा दीड महिन्यांपूर्वी ऍक्सीडेन्ट झाला होता. तेव्हा तुझ्या डोक्याला खूप मार लागला होता आणि खूप रक्त वाहून गेलं होतं. त्याच्यामुळे तू कोमात गेला होतास. तेव्हापसून तुझ्यावर इथे आमच्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट चालू होती. निखिलपण इथेच असायचा नेहमी. तुझ्या ट्रीटमेंटचा सगळा खर्च त्यानेच केलाय. तुला ह्या स्पेशल रूम मध्ये ठेवण्यापासून ते बाकी सगळ्या गोष्टी त्यानेच केल्यात. खूप काळजी घेतली त्याने तुझी. तू शुद्धीवर यावास म्हणून तो खूप प्रयत्न करत होता." 

             अभय हे सगळं ऐकत होता. निखिलने आपल्यासाठी हे सगळं केलेलं पाहून त्याला आतून खूप बरं वाटलं होतं. ऋतिका इथे डॉक्टर आहे हेही त्याला नव्यानेच कळत होतं. पण त्याला ऋतिकाचं निखिलच्या बाजूने बोलणं जरा अजबच वाटलं. कारण तिला अभयबद्दल खरी माहिती नव्हती. आणि तिचा असच समज होता कि, अभय एक सर्वसामान्य मुलगा आहे आणि निखिल त्याचा श्रीमंत मित्र आहे. आणि आपल्या मैत्रीपायी निखिल हे सगळं करतोय. निखिलने अभयबद्दल खूप गुप्तता बाळगली असल्याने ऋतिकाचा असा समज झाला होता. 

             ऋतिकाचं बोलणं ऐकून अभयने चमकून निखिलकडे बघितलं. त्याने एक डोळा मिचकावत आपले खांदे उडवले. तुझ्याकडे नंतर बघतो मी, आता बाहेर जा तू. असं त्याला नजरेनेच सांगून अभय ऋतिकाला म्हणाला,

"ऋतिका खूप धन्यवाद तुझे. तू हे सगळं माझ्यासाठी केलंस ते. तेही आपली जास्त ओळख नसताना."

"ओळख नाही असं कसं म्हणतोस तू अभय. तुला आठवत नाहीय का आपण ह्याआधीदेखील भेटलोय ते." ऋतिका त्याचं ते अनोळखीपणाचं बोलणं ऐकून कळवळून म्हणाली. 

"हो आठवतंय गं. पण आपली जास्त भेट झालीच कुठे?" अभयचं हृदय ऋतिकाशी बोलताना परत एकदा धडधडू लागलं होतं. 

"हो पण त्या एवढ्याश्या भेटीत पण आपली ओळख झालीच होती ना? हे तू विसरलास का?" ऋतिका स्वतःला कसंतरी थांबवत होती. तिला त्याला आताच सांगावंसं वाटत होतं कि, तूच माझा म्याऊ आहेस अन् मी तुझी चिऊ. त्यासाठी ती धडपडत होती.  

"नाही गं. विसरलेलो नाहीय मी काही. पण काहीतरी होतं जे मला अडवत होतं, म्हणून. . ." अभय बोलता बोलता  मध्येच थांबला. त्याला एवढ्याश्या बोलण्याने पण दम लागला होता. त्याला त्रास झालेला पाहून ऋतिकाने तो विषय तिथेच थांबवला. 

"बरं असू दे अभय. आपण नंतर बोलूयात ह्यावर. आराम कर आता तू." असं म्हणून ऋतिका त्याला आराम करायला सांगून निघून गेली. 

              बाहेर उभा असलेला निखिल ऋतिका  गेल्याचे पाहून लगेच आत आला. त्यांचं बोलणं चालू असताना तो बाहेर निघून गेला होता मघाशी. अभय डोळे बंद करून विचार करत होता. त्याला झोपलेलं पाहून तो खिडकीजवळ जाऊन उभा राहिला. निखिल आल्याची चाहूल लागली म्हणून अभयने डोळे उघडले आणि त्याला आवाज दिला. अभयचा आवाज ऐकून निखिल त्याच्याजवळ आला. 

"अरे तू तर झोपलेलास ना? कशाला उठलास मग? आराम करायचा ना." निखिल म्हणाला. 

"झोप नव्हती लागत यार. ऋतिकापण आताच गेली बाहेर. तिच्याशीच बोलत होतो." अभय म्हणाला. 

"काय बोलली मग तुझी ऋतिका?" निखिल मस्करी करत म्हणाला. 

"माझी ऋतिका? हो का?" अभय एक डोळा वर करत म्हणाला. 

"हो मग, साल्या तुझीच आहे ना. एवढं सगळं करतेय ती बिचारी तुझ्यासाठी. तुझा ऍक्सीडेन्ट झाल्यापासून ते आजपर्यंत तिने काय नाय केलं तुझ्यासाठी. तू कोमात असताना तर सारखं तुझ्याजवळच असायची ती. जास्त कधी घरी देखील जात नव्हती. तू शुद्धीवर आलाय तेव्हा कुठे तिच्या जीवात  जीव आलाय.  नशीब ती डॉक्टर आहे ते,तिने सगळं स्वतः लक्ष देऊन तुझी ट्रीटमेंट केलीय. नशीब काढलंस लेका. एवढी चांगली मुलगी तुझ्यावर जीव ओवाळून टाकतेय. खरंच यार, ऋतिका तुझ्यावर खूप प्रेम करते. कसं ते माहिती नाही, पण तिचा जीव आहेस लेका तू. एवढं तरी मला कळलंय ह्या दिवसांत." निखिल म्हणाला. 

अभय त्याचं ऐकत होता. ऋतिका आपल्यासाठी एवढं सगळं का करतेय, हेच त्याला कळत नव्हतं. मान्य आहे कि,तिलासुद्धा आपल्याबद्दल ओढ असेल पण हे प्रेम वगैरे त्याला सगळं नवीन होतं. निखिल सांगतोय म्हटल्यावर हे खरंच असणार आहे. पण अभयला चिऊ वरचं प्रेम ऋतिकाबद्दल विचार करण्यापासून थांबवत होतं. 

"हा यार ते आहेच, पण निख्या चिऊ असताना मी तिचा विचार नाही करू शकत. भलेही ऋतिका बद्दल मलासुद्धा एक ओढ आहे पण माझं पाहिलं प्रेम चिऊच आहे. मी फक्त तिचाच आहे. तिला मी फसवू नाही शकत निख्या." अभय म्हणाला. 

"हो अभ्या माहितीय मला, पण चिऊ कधी भेटणार तुला. तू साधं तिला शोधण्याचा प्रयत्न पण नाही केलास ह्या दिवसांत. फक्त चिऊची आठवण काढून ती तुझ्या जवळ येणार आहे का?" निखिल त्याला डिवचत म्हणाला. 

"अरे निख्या मीआपल्या कंपनीच्या कामात बिझी होतो. माहितीय ना तुला. मग. आणि आता तिला मी कसंही करून शोधणारच आहे. नाही राहू शकत मी आता तिच्याशिवाय" अभय म्हणाला. 

"हो अभ्या. पण एक सांगू,  तिला आता तुला शोधायची गरज नाहीय. फक्त मनापासून तिला हाक मार. ती इथेच आहे जवळपास तुझ्या. तुझी हाक ऐकून ती नक्कीच येईल तुझ्याकडे. असं माझं मन सांगतंय." निखिल अभयला थोडाफार अंदाज देत होता. म्हणून त्याने त्याला कोड्यात सांगितले. डायरेक्ट सांगितलं असतं तर काही मजाच राहिली नसती त्याच्या सरप्राईजची. 

"तुला कसं माहिती निख्या?" अभयने प्रश्न केला. 

"असंच रे. मला आतून असं वाटतंय. का? मन काय फक्त तुलाच एकट्याला आहे का? तुलाच घडणाऱ्या गोष्टींचा अंदाज येऊ शकतो का फक्त साल्या?  अपना भी सिक्स्थ सेन्स काम करता है भिडू " निखिल म्हणाला. 

"अच्छा हो का? क्या बात है. तुझा सिक्स्थ सेन्स कधीपासून काम करायला लागला रे निख्या" असं म्हणून अभय हसायला लागला. त्याला  निखिलपण हसायला लागला. 

"बरं निख्या मला एक सांग, ऋतिका मघाशी असं का म्हणत होती तुझ्याबद्दल कि, तू माझी सगळी ट्रीटमेंट केलीय. सगळं खर्च तू केलायस माझा आणि बाकी सगळं. तू काय सांगितलंय तिला नेमकं माझ्याबद्दल. मी कोण आहे हे सांगितलेलं तर दिसत नाहीय तू. मग दुसरं काय सांगितलंस तिला?" अभयने मघाशी त्याच्या मनात आलेला प्रश्न विचारला. 

तसा निखिल अजूनच हसायला लागला. 

"हसतोय काय निख्या? सांग कि मुर्खा, तिला काय भलतंसलतं नाय ना सांगितलंस माझ्याबद्दल काही?" अभय म्हणाला. 

"नाही रे अभ्या. मी तिला काहीच नाही सांगितलंय. उलट तू कोण आहेस हे मी सगळ्यांपासून लपवून ठेवलंय. एवढं कि हॉस्पिटलच्या समोर असलेल्या आपल्या ब्रँच ऑफिसमध्ये पण अजून महित नाहीय कि, तुझा ऍक्सीडेन्ट झालेला ते. आजीला पण नाही सांगितलंय अजून. फक्त बॉबी अंकलना सांगितलंय आणि त्यांना अभय आणि मी कंपनीच्या कामानिमित्त अचानक बाहेरगावी जायला लागलं असं सांगायला सांगितलं. आपल्या काही ठराविक गार्ड्सनाच फक्त माहितीय हे. नको काळजी करुस. मी सगळी सेक्युरिटी घेतलीय. आणि ऋतिकाचं म्हणशील तर तिला तू नक्की कोण आहेस ते माहिती नाहीय. तिला असंच वाटतंय कि, तू एक सामान्य माणूस आहे जो तिला ह्या आधी काही वर्षांपूर्वी भेटला होता. आणि ती मला ओळखत नव्हती म्हणून तिला असं वाटतंय कि, मी एक फार मोठा श्रीमंत माणूस आहे आणि तू माझा एक गरीब मित्र आहेस. तुझा ऍक्सीडेन्ट झाला तेव्हा मी तिथे नशिबाने होतो आणि नंतर मैत्रीखातर मीच तुझी या हॉस्पिटलमध्ये  चांगल्या प्रकारची ट्रीटमेंट करतोय. म्हणून तुला मघाशी ती तसं म्हणाली."

निखिलचं बोलणं ऐकून अभयला हसूच आलं.

"अच्छा असं आहे तर. मी ह्या एका श्रीमंताचा गरीब मित्र आहे तर. गुड." अभय निखिलला टोमणा मारत म्हणाला. 

"अरे मी थोडी सांगितलं तिला. तिनेच स्वतःच तो समज करून घेतला. मग मी तरी कशाला काय बोलू. नंतर तू आणि ती बघून घेशील म्हणून मी जसं आहे तसं ठीकच म्हटलं." अभयचा टोमणा निखिलला लागला होता. 

"निख्या अरे मस्करी करतोय. मस्त काम केलंस लेका. बरं झालं तू तिला कळू नाही दिलंस ते आणि बाकीच्यांना पण." अभय निखिलचं कौतुक करत म्हणाला. 

"हा फिर ठीक है, तेरे लिये इतना तो कर हि सकता हू  मेरे यार." असं म्हणून निखिलने अभयच्या हात थोपटला. 

"हा मेरे भाई." असं म्हणून अभय निखिलला मिठी मारायला गेला. पण ते त्याला जमलंच नाही. कारण त्याला अजून स्वतःहून उठून बसता येत नव्हतं. म्हणून मग निखिलनेच त्याला हसून मिठी मारली. 

               ऋतिका अभयशी कसं बोलायचं त्याचा विचार करत होती.  ह्यामध्ये निखिल तिची मदत करणार होता. पण तरीसुद्धा आपल्यालाच त्याला सामोरं जायचं होतं. आपल्याला आपल्याच प्रेमाला  भेटायला भीती का वाटावी, ह्याचंच तिला आश्चर्य वाटलं.  तेही खरंच होतं म्हणा. तिला तशी भीती वाटणं स्वाभाविकच होतं. कारण अभयला ती अगोदर भेटली होती आणि त्याच्याबद्दल नाही म्हटलं तरी तिच्या मनात प्रेमभावना आल्या होत्या. आणि आता तिला तोच अभय तिचा म्याऊ आहे कळल्यावर त्याच्या समोर जायची भीती वाटत होती. कारण अप्रत्यक्षपणे आपण त्याला फसवल्याची भावना तिच्या मनात घर करत होती. तो काय विचार करेल  आपल्याबद्दल? आपण त्याला फसवलं असं तर त्याला वाटणार नाही ना? ह्याची एक अनामिक भीती तिला वाटत होती. त्याला भेटायच्या ओढीची जागा आता भीतीने घेतली होती.

                 अभयला ह्या बद्दल काही कल्पनाच नव्हती. तो फक्त ऋतिका आणि चिऊचाच विचार करत होता. चिऊला कसं शोधता येईल हेच तो बघत होता. आणि त्याबरोबरच ऋतिकाबद्दलच्या त्याच्या भावनांना तो समजून घ्यायचा प्रयत्न करत होता. 

                आणि इकडे निखिल ऋतिका आणि अभयला, अर्थातच चिऊ आणि म्याऊला कसं  भेटवता येईल ह्याचं प्लॅनिंग करत होता. त्याला त्यांची लवकरात लवकर भेट घडवून आणायची होती. तो त्याच विचारात होता. कारण लहानपणी एकमेकांपासून वेगळे झालेले दोन प्रेमी जीव आता भेटणार होते. त्यांची ती भेट अविस्मरणीय व्हावी अशी  निखिलची मनापासूनची प्रामाणिक इच्छा होती. आपल्या जिवलग मित्राला त्याचं प्रेम इतक्या वर्षांनी परत भेटणार म्हटल्यावर त्याला खूप आनंद झाला होता. फक्त त्यांचा तो  पुनर्मीलन सोहळा लवकरच पार पडावा ह्याचा तो विचार  करत होता.

Saturday, May 1, 2021

अनोळखी हे प्रेम - Part 9

             आज जवळपास दीड महिना उलटून गेला होता. अभय अजून शुद्धीवर आला नव्हता. निखिल आणि ऋतिका नेहमी अभयजवळच असत. निखिल कंपनीची सगळी जबाबदारी घेऊन काम करत होता. अभयसारखं जमत नव्हतं, पण बॉबी अंकलच्या मदतीने तो करत होता. त्याने कसबसं सगळं व्यवस्थित हाताळलं होतं. कंपनीची जबाबदारी, अभयची काळजी घेणं हे तो सख्या भावापेक्षा जास्त करत होता. ते खरंच  म्हणतात, देव ज्यांना आपल्या रक्ताच्या नात्यात बांधायला विसरतो त्यांना मित्र म्हणून पाठवतो. निखिल अभयला मित्रापेक्षा जास्त जपत होता. कारण अभयने त्याला काळजाशी लावलं होतं आणि तोही अभयला आपल्या जिगरका टूकडाच मानत होता. बस, आता अभय लवकरात लवकर शुद्धीवर यावी म्हणून तो देवाला विनवत होता.  

               ऋतिकाने तर अभयच्या काळजीमध्ये सगळ्या गोष्टी करून पहिल्या होत्या. गणपती बाप्पाला विनवण्यापासून ते उपासतापास सगळं केलं होतं. आपण हे सगळं का करतोय हेच तिला कळत नव्हतं. तिच्याही नकळत ती ह्या सगळ्या गोष्टी करत होती. ह्याचंच तिला जास्त आश्चर्य होतं. आपल्या केबिनमध्ये असली कि, म्याऊच्या फोटोकडे बघत त्याच्या आठवणींमध्ये गुंतलेली असायची आणि अभयकडे असली कि त्याच्या काळजीत असायची. तिच्या मनाची नुसती घालमेल चालू होती. मन सारखं अभयकडे ओढ घ्यायचं, पण म्याऊ आठवला कि लगेच माघारपण घ्यायचं. विश्वासघाताची भावना लगेच तिच्या मनात घर करायची. तिला हेच कळायचं नाही, कि आपण अभयसाठी एवढं सगळं का करतोय? उत्तरादाखल तिला एवढंच मिळायचं कि आपल्याला त्याच्याबद्दल एक अनामिक ओढ आहे. एक अनोळखी नातं आहे आपल्यात. जे तिच्याकडून हे सगळं करवून घेतंय. 

                   नेहमीप्रमाणे आजपण सकाळी सकाळी ऋतिका मंदिरात गेली होती. बाप्पांचा आशीर्वाद घेऊन प्रसाद घेण्यासाठी ती महाराजांकडे वळली, तसं तिला जाणवलं कि ते  तिच्याकडेच  एक गूढ हास्य घेऊन  बघत आहेत. ते महाराज तिच्या चांगलेच ओळखीचे होते. ती मंदिरात रोज येत असल्यामुळे महाराज तिला ओळखत होते. बाप्पांचं दर्शन घेऊन त्यांच्याकडून प्रसाद घेऊनच ती जात असे. त्यामुळे त्यांना तसं हसताना पाहून ऋतिका त्यांना विचारणार इतक्याच तेच तिला म्हणाले, 
"खूप विचार आहेत ना डोक्यात. आपण काय करतोय? कशासाठी करतोय? हे कळत नसताना सुद्धा सगळं तू निःस्वार्थपणे करतेयस. त्याचंच फळ तुला लवकर मिळणार आहे पोरी. जवळ आहेस खूप तू. इतकी कि फक्त एक पातळ पडदा आहे मध्ये. तो हटला कि तुला तुझं इच्छित फळ मिळेल."

त्यांच्या बोलण्याचा अर्थ न समजून ऋतिका म्हणाली,
"काय बाबा, काय मिळणार आहे? कसलं फळ? कशाच्या जवळ आहे मी " 

"इतके दिवस ज्याची तू वाट पाहिलीस तो अगदी जवळ आलाय तुझ्या. इतका जवळ कि तुझ्या डोळ्यांसमोर आहे तो. फक्त ओळख पोरी. त्याला ओळखलंस कि, सगळं कोडं सुटून जाईल तुझ्या मनातलं." असं बोलून बाबा तिला प्रसाद देऊन आणि आशीर्वाद देऊन मंदिराच्या गाभाऱ्यात निघून गेले. 

             आपल्याबद्दल ह्यांना कसं कळलं? आणि इतके दिवस ते काहीच कसे नाही बोलले आपल्याला? ह्याचं तिला आश्चर्य वाटलं. त्यांच्या बोलण्याच्या विचार करण्याच्या नादात ते कधी निघून गेले तिला समजलंच नाही. त्यांना विचारावं म्हणून ती त्यांना शोधू लागली. पण तिला ते दिसलेच नाहीत. म्हणून मग ती नाईलाजाने शेवटी ती परत एकदा गणपती बाप्पांच्या पाय पडून निघाली. 

               मंदिरातल्या महाराजांच्या बोलण्याचा ती हॉस्पिटलला पोहचेपर्यंत विचार करत होती. त्यांना नक्की काय सुचवायचे आहे हे तिला कळेचना. आपण जवळ आहोत खूप. भेटणार आहे आपल्याला तो. समोरच आहे तो आपल्या. पण कुठे. जर ते महाराज म्याऊ बद्दल बोलत असतील तर कुठे आहे तो. आणि आपल्याला कसं ओळखता नाही आलं मग? तिला एक वेळ असंही वाटलं, कि ते अभयबद्दल तर बोलत नसावेत. पण हे शक्य नाही. कारण तिला त्याबद्दल खात्री वाटत नव्हती. ह्याबद्दल तिने याआधीही विचार केला होता. त्यामुळे तिला माहिती होतं कि तो अभय नाहीय ते. पण मग जर अभय नसेल तर आणखी कोण आपल्या जवळ आहे ज्याची आपल्याला हल्ली नवीनच ओळख झालीय. विचार करता करता तिला आठवलं, निखिल ! कदाचित  तो निखिल तर नसेल. हो निखिल. कारण त्याच्याशी आपली इतक्या कमी वेळात खूप चांगली ओळख झालीय. आपण आजवर कुणाशी इतक्या चांगल्या प्रकारे मिसळलो नव्हतो. निखिलसोबतआपली खूपच चांगली मैत्री जुळलीय. पण मग जर निखिल म्याऊ असता तर आपल्याला अभयबद्दल ती अनामिक ओढ का वाटतेय? आपण त्याच्यात का एवढं गुंततोय? त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये एवढी ओढ का आहे? नाही तो निखिल नसेल. जर तो अभय नाहीय असं आपल्याला वाटतं आणि तो निखिलसुद्धा नाहीय मग आपला म्याऊ नक्की आहे तरी कोण? 

                 विचार करून करून ऋतिकाचं डोकं बधिर झालं होतं. ह्या सगळ्याचा सोक्षमोक्ष लावायचाच असं ठरवून तिने आजच्या दिवसाला सुरुवात केली. अभयशी तर काही बोलता येणार नाही, कारण तो शुद्धीवर नाहीय आणि निखिलशी बोलायचं तर आजच बोलून घेऊ असं तिने ठरवलं.  त्यासाठी तिला वेगळा वेळ काढावा लागणार होता. म्हणून तिने तिच्या हॉस्पिटलमधल्या सगळ्या अपॉईंटमेंट्स पटापट उरकून घेतल्या आणि मोकळी झाली. तिच्या नशिबाने तिला आज फार काही अपॉईंटमेंट्स नव्हत्या आणि फक्त रुटीन चेकअप. ते तिने पटकन यावरून घेतलं. आपण एवढ्या पटापट काम करू शकतो ह्याचं तिला आश्चर्यच वाटलं. कारण याआधी तिने अशी घाई कधीच केली नव्हती. प्रत्येक पेशण्टशी व्यवस्थित बोलून सावकाश त्यांच्यावर ट्रीटमेंट करत होती. 

            तिने घडाळ्यात पहिले तर चार वाजले होते. म्हणजे अजून तिला तिच्या क्लिनिकला जायला भरपूर वेळ होता. चांगले तीन तास तिच्या हातात होते. त्याचा उपयोग करून ती निखिलशी सगळं बोलणार होती. फक्त मनोमन एकच प्रार्थना करत होती, कि मध्येच काही इमरजेंसी  नको यायला. नाहीतर परत असा  वेळ तिला लवकर भेटणार नव्हता. 

           ऋतिका अभयच्या रूम मध्ये आली तेव्हा तिथे निखिल नव्हता. बहुतेक त्याच्या कामासाठी बाहेर गेला असेल. आज तिच्याकडे मोकळा वेळ असल्यामुळे ती एक एक गोष्ट न्याहाळू लागली. अभय गाढ झोपेत असल्यासारखा पडून होता. गेला दीड महिना तो अशाच गाढ झोपेत होता. ती त्याच्या बेड जवळ असलेल्या सोफ्यावर बसली. अभयकडे पाहून तिला कसनुसंच झालं. प्रत्येक वेळेला हा आपल्याला भेटतो आणि लगेच दूर निघून जातो. ह्यावेळेस भेटला आणि जवळ असूनपण  असा दूरच राहिला.  आणि आपला म्याऊ तर अजून भेटलेलाच नाहीय आपल्याला. ती विचार करत करत रूम मध्ये नजर फिरवत होती. इतके दिवस आपण असं निवांत बसलोच नव्हतो अभयजवळ. अभय असलेली रूम चांगली ऐसपैस होती. प्रत्येक आधुनिक उपचारपद्धतीची साधनं तिथे  होती. प्रत्येक वेळेला लागणारी औषधं आणि इंजेक्शनं आधीपासूनच आणून ठेवली होती. एका कोपऱ्यात वरती मस्त रूमफ्रेशनर लावलेला होता. त्याचा मंद सुगंध दरवळत होता. त्यामुळे तिला क्षणभर आपण हॉस्पिटलमध्ये नाहीच आहोत असा भास झाला. कारण बाहेरच्या वातावरणात आणि त्या रूमच्या वातावरणात खूप फरक होता. त्याच्या रूमला मोठ्या मोठ्या हवेशीर खिडक्या होत्या, पण त्याची एसी रूम असल्यामुळे त्या बंद होत्या. तिने त्यावरील पडदे बाजूला सारले तशी  संध्याकाळची  सूर्याची कोवळी किरणं आत शिरली. आपल्या हॉस्पिटलने अभय साठी  एवढी प्रशस्त आणि आधुनिक रूम का दिली हेच तिला कळलं नाही. आपल्या हॉस्पिटलध्ये अशा रूम्स फक्त श्रीमंत, खूप श्रीमंत लोकांसाठी दिल्या जातात हे तिला माहिती होतं आणि अभय तिला वाटत नव्हतं कि तो इतका श्रीमंत असावा. त्याच्या रूमच्या बाहेर नेहमी असणाऱ्या दोन गार्ड्सना बघून तिला थोडं खटकलंच होतं. पण तिने चाललेल्या गोंधळामुळे एवढं लक्ष दिलं नव्हतं. कदाचित निखिलने केलं असेल त्याच्यासाठी. तसंपण निखिल आहेच म्हणा श्रीमंत, त्याने केलं असेल आपल्या मित्रासाठी. असाही विचार तिच्या मनात डोकावला. पण असो. प्रश्न तो नाहीय. आपल्याला अभयशी घेणंदेणं आहे,  त्याच्या कोण असण्याशी नाही. असं म्हणून मनात येऊ पाहणारा गरीब श्रीमंत भेदभावाचा विचार तिने तात्काळ झटकून टाकला.  
             
              ऋतिका अभयच्या रूम मध्ये पाहून निखिलला आश्चर्य वाटलं नाही. पण ती अशी निवांत बसलेली पाहून गोंधळला.  कारण अभयच्या रूमचा ऍक्सेस फक्त निखिल आणि ऋतिका जवळ आणि हॉस्पिटलमधल्या काही ठराविक लोकांजवळच होता. त्यानेच तशी सुरक्षितता करवून घेतली होती. निखिल आलेला पाहून ऋतिका त्याच्याजवळ आली. तिला तसं पाहून निखिलला वाटलं कि खास त्याच्याशी बोलायलाच आली आहे. तसं असेल तर निखिलला देखील बरंच होतं. कारण तो हि त्याचीच वाट बघत होता. शेवटी त्यालाही काही गोष्टी अभयच्या वतीने स्पष्ट करायच्या होत्या. 

"हाय निखिल." ऋतिका म्हणाली. 

"बोला, डॉक्टरसाहेब. आज निवांत दिसताय." निखिल शक्य तितका मोकळेपणा ठेवायच्या प्रयत्नाने म्हणाला. 

"हो. ते आज काही खास काम नव्हतं आणि माझी कामंदेखील झाली होती सगळी. फ्री होते म्हणून म्हटलं इथे यावं जरा वेळ." ऋतिका म्हणाली. 

"अच्छा म्हणजे डॉक्टरांना पण फ्री वेळ भेटतो तर" असं म्हणून निखिल डोळे मिचकावत हसला. 

"हो म्हणजे भेटतो कधी तरी. शेवटी नाही म्हटलं तरी आम्ही पण माणसंच आहोत ना आणि आम्हालाही वाटतं थोडा वेळ आम्हालाही मोकळा भेटावा. नाही का ? " ऋतिका पण निखिलच्या हसण्यात सामील होत म्हणाली. 

"म्हणजे काय डॉक्टर. जरूर जरूर. उलट मी तर म्हणतो कि डॉक्टरांसाठीपण आमच्या सारखे काही ठराविक तास असायला हवेत. किती प्रेशर असतं तुमच्या लोकांना. हा झाला कि तो पेशंट तो झाला कि परत दुसरा. सारखी लाईनच असते पेशंट्सची." 

"तसं असून कसं चालेल निखिल. जर आम्हाला असे ठराविक काम करायची सवय लागली तर एखाद्या इमरजेंसीच्या वेळेस कोणी उपलब्ध नाही होणार. कारण कधी काही इमरजेंसी येईल ते सांगू नाही शकत. म्हणून आम्हाला दिवसातल्या कुठल्याही वेळेला पेशंट सांभाळण्यासाठी तयार असावं लागतं. नाहीतर मग लोकांचा डॉक्टरांवरील विश्वास उडून ते अंधश्रद्धेकडे वळायला वेळ नाही लागणार."  ऋतिका म्हणाली. 

"हो डॉक्टर, ते पण आहेच. म्हणून तर तुम्हा डॉक्टर लोकांना समाजात एक वेगळाच मान आहे. सॅल्यूट टू यू" असं म्हणून निखिलने ऋतिकाला सॅल्यूट ठोकला.

"काहीतरीच काय निखिल. कर हात खाली तो आधी " असं म्हणून ऋतिका हसायला लागली. कारण निखिल सेम शाळेतल्या मुलासारखा वेडावाकडा हात डोक्याला लावून सॅल्यूट ठोकून उभा होता. ते पाहून ऋतिकाला हसायला येत होतं. निखिल पण हसू लागला. 

हसता हसता तो ऋतिकाला म्हणाला,
"डॉक्टर, अजून किती दिवस लागतील माझ्या मित्राला ह्यातून बाहेर पडायला." निखिलचं लक्ष अभयकडे होतं. त्याला असं मध्येच इमोशनल झालेलं पाहून ऋतिका म्हणाली,
"आपल्या हातामध्ये नाहीय ते निखिल. ते सगळं बाप्पाच्या हातात आहे. आम्ही जेवढं होईल तेवढं सगळं ट्राय करतच आहोत. जेवढी बेस्ट ट्रीटमेंट देता येईल तेवढी आम्ही देतोय. बाकी सगळं त्याच्या हातात आहे."

"हम्म" असं म्हणून निखिल अभजवळ जाऊन बसला. त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाला,"अभ्या यार उठ लवकर. अजून किती दिवस असा झोपून काढणारेस साल्या. उठ यार. तुझ्याशिवाय मन नाही लागत. तूच म्हणतो ना, तुझ्याशिवाय कोणी मित्र नाही माझा. पण हे तुला कसं नाही माहित कि, मलापण तुझ्याशिवाय कुठला मित्र नाहीय. तू अकेलाही मेरी जान है यार. उठ जा यार." असं म्हणून त्याच्या डोळ्यांतून येणारं पाणी पुसायला तो ऋतिकाकडे पाठ करून खिकडीजवळ जाऊन उभा राहिला. 

त्याला तसं इमोशनल झालेला पाहून ऋतिकाला खूप वाईट वाटलं. पण ती तरी काय करू शकत होती. निखिलला सावरण्यासाठी ती त्याला म्हणाली,
"निखिल, सावर स्वतःला. येईल अभय लवकरच शुद्धीवर. मलादेखील त्याची खूप काळजी वाटतेय. तो लवकरात लवकर शुद्धीवर यावा यासाठी मी पण खूप प्रयत्न करतेय.  पण मीसुद्धा हतबल आहे रे." असं म्हणून ती सुद्धा भावनेच्या भरात काही बोलू न शकल्यामुळे शांत झाली. 

"हो. माहितीय मला डॉक्टर. पाहत आलोय मी सगळं. ऍक्सीडेन्ट झाल्या क्षणापासून तुम्ही अभय साठी खूप काही केलंय. त्यासाठी खरंच मी खूप आभारी आहे तुमचा. पण डॉक्टर एक विचारू तुम्हाला?" निखिलने हीच योग्य वेळ असं समजून ऋतिकाला विचारले. 

"हो विचार ना निखिल? परवानगी काय घेतोयस?" ऋतिका स्वतःला नॉर्मल करत म्हणाली. 

"नाही म्हणजे थोडं पर्सनल आहे म्हणून" निखिल सावधगिरीने म्हणाला. 

"अरे आता आपण चांगले मित्र आहोत. सो डोन्ट वरी. विचार बिनधास्त" ऋतिका म्हणाली. 

"तुम्ही अभयला ओळखता का? म्हणजे कधीपासून ओळखता त्याला?" निखिलने पहिला प्रश्न केला. 

"हो ओळखते मी त्याला. म्हणजे असं पक्कं नाही सांगता येणार. पण काही वर्षांपूर्वी असाच अभय एकदा आमच्या घराजवळ ऍक्सीडेन्ट झालेला म्हणून भेटला होता. त्याच्यासोबत आणखी एकजण होता. तेव्हा मी  एम.बी.बी. एस. करत होते." ऋतिका म्हणाली. 

"अच्छा, म्हणजे फक्त एकदाच भेटलेलात तुम्ही?" निखिलने परत प्रश्न केला. 
 
"नाही. त्यांनतर परत एकदा आलेला तो. बहुतेक कुठंतरी बाहेर चाललेला तो. कदाचित त्यासाठीच तो मला भेटायला आला असेल. करणं त्यांनतर तो परत कधीच दिसला नाही आणि  भेटला ते आताच आणि तेही असं झालं" ऋतिका आठवत म्हणाली. 

"हम्म बरं. पण एवढीच ओळख आहे तुमची तर. मग तुम्ही एवढ्या काळजीने आणि आपुलकीने अभयसाठी एवढं सगळं का करताय? म्हणजे मला असं वाटलं कि तो तुमच्या खूप जवळचा असेल वगैरे"  निखिलने परत प्रश्न केला. त्याला आज माहिती करूनच घ्यायचं होतं सगळं. 

"जवळचा असं काही नाही. पण अभयला जेव्हा पहिल्यांदा बघितलं होतं, तेव्हाच त्याच्याकडे मी एका अनामिक ओढीने खेचली गेले होते. का माहिती नाही, पण अभय मला माझ्या एका खूप जवळच्या अशा मित्रासारखा वाटला. त्याला पहिल्यांदा भेटून असं वाटतच नव्हतं, कि तो मला आताच भेटलाय. असं वाटत होतं कि,त्याच्याशी आपलं खूप जुनं नातं आहे. खूप जुनी ओळख आहे. आणि सोबतच एक अनामिक हुरहूर वाटत होती मनात. मी स्वतःला त्याचा विचार करण्यावाचून थांबवू नाही शकले. गंमत म्हणजे तेव्हादेखील त्याचा ऍक्सिडेंटच झाला होता. तेव्हादेखील मला त्याच्याबद्दल अशीच काळजी वाटत होती. जशी आता वाटतेय. जेव्हा तो परत गेला तेव्हा तो परत कधी भेटेल ह्याच्या प्रतीक्षेत मी होते. माझं मन सारखं त्याचाच विचार करत असे. त्याच्याचकडे सारखी ओढ घेत असे. एक अशी हुरहूर दाटून येत असे सारखी. जणूकाही तो माझा जिवलगच आहे कोणतरी. पण हे शक्य नव्हतं. कारण माझा जिवलग दुसराच कोणीतरी होता. म्हणून मी माझ्या मनाला अभयचा विचार करण्यापासून कसंतरी  थांबवलं. कारण मला त्याच्याशी प्रतारणा  करायची नव्हती. माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे म्हणूनच मी तेव्हा अभयचा विचार करणं सोडून दिलं होतं. पण ह्यावेळेस पण नेमकं तेच घडतंय. अभय समोर आला, कि सारखा त्याचाच विचार येतोय मनात. माझं मन पाहिल्यासारखंच त्याच्याकडे झेप घेतंय. त्याच्या  ओढीने कासावीस होतंय. तीच हुरहूर परत दाटून येतेय मनात. आणि आताही माझं प्रेम मला त्याचा विचार करण्यापासून थांबवतंय. अडकली आहे पूर्ण मी ह्या द्विधेमध्ये. नक्की काहीच कळत नाहीय मला. काय चाललंय माझं ते. एकीकडे माझं प्रेम आहे आणि एकीकडे हा अभय." ऋतिका बोलता बोलता  मध्येच थांबली. बोलताना तिने आपल्या मनातल्या खूप साऱ्या गोष्टी बाहेर काढल्या होत्या. ज्या तिने कधीच कोणाला बोलून नव्हत्या दाखवल्या. पण शेवटी त्या स्वतःहूनच बाहेर आल्या होत्या. आज पहिल्यांदा तिने आपलं मन मोकळं केलेलं होतं कोणासमोरतरी. अजून तिला खूप काही सांगायचं होतं तिला निखिलला आणि विचारायचं देखील होतं. पण त्याआधी आपल्या मनातलं जे बाहेर येतंय ते आधी तिने मोकळं करायचं ठरवलं. 

          निखिलला हे सगळं अपेक्षितच जणू काही. कारण त्याला पहिल्यापासून हे समजलं होतं. अभय आणि ऋतिका एकमेकांविषयी अगदी सारखाच  विचार करतात. दोघेही एकमेकांना त्याच ओढीने  भेटायचा प्रयत्न करतात पण शेवटी आपल्या लहानपणीच्या प्रेमापायी आणि त्यांना ते माहित नसल्या कारणाने स्वतःला अडवतात. ऋतिकाला अभयबद्दल तितकीच ओढ आहे जितकी अभयला आहे. तिचाही जीव अभयकडे तितकाच ओढला जातो जितका अभयचा तिच्याकडे. जसं अभय तिच्याविषयी बोलायचा  सगळं तसंच अगदी जसाच्या तसं ऋतिकाने निखिलला सांगितलं होतं. आता फक्त ऋतिका कडून चिऊ आणि म्याऊ हे दोन शब्द ऐकायचे होते त्याला. म्हणजे त्याला हे निश्चित झालं असतं कि दोघेही तेच चिऊ आणि म्याऊ आहेत. 

"बरं ऋतिका. चालेल ना डॉक्टर तुम्हाला ऋतिका म्हटलेलं" निखिलला पुढे आणखी जाणून घ्यायचं होतं. म्हणून तो ऋतिकाला तयार करत होता. 

"मी तर तुला तेच सांगतेय कधीपासून. आपण आता मित्र आहोत. मला ऋतिकाच म्हण. पण तूच ऐकत नव्हतास. सारखं तेच डॉक्टर डॉक्टर करत होतास." ऋतिका हलकेच नाक फुगवून म्हणाली. 

"बरं चालेल, मी तुम्हाला ऋतिकाच म्हणेन." निखिल हसत म्हणाला. 

"हो पण ते तुम्ही तुम्ही करतोय ना ते पण बंद कर नाहीतर मग डॉक्टरच ठीक आहे." ऋतिका म्हणाली. 

"नाही ऋतिका.  आता सवय झालीय त्याची त्यामुळे अरेतुरे करणं नाही जमणार नाही मला. मी तुम्हाला हृतिकच म्हणेन पण तुम्ही वगैरे करूनच. शेवटी तुम्ही वाहिनी आहात माझ्या." शेवटचं वाक्य निखिल तोंडातल्या तोंडात म्हणाला म्हणून ते ऋतिकाला ऐकू नाही आलं. 

"हं, बरं ठीक आहे. तुला जमेल तसं." ऋतिका म्हणाली. 

"पुढे काय ऋतिका मग?" निखिलने आणखी जाणून घेण्यासाठी तिला प्रश्न केला. 

"म्हणजे?" ऋतिकाला न कळून तिने विचारले. 

"म्हणजे हेच कि एवढंच आहे तुमच्या मनातलं कि अजून आहे काही." निखिल आपला गुगली टाकत म्हणाला. 

"हो आहे कि, सांगायचं आहे अजून तुला. कारण आज पाहिल्यांदा मी माझं मन मोकळं करतेय. पण त्याआधी थोडी रिफ्रेशमेंटची गरज आहे." ऋतिका असं म्हणून तिने दोन कॉफी आणायला सांगितल्या. निखिलला पण त्याची गरज होतीच म्हणा. 

               पाचच मिनिटांत एकजण दोन वाफाळत्या कॉफीचे मग घेऊन आला. ती कॉफी घेऊन ऋतिकाला जरा तरतरी आली. आणि ती पुढे सांगू लागली. 

"निखिल तुला माहितीय, मी अभयला का टाळतेय?" ऋतिकाने निखिलला प्रश्न केला. त्यावर निखिलने नकारार्थी मन हलवली. 

"कारण माझं पहिलं प्रेम" ऋतिका म्हणाली. 

"अच्छा म्हणजे तुम्ही दुसऱ्या कोणावर तरी प्रेम करताय तर, आणि त्याच्यावरच्या प्रेमामुळे तुम्ही अभयला टाळताय. बरोबर ना?" निखिल ऋतिकाच्या बोलण्यात सहभागी होत होता. 

"हो." ऋतिका म्हणाली. 

"मग कोण आहे तो नशीबवान जो तुमचं पाहिलं प्रेम आहे. मला पण एकदा भेटायचं आहे त्याला." निखिल म्हणाला. 

"नाही भेटू शकत तू त्याला. कारण मलाच तो अजून भेटलेला नाहीय." ऋतिका उदास होत म्हणाली. 

"म्हणजे? मी समजलो नाही." निखिल न कळण्याचा आव आणत म्हणाला. 

" म्हणजे,  माझं पाहिलं प्रेम म्हणजे माझा लहानपणीचा मित्र आहे. म्याऊ त्याचं नाव." ऋतिका म्हणाली तसं अभयने जोरात श्वास घेतल्यासारखा आवाज आला. ऋतिकाने आणि निखिलने एकदमच तिकडे बघतीलं आणि त्याच्याजवळ आले. पण कसलीच हालचाल नाही हे पाहून ऋतिकाने त्याला तपासलं. त्यांना वाटलं कि भास झाला असेल, म्हणून ते परत खिडकीजवळ आले. 

तिच्या तोंडून म्याऊ हे नाव ऐकताच निखिलला खात्री पटली, कि ऋतिकाच चिऊ आहे. त्याला खूप आनंद झाला. पण चेहऱ्यावर तसं न दाखवता तो ऋतिकाचं पुढचं बोलणं ऐकू लागलं. तिने निखिलला चिऊ आणि म्याऊबद्दल सगळं सांगितलं. आणि शेवटी म्हणाली,
"आम्ही लहान असताना तो अचानकच तो एक दिवस न सांगता कुठंतरी निघून गेला.  ते अजून त्याचा काहीच पत्ता नाहीय. मी नंतर त्याला खूप शोधलं, पण त्याचा काहीच पत्ता नाही लागला. मग शेवटी त्याला शोधून शोधून तो परत येईल म्हणून मी त्याची वाट पाहण्याचं ठरवलं. अभय जेव्हा भेटला तेव्हा मला एकवेळ असंच वाटलं तोच माझा म्याऊ असावा. त्याच्याशी एकदा बोलेन ह्यावर म्हटलं तर तो परत मला भेटलाच नाही. आणि तो आता काही विचारायच्या अवस्थेमध्ये पण नाहीय. म्हणून मी तुझ्याशी बोलायचं ठरवलं." ऋतिका म्हणाली. 

"हो बरं केलंत ते तुम्ही तुमचं मन मोकळं केलंत ते. कदाचित मी तुमची काही मदत करू शकतो यामध्ये. आपण दोघे मिळून तुमच्या म्याऊला शोधुयात चला." निखिल म्हणाला. 

" थँक यू. पण निखिल तू काय मदत करणार आहेस मला. तू तर त्याला ओळखत पण नाहीस. मलाही माहित नाही कि तो आता कसा दिसतोय. कारण लहानपणीच्या आणि आताच्या म्याऊमध्ये खूप बदल झाला असेल. " ऋतिका म्हणाली. 

"हो. ओळखत नसलो म्हणून काय झालं. तरी पण मी तुमची काही ना काही मदत नक्कीच करू शकतो." निखिलला चान्स सोडायचा नव्हता. कारण तो अगदी जवळ पोचला होता. 

"बरं." असं म्हणून ऋतिका काय करता येईल याचा विचार करू लागली. तिने घडल्यात बघितले तर अजून एक तास होता तिला निघायला. म्हणून त्यावेळेत निखिलची काही मदत होईल का ह्यावर बोलायचं तिने ठरवलं. 

"मी काय म्हणतोय ऋतिका, तुमच्याकडे म्याऊची ओळखीची अशी एखादी काही वस्तू आहे का, कि ज्यावरून आपण त्याला शोधू शकू. म्हणजे त्याचा एखादा फोटो वगैरे असं काही." निखिल म्हणाला. 

"हो आहे. आमच्या दोघांचा लहानपणी एकत्र काढलेला फोटो आहे माझ्या केबिनमध्ये." ऋतिका म्हणाली, "पण त्यावरून कसं शोधता येईल त्याला?" ऋतिकाने प्रश्न केला. 

"येईल नक्कीच. कारण आजच्या घडीला कोणाला शोधणं म्हणजे काही अवघड राहिलेलं नाहीय सोशल मीडियाच्या मदतीने. मला तो फोटो बघता येईल का ऋतिका?" असं म्हणून निखिलने तो फोटो बघायची इच्छा दर्शवली. 

"हो बघता येईल. माझ्या केबिनमध्ये आहे. थांब मी घेऊन येते." असं म्हणून ऋतिका आपल्या केबिनकडे जायला निघाली. तेव्हा निखिल तिला थांबवत म्हणाला,
"ऋतिका, तुम्ही तो फोटो काढून ठेवा. मीच येतो तुमच्या केबिनमध्ये. तुम्ही व्हा पुढे, मी आलोच."

"बरं ठीक आहे. चालेल." असं म्हणून ऋतिका निघून गेली. 

                 ऋतिका निघून गेल्यावर दार बंद झाल्याचे पाहून निखिल अभयजवळ आला. त्याच्या बाजूला बसून त्याने त्याचा सलाईन लावलेला हात हातात घेतला आणि म्हणाला,
"अभय, मित्रा आता तरी तुला उठावंच लागेल लेका. जिच्यासाठी तू एवढे दिवस तडफडत होतास, ती चिऊ आज जवळ आहे तुझ्या. होय ऋतिकाच तुझी चिऊ आहे. मी घेऊन येतोय तुझ्या चिऊला तुला तिच्या म्याऊला भेटायला." असं म्हणून डोळ्यातलं पाणी पुसून निखिल ऋतिकाच्या केबिनच्या दिशेने निघाला. जाताना त्याने अभयच्या लहानपणीचा तो चिऊ आणि म्याऊचा फोटो सोबत घेतला. कारण त्याला खात्री झाली होती कि, ऋतिका जवळ पण हाच फोटो असणार म्हणून. 

              निखिलने दारावर टकटक केले. तेव्हा ऋतिकाने दार उघडंच असल्याचं सांगितलं. निखिल आत आल्यावर त्याने पाहिलं कि, ऋतिका तिच्या खुर्चीवर एक फोटो हातात घेऊन बसली होती. तिचं लक्ष नाही हे पाहून निखिलने आपल्यासोबत आणलेला फोट हळूच आपल्या जॅकेटच्या खिशात लपवला.

             घास खाकरत त्याने ऋतिकाचं लक्ष खेचून घेतलं. फोटो पाहण्यात गुंतलेल्या ऋतिकाला निखिल आल्याचं लक्षातच नव्हतं राहिलं. तिने वरमून निखिलला तो फोटो दाखवण्यासाठी त्याच्याकडे दिला. 

"हा बघ. हाच एक फोटो आहे माझ्याकडे आमचा. लहानपणी खेळत असताना अचानक अभयच्या आजीने तो फोटो काढला होता. माझ्याकडे हा एक फोटो त्यांनीच दिला होता. आमची लहानपणीची एक आठवण म्हणून. आणि ती एकच आठवण माझ्याकडे राहिली होती." ऋतिका म्हणाली. 

            निखिलने  तो फोटो हातात घेऊन बघितला तसं त्याला एखादा खजाना मिळाल्यासारखा आनंद झाला. त्याच्या अपेक्षेप्रमाणे हा सेम तसाच फोटो होता जो अभयजवळ होता. त्याला आता सगळ्या गोष्टी कळून चुकल्या होत्या. आजपर्यंत जेवढ्या काही घटना अभय आणि ऋतिकाच्या बाबतीत घडल्या  होत्या, त्याचा अर्थ त्याला लागला होता. अतिशय आनंदाने उड्या माराव्यात आणि असंच ह्रतिकला घेऊन त्याच्या मित्राकडे अभयकडे घेऊन जावं आणि त्यांना एकमेकांना मिळवावं असं त्याला मनापासून वाटत होतं. पण त्याने आपल्या मनाला आवर  घातला आणि ऋतिकाला ह्याबद्दल सांगण्यासाठी तिच्याकडे वळला. कारण त्याला अजून ऋतिकाला  आणि अभयला लांब ठेवायचं नव्हतं. 

"ऋतिका, हा फोटो बघून मला तर असंच वाटतंय कि तुमचा म्याऊ तुम्हाला नक्की भेटेल." निखिल गूढ हास्य चेहऱ्यावर आणत म्हणाला. 

त्याच्या बोलण्याचा रोख न कळल्यामुळे ऋतिका गोंधळून त्याला म्हणाली,
"निखिल मस्करी नको करुस. हे कसं शक्य आहे कि, लहानपणीच्या फोटोवरून म्याऊ लगेच भेटेल मला. तसं असतं तर आतापर्यंत तो मला भेटायला हवा होता. मग का नाही भेटला? सांग."

"कारण त्याला आता भेटायचं होतं तुम्हाला. म्हणून कदाचित अजूनपर्यंत नसेल भेटला तुम्हाला" निखिल तोच गूढपणा कायम ठेवत म्हणाला. 

"म्हणजे?" ऋतिका गोंधळलेलीच होती. 

"म्हणजे असं कि. . . " आपलं बोलणं मध्येच थांबवत निखिल म्हणाला. त्याला ऋतिकाला सांगायचं होतं पटकन पण तेच जमत नव्हतं त्याला. 

"म्हणजे काय निखिल? बोल लवकर." ऋतिकाच्या हृदयात आता जोरजोरात धडधड करू लागलं होतं. 

"माझ्याकडे तुम्हाला दाखवण्यासाठी एक गोष्ट आहे." निखिल म्हणाला. 

"कुठली गोष्ट?" ऋतिका अधीरतेने म्हणाली. 

"दाखवतो."असं म्हणून  निखिलने आपल्या जॅकेटच्या आतमधून ती  फोटो फ्रेम बाहेर काढली आणि ऋतिकाकडे पाहत म्हणाला,
"दिल थामके रखियेगा ऋतिकाजी आपके लिये एक बोहोत बडा सरप्राईज है."

"बघू" असं म्हणत धडधडत्या काळजाने ऋतिकाने ती फोटो फ्रेम बघितली आणि तिला आश्चर्याचा एक  खूप मोठा धक्का बसला. त्यातच ती जोरात खुर्चीवर बसली. निखिल तिला सावरायला पुढे झाला. तो फोटो बघून तिच्या डोळ्यांतून अश्रू  वाहू लागले. तिला काय बोलावं हेच कळत नव्हतं. आश्चर्याचा आणि सुखाचा धक्का तिला एकदमच बसला होता.  तिला विश्वासच बसत नव्हता, कि आपल्याकडे आहे तसाच फोटो निखिलकडे कसा काय आला? तिने निखिकडे तशाच भरल्या डोळ्यांनी पाहून विचारले,
"हा फोटो तुझ्याकडे कसा आला? हा फोटो आजीने मला आणि म्याऊलाच दिला होता. हा फोटो फक्त म्याऊकडेच असू शकतो. म्हणजे तूच . . . "

निखिलला हे अनपेक्षित होतं. तिच्या प्रश्नाने तो बावचळला आणि म्हणाला,
"नाही नाही ऋतिका, मी नाहीय म्याऊ. मला तो फोटो भेटला होता एकाकडे आणि तो मला तुम्हाला  दाखवायचा होता म्हणून मी तो घेऊन आलो." 

"तू म्याऊ नाहीस मग तुला कोणाकडे हा फोटो भेटला. हा एक अतिशय पर्सनल विषय आहे निखिल. सांग मला तुला हा फोटो कोणाकडे भेटला? कुठे आहे माझा म्याऊ?" ऋतिकाचा आवाज तिच्याही न कळत वाढला होता. 

"ऋतिका, शांत व्हा प्लिज. मी घेऊन जातो तुम्हाला तुमच्या म्याऊकडे. चला माझ्यासोबत. या." निखिल म्हणाला. आता त्यालाही चिऊ आणि म्याऊची भेट लांबवायची नव्हती. पण ऋतिकाने जर तिच्या म्याऊला ह्या अवस्थेमध्ये  बघितलं  तर तिला काय वाटेल हेच निखिलला कळत नव्हतं. आपलं प्रेम इतक्या वर्षांनी आपल्याला भेटणार आणि तेदेखील अशा अवस्थेमध्ये, हा विचार करूनच निखिलला खूप वाईट वाटले. पण निदान ऋतिकाला खात्री तरी पटेल कि अभयच म्याऊ आहे म्हणून आणि ती तिच्या म्याऊला भेटेल तरी. 
 
"हो चल, आता मी नाही राहू शकत. चल. तू म्हणशील तिथे मी यायला तयार आहे माझ्या म्याऊला भेटायला. प्लिज मला एकदा भेटव त्याला." रडवेल्या आवाजात ऋतिका म्हणाली. 

"चला माझ्यासोबत" असं म्हणून निखिलने त्या दोन्ही फोटोच्या फ्रेम्स सोबत घेतल्या आणि ऋतिकाला घेऊन निघाला तिच्या लहानपणीच्या प्रेमाला भेटवायला. 

               ते दोघे अभयच्या रूमजवळ येऊन थांबले. निखिलने पुढे होत त्या रूमचा दरवाजा उघडला आणि ऋतिका त्याच्या मागोमाग आत गेली. निखिलने आपल्याला अभयच्या रूममध्ये का आणलंय हे न समजून ती निखिलला म्हणाली,
"आपण अभयच्या रूम मध्ये कशाला आलोय निखिल? काय म्याऊ इकडे येणार आहे का?"

"इकडे येणार नाहीय ऋतिका तो. तो तर इथेच आहे. दीड महिना झाला. कोमामध्ये आहे तो. तो बघा जो ह्या बेडवर झोपलाय तोच अभय तुमचा म्याऊ आहे." आपल्या डोळ्यांत आलेलं पाणी पुसत निखिल कसाबसा म्हणाला. 

                ऋतिका शॉक बसल्यासारखी एकवेळ अभयकडे आणि निखिलकडे पाहत होती. तिला हसावं कि रडावं तेच कळेना. तिच्या सगळ्या भावना उत्कटतेने अक्षरशः भरून आल्या होत्या. इतक्या कि, जर कोणी तिच्या आतमध्ये डोकावून पाहिलं असतं तर कदाचित त्याला कळलं असतं कि, तिच्या आतमध्ये काय चालू आहे ते. अनाकलनीय अशा भावनांच्या वादळात ती सापडली होती. काहीच न सुचून स्तब्ध झाली होती ती. म्याऊ आपलं लहानपणीचं प्रेम आपल्या समोर आहे. तो अभय आहे. त्याचा ऍक्सीडेन्ट झालाय. गेला दीड महिना झालं तो कोमामध्ये आहे. कधी शुद्धीवर येईल ते माहिती नाहीय. औषधं आणि सलाईन्सवर मशीनमधली त्याच्या आयुष्याची रेषा सुरळीत चालू आहे. नियतीने तिची अजब थट्टा केली होती. तिचं प्रेम तिला परत मिळवून देऊन  पण तिच्यापासून दूरच ठेवलं होतं.  जणू नियतीच्या मनात त्यांचं मिलन होऊ द्यायचं अजून बाकी होतं. 

                ज्याची आपण इतके दिवस, इतकी वर्षं वाट पहिली. तो भेटावा म्हणून उपासतापास केले. सगळ्या देवांना नवस बोलले. त्याच्यावरच्या प्रेमाखातर कुणाकडे ढुंकूनही पाहिलं नाही. फक्त त्याचीच वाट पाहत राहिले आजवर आणि तो आपल्याला भेटावा तेही अशा अवस्थेमध्ये. याआधी तो कितीतरी वेळा आपल्यासमोर आलेला. आपल्याला एकवेळ वाटलं कि, तोच म्याऊ आहे पण आपण कसलीच शहानिशा न करता त्याला का जाऊ दिलं ह्याचाच ती विचार करत होती आणि स्वतःला दोषी मानत होती. जेव्हा आपल्याला तसं वाटलं होतं तेव्हाच का नाही आपण त्याला विचारलं? तिला प्रत्येक गोष्ट आठवत होती. अभय भेटलेला प्रत्येक क्षण तिच्या डोळ्यांसमोर येत होता. तो म्याऊच होता. म्हणूनच आपल्याला त्याच्याबद्दल ती ओढ वाटत होती. त्याच्याशी खूप जुनी ओळख असल्यासारखं वाटत होतं. त्याच्याबद्दल आपुलकी वाटत होती. काळजी वाटत होती. आपल्यामध्ये एक नातं आहे ते वाटत होतं. म्हणूनच तो जेव्हा जेव्हा भेटला तेव्हा तेव्हा आपल्याला त्याच्याबद्दल ती उत्कट भावना जाणवत होती. त्यांच्यात असणाऱ्या त्या अनामिक ओढीचं, त्या अनोळखी प्रेमाचं रहस्य तिला आता उलगडलं होतं. तिचं प्रेम तिला परत भेटलं होतं. तिचा म्याऊ तिला भेटला होता. पण म्याऊला अजून त्याची चिऊ भेटायची बाकी होती. 

Thursday, April 29, 2021

अनोळखी हे प्रेम - Part 8            आज ऋतिकाचं मन थोडं अस्वस्थ होतं. म्हणून ती घरी लवकर जायचं ठरवते. तसंही तिचं आजचं काम झालेलं असतं. काही महत्त्वाच्या सूचना नर्सेसना देऊन ती आपल्या केबिन मध्ये परत येते. आवरा आवर करत असताना तिचं त्या फोटोकडे लक्ष जातं. तिला वाटलं कि आताही तिचा म्याऊ तिच्याकडे बघून हसतोय कि काय. पण तसं नव्हतं. मग सकाळीच तिला असं का वाटलं, तो आपल्याकडून बघून हसला. कि आपला तो भास होता. हो, भासच असेल कदाचित. कारण आजवर तर असं नाही झालं कधी. तिने तो फोटो हातात घेतला. हळुवार त्याच्यावरून हात फिरवला. आणि म्याऊचं ते हसरं रूप पाहू लागली. तसं तिच्या डोळ्यांतून हलकेच दोन थेंब ओघळले. आज काय माहित नाही, पण तिला म्याऊची खूप आठवण येऊ लागली. 
"कुठे आहेस तू म्याऊ? लवकर ये ना प्लिज, कधीपासून मी तुझी वाट पाहतेय. लहानपणी जसा तो गेलायस तसा अजून परत आलेला नाहीयेस. कुठे गेलायस न सांगता मला तू? मी नाही राहू शकत रे आणखी तुझ्याशिवाय. थकलेय रे तुझी वाट पाहून. येशील तू लवकरच याची खात्री आहे मला. मला नाही राहवत आहे आणखी. मला माझा म्याऊ लवकरात लवकर परत हवाय " असं म्हणून तिने तो फोटो आपल्या हृदयाशी घट्ट धरून ठेवला. 

               तेवढ्यात तिच्या केबिनच्या दाराजवळ टकटक झाली. तिने आपले डोळे पुसले आणि तो फोटो परत आपल्या टेबलावर ठेवला. 

"येस, प्लिज कम इन." असं म्हणून तिने दार ठोठावणाऱ्याला आत यायची परवानगी दिली. तशी एक नर्स आत  शिरली आणि घाईघाईने तिला म्हणाली,

"मॅडम, चला लवकर एक अर्जेंसी आलीय. रूम नंबर २०७ मधल्या पेशंटला अचानक श्वास घ्यायला त्रास होतोय."

"अरे, असं कसं मी आताच चेक करून आलेली त्यांना.  व्यवस्थित होते ते. बरं ठीके चल पटकन " असं म्हणून ऋतिकाने आपली पर्स तशीच परत ठेऊन आपला स्टेथोस्कोप उचलला आणि त्या नर्ससोबत निघाली. 

                 आज लवकर जायचं होतं मनात तिच्या. पण आज असं काहीतरी घडणार होतं, ज्यामुळे तिला अचानक थांबावं लागलं. कधी कधी बाप्पाच्या मनात असं काही असतं, कि त्याचा आपल्याला अंदाज येत नाही. कारण बाप्पाला आपल्याला सरप्राईज द्यायचं असतं. आपण एखाद्या गोष्टीची खूप दिवस वाट बघत असतो. खूप आतुरतेने. पण ते काही आपल्याला भेटत नाही. मग आपण ती वस्तू किंवा व्यक्ती भेटू दे, म्हणून बाप्पाजवळ प्रार्थना करत असतो. आणि मनोमन तेच मागत असतो. पण त्याची योग्य वेळ यायची असते. आणि त्याची वेळ आल्यावर ते आपल्या ध्यानीमनी नसताना अचानक आपल्यासमोर प्रकट होतं. असंच काहीसं आज ऋतिकासोबत घडणार असतं. तिचं घरी जाताजाता अचानक पेशंटची अर्जेंसी येणं आणि तिला थांबावं लागणं हे निव्वळ एक कारण असतं. 


               ब्रँच  ऑफिस मध्ये धावपळ उडालेलीहोती, कारण आज चक्क कंपनीचे मालक येणारहोते. त्यामुळे ऑफिसमधले सगळे जण त्यांच्या स्वागताकरिता उत्सुकहोते. त्यांच्यापैकी अजून कोणी  त्यांच्या नवीन मालकांना बघितलेलंनव्हतं. त्याची एक उत्सुकता होती सगळ्यांमध्ये, कि आपले बिगबॉस कसे असतील ते. त्यांच्या स्वागतासाठी एक छोटा कार्यक्रम पण आयोजित केलेला होता  तिथल्या एम्प्लॉयीसने. कारण शेवटी कंपनीचे मालक येतायत आणि ते हि पहिल्यांदा. म्हणून तिथल्या ब्रॅंचहेडनि हे हा सगळा खटाटोप केलेला असतो. 

               थोड्याच वेळात तिथे एक गाड्यांच्या ताफ्याचं आगमन होतं. एकापेक्षा एक अशा आलिशान गाड्या पाहून सगळेच दिपून जातात. त्यातल्या सगळ्यांत आलिशान गाडीमध्ये होते त्या कंपनीचे मालक अभय आणि त्याच्यासोबत निखिल. आणि त्यांच्या मागेपुढे असलेल्या गाड्यांमध्ये कंपनीचे इतर अधिकारी आणि सेक्युरिटी गार्ड्स. ऑफिसच्या कॅम्पस मध्ये गाड्या आल्यावर सगळेजण त्यांच्या स्वागतासाठी पुढे धावले. तिथले जे मुख्य अधिकारी होते, त्या सगळ्यांच्या हातात मोठाले जाडजूड हार होते. ते पाहून निखिल हळूच अभयच्या कानात म्हणाला,
"अभ्या, यार एवढे मोठे हार घातल्यावर तू त्याच्यामध्ये गुदमरूनच मरशील लेका." 

"निखिल, आपण ह्या कंपनीचे मालक आहोत हे विसरतो काय तू कधी कधी. जरा तसं वागना मूर्खां कधीतरी." असं निखिलला म्हणून तो त्यांचं स्वागत स्वीकारायला पुढे झाला.  त्याच्या पाठोपाठ निखिलदेखील. त्या लोंकांमधले सगळेजण त्यांना पहिल्यांदाच भेटत होते. अभय सगळ्यांची आस्थेने चौकशी करत होता आणि त्यांना काही प्रॉब्लेम्स असतील तर त्यावर काही सोल्युशन पण काढत होता. काही बदल त्याला करावे वाटत असतील तर सर्वानुमते त्या अमलात आणण्याच्या सूचना देखील देत होता. अभयचं आकर्षक व्यक्तिमत्व, त्याचा रुबाबदारपणा, त्याच्या बोलण्याच्या खास शैलीमुळे आणि त्याचं सगळ्यांशी आपुलकीने बोलणं पाहून तिथल्या लोकांच्या मनात त्याच्याबद्दल असलेली भीती जाऊन एक आदर निर्माण झाला होता.  तिथला लेडीज स्टाफ तर अक्षरशः अभयवर फिदा झाला होता. कधी एकदा त्याच्याशी ओळख होतेय याची वाट पाहत होत्या, पण अभय हा आहे त्या सगळ्यांचा गॉडफादर आहे, हे लक्षात येऊन हिरमुसत होत्या. निखिल आपला त्या सगळ्यांची मजा बघत होता. 

            तिथल्या लोकांनी आपुलकीने केलेल्या स्वागतसमारंभामुळे अभय खूप भारावून गेला होता. आपल्या मित्राचा स्वागत सोहळा पाहून निखिलला सुद्धा खूप आनंद झाला होता. स्वागतसमारंभाच्या कार्यक्रमानंतर एक छोटासा जेवणाचा कार्यक्रम होता. तिथल्या स्टाफच्या विनंतीमुळे अभय थांबायला तयार झाला होता. त्यानंतर तिथल्या मुख्य अधिकाऱ्यांसोबत एक मिटिंग घेऊन तो परतणार होता. 

            ह्या सगळ्यांमध्ये संध्याकाळ झाली. मिटिंग संपल्यावर सगळे अधिकारी मिटिंग रूम मधून बाहेर पडले. निखिल काही महत्त्वाचं बोलायचं म्हणून त्यांच्यासोबत बाहेर गेला. अभय एकटाच होता आतमध्ये. निखिल परत येईपर्यंत थांबणार होता तो तिथे. म्हणून तो बसल्या बसल्या ती मिटिंग रूम न्ह्याहाळू लागला. त्या रूमला खूप मोठ्या खिडक्या होत्या, पण त्यावर पडदे सोडले होते. अभयने ते पडदे बाजूला सारले आणि बाहेरचं दृश्य पाहू लागला. ऑफिसच्या बिल्डिंगसमोरच मध्ये एक मोठा रस्ता होता आणि त्यापलीकडे एक हॉस्पिटल होतं. आजूबाजूला काही छोटोमोठी ऑफिसेस असलेल्या बिल्डिंगा होत्या. रहदारी वाहत होती रस्त्यांवरून. गाड्या सिग्नलवर थांबून सुटत होत्या. एखादीच बाईक  सिग्नल तोडून मध्येच पळत होती. ते पाहून अभयला आपले कॉलेजमध्ये असताना तोडलेल्या सिग्नल्सची आठवण झाली. सगळे आपल्यापल्या घाईत होते. कोणाला दुसऱ्याकडे लक्ष द्यायला वेळ नव्हता. प्रत्येकजण आपल्या नाकासमोर चालत होता. एक बिझी संध्याकाळ होती.  त्या संध्याकाळचा स्वछ सूर्यप्रकाश सगळीकडे पसरलेला होता. अचानकच तिथला तो सूर्यप्रकाश जाऊन अंधार दाटू लागला. आकाशात काळ्या ढगांनी गर्दी केली. जोराचा वर सुटला आणि विजा चमकू लागल्या. त्यासोबतच ढगांचा जबरदस्त गडगडाट चालू झाला. आणि त्यासोबतच जोरदार पावसाला सुरुवात झाली.  अचानक झालेल्या वातावरणातील बदलामुळे सगळ्यांची धावपळ सुरु झाली. सगळे आडोसा शोधायला पळू लागले. 

               तेवढ्यात निखिल देखील आला. बाहेरचा कोसळणारा पाऊस पाहून अभयने त्याला पटकन घरी चालण्याची सूचना केली. तसे ते जायला निघाले. तिथल्या लोकांचा निरोप घेऊन अभय आणि निखिल आपल्या गाडीकडे जाऊ लागले. पण अचानक अभयच्या मनात परत तीच बेचैनी होऊ लागली. त्याचं हृदय परत एकदा जोरजोरात धडधडू लागलं. त्याचं मन चलबिचल होऊ लागलं. त्याला कळेचना हे सगळं काय होतंय. सकाळी होणारी हृदयाची धडधड थांबली होती. ती परत आता सुरु चालू होती. अभयचा हात छातीवर गेला तसं सगळे त्याला सावरायला धावले. पण अभयने सगळ्यांना ठीक आहे असं सांगून गाडीत बसला. निखिलला कळून चुकलं कि काहीतरी गडबड आहे ते. अभयची गाडी तिथून बाहेर पडली आणि मेन रोडला आली. पण तिथे सिग्नल असल्यामुळे त्यांना थांबावं लागलं. 

                     ऋतिकादेखील अचानक पाऊस आलाय म्हणून जायला निघाली. पण तिचं मन देखील एका अनामिक ओढीने धडधडू लागलं. तिला अशी धडधड आधी कधीच जाणवली नव्हती. काय होतंय हे तिचं तिलाच कळत नव्हतं. एक हुरहूर मनात दाटून आली होती. बाहेर अचानक  पडणाऱ्या मुसळधार पावसाप्रमाणेच तिच्या मनात देखील भावनांचा मुसळधार पाऊस चालू झाला होता. मनात विचारांचं काहूर माजलं होतं. तसा पाऊस तिच्या खूप आवडीचा. पाऊस आला कि एक क्षण पण थांबत नसे. कधी एकदा जाईन पावसात असं तिला व्हायचं. पण आज वेगळंच काहीतरी होतं. विचार करता करता ती बाहेर आली पण आपल्या स्कुटीकडे न जात ती सरळ पावसात निघाली. भिजायला. चिंब व्हायला. कशी आली ते तिचं तिलाच कळलं नाही. पण ती आली. आणि पावसाचं पाणी अंगावर पडताच ती मनातल्या साऱ्या गोष्टी विसरून अक्षरशः पावसात उड्या मारू लागली. तिला तसं पाहून तिथली लहान मुलं पण तिच्या जोडीला आली आणि ते सगळे मिळून तिथल्या पाण्यात खेळू लागले. ऋतका भान हरपून पावसात भिजत होती. पावसाची मजा घेत होती. आपण कोण आहोत ह्याचा तिला त्याक्षणी विसर पडला होता. ती फक्त त्या क्षणात जगत होती. पावसात मनसोक्त न्हाऊन निघत होती. तिला बाकी जगाची पर्वाच  नव्हती. 

                  अभय कारच्या खिडकीतून बाहेरचा धो धो कोसळणारा पाऊस बघत होता. त्याच्या मनातली ती अनामिक हुरहूर अजूनच वाढली होती. तो अजूनच अस्वस्थ होत होता. हृदय इतक्या जोरात धडधडत होतं कि, जणू काही ते छाती फाडून बाहेरच येईल. अचानक त्याचं लक्ष समोर गेलं. तिथल्या दृश्याकडे. तिथे एक मुलगी अगदी मनसोक्त पावसात भिजत होती. सोबतीला चार-पाच लहान मुलं होती. त्यांच्यासोबत ती तिथे साचलेल्या पाण्यात अक्षरशः उड्या मारत नाचत होती. तिच्या कपड्यावरून तरी ती सुशिक्षित वाटत होती. पण ती अशी वेड्यासारखी का भिजतेय पावसात हे अभयला कळलं नाही. तिचा चेहरा व्यवस्थित दिसत नव्हता. पावसाने ओलेचिंब झालेले केस तिच्या चेहऱ्यावर आले होते आणि ती तशीच पावसाचा आनंद घेत होती. हा नजारा त्याने याआधी पण पहिला होता. सेम. अगदी जशाच्या तसा आताही तसाच नजारा समोर होता. फक्त वेळ बदलेली होती. ठिकाण बदलेलं होतं. 

            आणि  तिला पाहून का माहित नाही, पण अभय गाडीतून खाली उतरला. संमोहित केल्यासारखा तिच्या दिशेने चालू लागला. तसाच पावसात भिजत. त्याच्या मागोमाग निखिल देखील उतरला आणि त्याला थांबवायला पूढे झाला. पण अभयने त्याला अडवले आणि तसाच तो तिच्याकडे चालू लागला. थांबला नाही. निखिल आणि बाकीचे सेक्युरिटी गार्ड्सदेखील त्याच्या मागे निघाले. तिच्यापासून थोड्या अंतरावर जाऊन अभय थांबला तशी एक जोरात वीज कडाडली. बहुतेक कुठेतरी पडली देखील असावी. आणि त्याचवेळी अभयचं लक्ष तिच्या चेहऱ्यावर गेलं आणि त्याच्या तोंडून आपसूकच निघालं,

"ऋतिका." 

                होय. तीच ऋतिका. जिला पाहून अभयचं पहिलेही हृदय धडधडलं होतं. तीच अनामिक हुरहूर त्याच्या मनात दाटली होती. तसेच मन बेचैन झालं होतं. तिच्यात काहीच बदल झाला नव्हता. तेच तिचे काळेभोर गहिरे डोळे. तीच ती काळजाचा ठाव घेणारी नजर. तसेच मोकळे सोडलेले आणि पावसात भिजलेले केस. कपाळावर बारीकशी टिकली. फिकट गुलाबी रंगाचा पंजाबी ड्रेस त्यावरील पांढरी शुभ्र ओढणी आणि पावसात चिंब भिजून आणखीनच मनमोहक झालेला तिचा देह. अभय हे सौंदर्य भान हरपून पाहत होता. 

          आता त्याला त्याच्या हृदयाच्या जोरजोरात धडधडण्याचं कारण त्याला कळलं होतं. त्याच्या अस्वस्थ मनाचं गुपित त्याला उलगडलं. आणि त्याच्या मनातली अनामिक हुरहूर तिला पाहून शांत झाली. त्याची होत असलेली बेचैनी थंडावली. त्याचं मन शांत झालं. आणि त्याच्या चेहऱ्यावर हलकेच  एक हसू उमटलं  आणि त्याने परत एकदा तिला आवाज दिला. 

"ऋतिका." 

             त्याचा अस्पष्ट आवाज ऐकून ऋतिकाने त्याच्या कडे बघितले आणि ती बघतच राहिली. तिला ज्याच्याबद्दल जी अनामिक ओढ वाटत होती. ज्याला पाहून ती त्याच्याकडे खेचली गेली होती तो प्रत्यक्षात तिच्यापुढे उभा होता. तिलादेखील तिच्या हृदयाच्या अचानक धडधडण्याचं कारण समजलं होतं. ती स्तब्ध होऊन अभयकडे पाहत होती.   

         पाऊस तसाच धो धो कोसळत होता. त्या पावसात ते दोघे एकमेकांसमोर काही अंतरावर उभे होते. त्यांना काय प्रतिक्रिया द्यावी हेच कळत नव्हतं. दोघेही भान हरपून फक्त एकमेकांना पाहत होते. कोणीच काही बोलत नव्हते. त्यांच्यामध्ये एक मूक संवाद चालू होता. नजरेनेच त्यांच्या संभाषण होत होते. त्यांच्यामध्ये फक्त थोडंसं अंतर होतं. ते अंतर आता मिटणार होतं. इतक्या दिवसांची त्यांची प्रतीक्षा आज संपली होती. त्यांच्यामध्ये असणाऱ्या अनेक प्रश्नांची उत्तरे आज मिळणार होती. 

         निखिल मागेच थांबला होता आणि त्याने गार्ड्सना पण थांबवले होते. आणि तो पुढे काय होतंय ते पाहू लागला. कारण त्याच्या मित्राचं प्रेम परत एकदा समोर आलं होतं. 

           अभय तिच्यात पुन्हा एकदा हरवून गेला होता. ढगांच्या गडगडाटाने तो भानावर आला. तिच्याशी बोलायला म्हणून त्याने तिच्या दिशेने पाऊल टाकले. पण इतक्यात असे काही घडले कि, ज्याची कुणाला अपेक्षाच नव्हती. अचानक गाडीच्या जोरात हॉर्न आणि ब्रेक्स एकदमच मारल्याचा आवाज आला. मुसळधार पाऊस चालू असल्याने पहिल्यांदा कोणाला काहीच कळले नाही, कि नक्की काय झालंय ते. पण जेव्हा कळलं तेव्हा मात्र सगळ्यांची एकच धावपळ उडाली. ऋतिका अभयला शोधत होती. अभय आत्ताच तिच्यासमोर उभा होता. तिच्याकडे पाहत. आणि अचानक कुठे गेला. कोणीतरी त्या गाडीच्या धक्क्याने वरती उडून खाली जोरात आदळलं होतं.  तिची नजर त्या खाली पडलेल्या व्यक्तीकडे गेली आणि ती जागीच थिजली. तो अभयच होता. अभयचा ऍक्सीडेन्ट झाला होता. त्या मुसळधार पावसात त्या गाडीने समोरचे काहीच न दिसल्यामुळे अभयला उडवले होते. ते पाहून ती जोरात ओरडली,

"अभय"
आणि मटकन खाली बसली. तिला काहीच सुचेना.  ती अभयच्या जवळ बसली आणि त्याचं  डोकं आपल्या मांडीवर ठेवून जोरजोरात रडायला लागली. एवढ्यात तिथे गर्दी देखील जमा झाली होती. आणि पावसाचा जोर कमी झाला होता. 
"हेल्प,हेल्प. कुणीतरी मदत करा प्लिज. प्लिज माझी मदत करा." म्हणून मोठमोठ्याने ओरडत होती. पण कोणी तिची मदत करायला पुढे येत नव्हतं. तिचा आवाज ऐकून निखिल जोरात धावत तिथे आला. त्याच्यामागे त्याचे गार्ड्स पण धावत आले. निखिलने अभयला बघितले आणि त्याचे अवसानच गळाले. आपल्या मित्राला असं ऋतिकाच्या मांडीवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं पाहून त्याची मतीच गुंग झाली. 

"अभय, अभय. यार डोळे उघड अभय. काय झालं तुला, उठ, उठ ना यार अभय." असं म्हणून तो अभयला हाक मारू लागला. रडू लागला. 

त्याला तसं बोलताना पाहून ऋतिकाला समजलं कि, तो अभयला ओळखत असावा. म्हणून ती उसनं अवसान आणून निखिलला म्हणाली,"प्लिज माझी  हेल्प करा, ह्यांना लवकरात लवकर हॉस्पिटलला घेऊन गेलं पाहिजे. प्लिज. तुमच्या पाय पडते मी, ह्यांना उचलून घेऊन चला. इकडे मागेच माझं हॉस्पिटल आहे. प्लिज ह्यांना घेऊन चला ना लवकर." म्हणून रडू लागली. 

"हो हो, येतो मी चला. माझा जिगऱ्या आहे तो. चला लवकर. कुठे आहे तुमचं हॉस्पिटल दाखवा मला." असं म्हणून निखिलने आपले डोळे पुसत अभयला दोन्ही हातांवर उचलले. बाकीचे गार्डस पण पुढे आले निखिलच्या मदतीला. आणि ते अभयला घेऊन जाऊ लागले. ऋतिका उठून उभी राहिली आणि त्यांना घेऊन हॉस्पिटलच्या दिशेने धावत सुटली. त्या गार्ड्सपैकी दोघांनी त्या गाडीवाल्याला पकडले होते आणि ते त्याला निखिलकडे सोपवणार होते. 

           तिथे मागेच होते ते हॉस्पिटल. ऋतिकाच्या हॉस्पिटलच्याच गेट समोर तो प्रकार झाला होता. म्हणून नशीब होतं.  ऋतिकाने पटकन तिथल्या वॊर्डबॉयलाआवाज दिला. ऋतिकाचा आवाज ऐकून आतले दोन वॊर्डबॉईज धावत आले आणि त्यांनी पटकन जाऊन स्ट्रेचर आणले. त्यावर अभयला झोपवले आणि आत ऍडमिट करायला घेऊन गेले. ऋतिकाने एमेरजन्सी मध्ये लगेच अभयला ऑपरेशन थिएटर मध्ये नेले. ती देखील तशीच भिजलेल्या अवस्थेमध्ये आतमध्ये घुसली आणि तिने ऑपेरेशनच्या तयारीला लागली. तोपर्यंत बाकीचे डॉक्टर्स आणि नर्सदेखील तिच्या मदतीला धावत आले होते. ह्या वेळांत निखिल समजून गेला होता कि, ऋतिका तिथलीच एक डॉक्टर आहे ते. म्हणून तो तिथेच मनोमन देवाचे आणि तिचे आभार मानत बाहेर उभं राहून वाट पाहू लागला ऋतिका बाहेर येण्याची. तेव्हा तिथे त्या गार्ड्सपैकी एक जण आला आणि त्याने त्या गाडीवाल्याला पकडले असल्याची माहिती दिली. हे ऐकून निखिलचे डोकेच सटकले. तो तसाच रागाने त्या गाडीवाल्याला मारायला त्याच्याकडे धावला. कारण त्याच्यामुळेच निखिलच्या जिवलग मित्राची हि अवस्था झाली होती. त्याने त्या गाडीवाल्याला बेदम चोपला. त्याने तसं का केलं म्हणून विचारत होता. पण तो देखील निगरगट्ट असल्यासारखा उर्मटपणे बोलत होता आणि उद्दामपणे  त्याची काही चुकी नाही ते  सांगत होता. ते पाहून निखिल आणखीनच बिथरला आणि तो नुसता त्याला मारत सुटला. आपण हॉस्पिटलमध्ये आहोत याचे देखील त्याला भान नव्हते. जोरदार पावसामुळे आपली गाडी स्लिप झाली आणि आपला गाडीवरील कंट्रोल सुटला हेच तो  सांगत होता. पण निखिलला त्याच्यावर विश्वास बसत  नव्हता. शेवटी तो त्याला मारून मारून दमला आणि त्या गार्ड्सना पोलिसांना फोन करून त्याला पोलिसांच्या ताब्यात द्यायला सांगून परत ऑपरेशन थिएटरजवळ आला. अजून देखील तिथे असलेला वरचा लाल दिवा पेटलेलाच होता. म्हणून निखिल तिथेच बाकड्यावर बसला. 

                 काही तासांनी तो दिवा विझला. तसा निखिल देवाला हात जोडत उभा राहिला आणि ऋतिका आणि बाकीचे डॉक्टर्स बाहेर येण्याची वाट बघू लागला. बाकीचे डॉक्टर्स बाहेर आले, पण ऋतिका मात्र बाहेर नव्हती आली. म्हणून निखिल विचारात पडला आणि त्याने बाहेर येणाऱ्या एका नर्सला तिच्याबद्दल विचारले. तेव्हा तिने ऋतिका आतमध्येच पेशंट जवळ असल्याचे सांगितले. तेव्हा निखिल त्या नर्सची परवानगी घेऊन आत मध्ये आला. ऋतिका अभयच्या डोक्याजवळ बसली होती. ती अजूनही तशीच भिजलेल्या अवस्थेमध्ये होती. फक्त वरतून ऑपेरेशन चा युनिफॉर्म घातला होता तिने. अभयचा हात हातात घेऊन ती  त्याच्याकडे टक  लावून पाहत  होती. तिची पापणी अजिबात लवत नव्हती, पण डोळ्यांतून येणारं पाणी मात्र थांबत नव्हतं. तिला अभयबद्दल असणाऱ्या अनामिक ओढीने तिथेच जखडून ठेवले होते.  निखिलने एकवार अभयकडे पहिले. त्याच्या अंगाला विविध ठिकाणी कसलेतरी स्टिकर आणि वायरींचं जंजाळ होतं. डोक्याला मार  लागलेला असल्यामुळे संपूर्ण डोक्याला पट्टी बांधली होती. हाताला सलाईन लावलेली होती. एक रिकामी रक्ताची पिशवी सुद्धा अडकवलेली होती. डोक्याला मार लागल्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता. म्हणूच अभयला रक्त चढवण्यात आलं होतं. बाजूला असलेल्या मशिनमधून टिकटिक चालू होती आणि एका मशीनमध्ये एक रेष वर खाली होत पुढे जात होती. 

             निखिलला हे सगळं पाहावलं नाही. नेहमी त्याच्यासोबत असणारा, त्याच्यासोबत मस्ती करणारा त्याचा जिवलग मित्र आज अश्या अवस्थेमध्ये पाहून त्याला खूप दुःख होत होते. आताच थोड्यावेळापूर्वी आपल्यासोबत बोलत असणारा अभय आता अशा स्थितीमध्ये बघायला भेटेल याची त्याने कधीच कल्पना केली नव्हती. सोबतच ऋतिका देखील अशा अवस्थेमध्ये बसून होती. त्याने स्वतःला सावरत तिच्याशी बोलायचं ठरवलं. 

"ऋतिका." हळुवार आवाजात त्याने ऋतिकाला हाक मारली, कारण त्याच्या आवाजाने अभयला जाग आली तर त्यालाच त्रास होईल म्हणून. पण तिचं लक्षच नव्हतं. म्हणून त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला थोडंसं हलवून परत आवाज दिला 

"ऋतिका"

तसं दचकून तिने त्याच्याकडे बघितलं. आणि डोळ्यातलं पाणी पुसत म्हणाली, 

"हा बोला, कोण आपण." काहीतरी बोलायचं म्हणून ती बोलली. 

"मी निखिल, अभयचा मित्र. मघाशी आपण नाही का अभयला हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो." निखिल आपली ओळख सांगू लागला. कारण त्याला माहित होतं कि, ऋतिका त्याला लगेच ओळखणार नाही ते. 

"ओ हा, थँक्स तुम्ही माझी मदत केलीत त्याबद्दल." ऋतिका म्हणाली. 

"अहो थँक्स कसलं बोलताय. माझा मित्र आहे तो. आम्ही दोघे एकत्रच होतो मघाशी. आणि अचानक असं झालं. उलट मीच तुम्हाला थँक्स म्हटलं पाहिजे कि तुम्ही अनोळखी असून पण आमची एवढी मदत केलीत ते. खरच तुमचे खूप खूप धन्यवाद." निखिल हळुवार आवाजात म्हणाला. 

"माझे कसले आभार मानताय, उलट माझ्यामुळेच झालं हे सगळं. आणि मी ओळखते अभयला. त्यामुळे मी अनोळखी नाहीय. जर त्यावेळी मी तिथे नसते तर अभयदेखील तिथे नसता आला आणि त्याचा असा ऍक्सीडेन्ट नसता झाला . मीच जबाबदार आहे त्याच्या अशा परिस्थितीला." असं म्हणून ऋतिका परत रडू लागली. 

"प्लिज शांत व्हा, तुम्ही असं स्वतःला जबाबदार नका समजू. शांत व्हा. नाहीतर अभयला जाग येईल आणि त्याला तुम्हाला असं रडताना बघून त्रास होईल." निखिल तिला समजावत म्हणाला. 

"नाही होणार त्याला त्रास. त्याला ऐकू जाईल तर त्रास होईल ना त्याला." ऋतिका अभयकडे पाहत म्हणाली. 

"म्हणजे? काही समजलं नाही मला."

"म्हणजे तो कोमात गेलाय. आणि कधी शुद्धीवर येईल हे सांगू शकत नाही." ऋतिका थंड स्वरात म्हणाली. 

"काय?" निखिल जवळ जवळ ओरडलाच."काय म्हणताय तुम्ही ऋतिका, हे कसं शक्य आहे. अभय असा कसा कोमात जाऊ शकतो. तुम्ही तर डॉक्टर आहात ना. मग असा कसा गेला तो कोमात हा." निखिल बिथरून गेला होता. कारण अभय कोमात गेलाय हे त्याला खरंच वाटत  नव्हतं. पण हे खरं होतं. कारण मघाशी झालेल्या ऍक्सीडेन्टमध्ये अभयच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती आणि भरपूर रक्तस्राव झाल्यामुळे तो कोमात गेला होता. म्हणूनच ऋतिका इतक्या दुःखात होती आणि त्याच्याजवळून उठली नव्हती. तिलादेखील हे पचवणं जड जात होतं. पण नाईलाज होता. ती देखील स्वतः एक डॉक्टर होती. असं असूनदेखील ती काहीच करू न शकल्यामुळे स्वतःला दोष देत होती. पण हेच वास्तव होतं. आणि ते त्यांना स्वीकारावं लागणार होतं. 

           नशिबापुढे  निखिल आणि ऋतिका दोघेही हतबल होते. निखिलचा जिवलग मित्र कोमात होता आणि ऋतिकाचा ज्याच्याशी काहीच संबंध नव्हता पण एक अनोळखी बंध त्यांच्यात असल्यामुळे तो तिला तितकाच जवळचाच होता. दोघेही समदुःखात होते. निखिलने स्वतःला कसेबसे सावरले. आणि तिथून कसातरी बाहेर आला. ऋतिका अजून तिथेच थांबली होती.  त्याला त्याच्या मित्राच्या आठवणीने आणि काळजीने खूप रडू येत होते. बाहेर येऊन तो लहान मुलासारखा भिंतीला टेकून रडत होता. कसबसं शांत होत तो आता पुढे काय करायचं याचा विचार करू लागला. आता आजीला हे सांगावं कि नको हे त्याला कळत नव्हतं. कारण त्यांना जर समजलं कि तिचा एकुलता एक आधार असा कोमात गेलाय तर त्यांचं काही बरंवाईट होण्याची शक्यता होती. पण बॉबी अंकलना तर सांगावेच लागणार होतं, पण त्यांनी आजीला ह्यातलं काही कळणार नाही ह्या अटीवर सगळं सांगितलं होतं. तिथे असलेल्या गार्ड्सना सांगून  त्यांना २४ तास हॉस्पिटलमध्ये थांबायची सूचना देऊन आणखी काही गार्ड्स बोलावून घेऊन कोणालाही न कळता पहारा देण्याचं सांगतो. कारण फक्त निखिलला आणि त्यांच्या काही ठराविक गार्ड्सनाच ह्याबद्दल माहिती असतं. आणि निखिलला हे बाहेर कोणालाही कळू द्यायचं नव्हतं. 

               त्यांच्या ब्रँच ऑफिस समोरच हे सगळं झालं होतं. पण तिथे कोणी काही कळवलं नव्हतं. निखिलनेच तसं कुणालाही न कळवण्याबद्दल सांगितलं होतं. नाहीतर उगाच बाहेर हि बातमी लीक होऊन लोकं तिथे गर्दी करतील. आणि बाहेर काही ना काही अफवा उठतील. कारण अभय कोणी साधा माणूस राहिला नव्हता. तो आता एक मोठा बिजनेसमॅन झाला होता. एका मोठ्या इंटरनॅशनल लेव्हलच्या कंपनीचा मालक होता आणि त्याच्याबद्दल असलं काही अभयला पसरू द्यायचं नव्हतं म्हणून त्याने खूप गुप्तता बाळगली होती. एवढी कि त्याने हॉस्पिटलमध्ये देखील कोणालाही कळू दिलं नव्हतं कि अभय कोण आहे ते. अगदी ऋतिकाला सुद्धा. म्हणून त्याने हॉस्पिटलच्या डीनशी बोलून घेऊन सर्व प्रकारची गुप्तता पाळून अभयची एका स्पेशल प्रायव्हेट रुम मध्ये ट्रीटमेंट चालू केली होती. 

               ऋतिका नेहमी अभयजवळच बसून असायची.  हॉस्पिटलमधील बाकी कामाच्या मध्ये देखील ती  अभयला एकदा बघून जायचीच. त्याला बघून तिला कसनुसं व्हायचं. पण तिच्या हातात काहीच नव्हतं.  निखिलने थोडे दिवस आपलं ऑफिसचं काम तिथूनच करायचं ठरवलं होतं. म्हणून त्याने जवळच असणाऱ्या एका हॉटेलमध्ये  एक रूम घेतली होती. पण त्याचा जास्तीत जास्त वेळ अभयजवळ असण्यातच जायचा. कारण अभयला कधी शुद्धी येईल सांगता येत नव्हतं.  हॉटेलमध्ये  फक्त तो फ्रेश होण्यासाठी आणि जेवणासाठीच जायचा.  समोर असणाऱ्या ब्रँच ऑफिसमध्ये सांगून तो थोडे दिवस तिथून काम पाहणार असल्याचं त्याने आधीच सांगून ठेवलेलं होतं. अभयच्या अनुपस्थित आता निखिलच्या खांद्यावर सगळी जबादारी होती. बॉबी अंकलशी कॉन्टॅक्ट मध्ये राहून तो ती जबाबदारी सांभाळत होता.  

                   हळूहळू करत पंधरा ते दिवस उलटून गेले होते. अभयच्या प्रकृतीमध्ये काहीच सुधार नव्हता. त्याच्या बाकीच्या जखमा फक्त हळूहळू भरून येऊ लागल्या होत्या. पण तो शुद्धीवर येण्याची काहीच चिन्हं दिसत नव्हती. आता फक्त बाप्पाच काहीतरी करू शकत होते. डॉक्टरांनीदेखील त्यांच्यावरच सगळं सोडून दिलं होतं. ऋतिकाने हार नव्हती मानली. तिला विश्वास होता कि, अभय लवकरच शुद्धीवर येईल. पण आता महिना होत आला तरी काहीच बदल नव्हता. ऋतिकाचं अभयची काळजी करणं, वारंवार त्याची चौकशी करणं, त्याच्या ट्रीटमेंटवर व्यवस्थित लक्ष ठेवणं, त्याच्या औषधं देण्याच्या वेळा पाहणं हे सगळं ती रोज न चुकता मनापासून करत होती. तिच्या मनात खूप सारी प्रश्न होती, तक्रारी होत्या. त्याची उत्तरे फक्त अभयच देऊ शकत होता, पण तोच आता शुद्धीवर नव्हता. ती फक्त तो लवकरात लवकर शुद्धीवर यावा म्हणून वाट पाहत होती आणि रोज गणपती बाप्पा जवळ प्रार्थना करत होती. 

              निखिल हे सगळं पाहत होता. त्याला तिच्याबद्दल सहानुभूती वाटत होती. तिचं अभयबद्दल इतकी काळजी करणं त्याला कुठंतरी बरं वाटत होतं. तिथे राहून ऋतिका आणि निखिलची चांगली मैत्री झाली होती. त्याला मनात कुठंतरी असंच वाटत होतं कि, हीच चिऊ असेल कदाचित. कारण इतकं उगाच कोणी अनोळखी व्यक्तीसाठी करणार नाही. पण हे कळणार कसं?  ह्याचा शोध घेतला पाहिजे आपण. इथे आहे तोपर्यंत हे शक्य होईल. नंतर परत हे जमेल ना जमेल माहित नाही. म्हणून तो योग्य वेळ पाहून तिच्याशी बोलायचं ठरवतो ह्याबद्दल.  आता फक्त तो तिच्याशी बोलायला योग्य वेळ येण्याची वाट पाहत होता. त्यासाठी तो तिच्याशी जमेल तितकी मैत्री वाढवत होता. तेव्हाच तर त्याला समजणार होतं कि, नक्की ऋतिका कोण आहे ते......

Tuesday, April 27, 2021

अनोळखी हे प्रेम - Part 7

             निखिलच्या डोक्यात एक मस्त प्लॅन तयार झाला होता. आता फक्त त्यानुसार सगळ्या गोष्टी झाल्या म्हणजे अभयला त्याची 'चिऊ' मिळेल, असं निखिलच्या मनात  होतं. त्याने तशी कामाला सुरुवात देखील केली होती. संध्याकाळी अभयच्या लॅपटॉप वर बसून त्याने अभयच्या फेसबुकवर तो 'चिऊ आणि म्याऊचा' फोटो टाकला आणि त्याखाली, 

'बचपन के ये दोस्त, बिछड गए युंही चलते चलते,

अधुरी रह गई इनकी दास्तां, 

कोई इनको मिलादे यारा, फिर दोनो मिल जाए हसते हसते'

असं काहीतरी आपल्या भाषेत लिहून टाकून दिले. अभय आपलं बघत होता कि, निखिल नेमकं काय करतोय. 

" अभ्या, मला एक सांग तुझ्या चिऊचं खरं नाव काय होतं?"  निखिलने एवढा वेळ आपल्या मनात असलेला प्रश्न विचारला. 

अभय आठवू लागला. पण त्याला खरंच तिचं नावंच आठवत नव्हतं. आठवत नव्हतं म्हणजे त्याला तिचं नावंच माहिती नव्हतं. मग आठवणार कसं? कारण ते एकमेकांना चिऊ आणि म्याऊच म्हणायचे, त्यामुळे त्यांची खरी नावे दोघांना पण माहिती नव्हती. 

"माहिती नाही रे निखिल." अभय खूप आठवून म्हणाला. 

"माहित नाही म्हणजे? साल्या तुला जिच्यावर लहानपणीपासून प्रेम करतोय तिचं साधं नाव पण माहिती नाही?" निखिल म्हणाला. 

"नाही माहित रे निख्या. त्याला मी तरी काय करणार, कारण आम्ही दोघेही एकमेकांना आम्ही दिलेल्या टोपण नावानेच ओळखत होतो. त्यामुळे खरं नाव माहित तरी कसं पडणार." अभय आपला मान खाली घालत म्हणाला. 

"हा बरं. चल बघतो मी काय करायचं ते आता. तुमचा फोटो तर टाकलाय मी तुझ्या फेसबुकवर. आता सेम असच तू बाकीच्या तुझ्या सोशल नेटवर्किंग साईटवर टाक. म्हणजे कुठून तरी लिंक लागेल." निखिलने अभयला सांगितले. 

"ठीके चालेल." असं म्हणून अभयने निखिलच्या  पुढ्यातील लॅपटॉप घेतला आणि निखिलने सांगितल्याप्रमाणे त्याच्या दुसऱ्या सोशल नेटवर्किंग साईटवर तो फोटो टाकला. आणि पुढे काय होतंय का त्याची वाट पाहू लागला. 

               असेच ४-५ दिवस गेले. काहीच परिणाम झाला नव्हता फोटो टाकून. उलट त्याच्या फेसबुकवरील मित्रांनी त्याची खिल्ली उडवली होती. त्यामुळे अभयला वाटलं कि ह्याचा काही उपयोग होणार नाही. त्याने निखिलला पण तसे सांगितले. तेव्हा निखिलने त्याला आणखी थोडे दिवस वाट बघायला सांगितले. लगेच काही अशा गोष्टी घडत नसतात. तेव्हा अभयकडे आणखी वाट पाहण्याशिवाय पर्याय नव्हता. त्याची बेचैनी आणखी वाढत चालली होती. त्याला मनातून असंच वाटत होतं कि, लवकरात लवकर काहीही करून आपली चिऊ आपल्याला मिळायला हवी. पण ती अशी मिळेल का, ह्याबद्दल त्याला डाऊटच होता. पण तरीही, प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे म्हणून तो गप्प बसला. दिवस जात होते. पण त्याचा काही फायदा होत नव्हता. म्हणून त्याने निखिलला शिव्या घालत तो विषय सोडून दिला. 

                एके दिवशी सकाळी बागेतल्या खुर्चीवर अभय विचार करत बसला होता. 'मिशन चिऊ' तर चालूच होतं. हे खूप महत्वाच होतं त्याच्यासाठी, कारण ते त्याचं लहानपणीचं प्रेम होतं. आणि अचानक त्याला ऋतिकाची आठवण झाली. चिऊच्या नादात तो ऋतिकाला विसरला होता थोडा वेळ. पण आता त्याला परत तिची आठवण आली. काहीतरी आठवून त्याने आपला मोबाईल घेतला आणि त्यात काहीतरी शोधू लागला. पण त्याला काही मिळेचना. ऋतिकाने दिलेला नंबर शोधत होता तो. तिला फोन करण्यासाठी. पण गडबडीत त्याने तिचा नंबर सेव्ह सुद्धा नव्हता केला आणि ज्यावर तिने तो मोबाईल  नंबर लिहून दिला होता तो कागद देखील कुठे तरी हरवला होता. आता बोंबला. कारण त्यादिवशी इकडे येताना जेव्हा तिच्या घरी गेलो होतो, तेव्हा फोन नाही केला म्हणून किती चिडली होती. जसं काय ह्याच्याशी जुनी ओळख आहे तिची आणि आपल्या जवळच्या मित्राने फोन नाही केला म्हटल्यावर जसं चिडतात तशी त्याच्यावर चिडली होती ती. ते आठवून त्याला हसायलाच आलं. पण आपण साधा तिचा नंबरपण सेव्ह नाही केला म्हणून त्याने स्वतःलाच शिव्या घातल्या आणि आता निखिल घालणार त्या वेगळ्याच. 

           त्याला तिची खूप आठवण येत होती. माहित नाही का ते, पण तिचाच सारखा विचार येत होता मनामध्ये. कारण त्याला कुठेतरी असं वाटत होतं, कि हि ऋतिकाच त्याची चिऊ आहे म्हणून. पण त्याला खात्री नव्हती. पण त्याचं मन सारखं तेच सांगत होतं. कारण जेव्हा जेव्हा तो तिला भेटला होता, तेव्हा तेव्हा त्याला तिच्याविषयी एक अनामिक ओढ वाटत होती. तिच्याशी जुनी ओळख वाटत होती. पण त्यावेळीस त्याला चिऊची आठवण न येणं, हे मात्र खटकलं. जर ह्या दोघी वेगळ्या असतील तर आपण आपल्या लहानपणीच्या प्रेमाला फसवत असल्याची भावना त्याच्या मनात आली. मनातल्या मनात तो खजील झाला. ह्या सगळ्या गोष्टींचा त्याला लवकरात लवकर शोध लावायचा होता. पण कसं, हे त्याला उमजत नव्हतं. 

"काय साहेब, कसला विचार करताय एवढा?" निखिलने अभयला आल्या आल्या विचारले. 

विचारांच्या तंद्रीतून बाहेर येत त्याने निखिलकडे पहिले तर तो त्याच्या कडेच बघत होता. 

"काही नाही रे असच" अभय काहीतरी बोलायचं म्हणून म्हणाला. 

"सांग रे, उगाच काही लपवायच्या भानगडीत पडू नकोस उगाच. सांग मुकाट्याने." निखिलने एक टपली त्याच्या डोक्यात मारत म्हटले. 

आता ह्याला सांगावंच लागणार म्हणून अभयने एक मोठा श्वास घेतला आणि म्हणाला,

"चिऊ आणि ऋतिकाचा विचार करत होतो."

"वाटलंच होतं मला कि, हे बेणं हाच विचार करत असणार म्हणून." निखिल आपले दोन्ही हात डोक्याजवळ नेत खुर्चीत रेलून बसत म्हणाला,

"काय काय विचार केलात मग आपण नेमका."

"यार निख्या हे बघ, मी जेव्हापासून ऋतिकाला पाहिलंय, तिला भेटलोय तेव्हापासून मला तिच्याबद्दल एक अनामिक ओढ वाटतेय. असं वाटतंय कि, ती माझी खूप जुनी मैत्रीण आहे. मी तिला खूप आधीपासून ओळखतोय. पण तसं बघायला गेलं तर चिऊनंतर माझी कुठलीच मैत्रीण नाहीय. त्यामुळे हे शक्य नाहीय. आणि जर ती चिऊ असती तर तिने मला लगेच ओळखलं असतं किंवा मी तरी तिला ओळखलं असतं "

"हा, पण तुझी चिऊ आणि तू खूप लहान होता ना, जेव्हा तुम्ही लोकांनी ते ठिकाण सोडलं तेव्हा. मग तेव्हा आणि आता तुझ्यात आणि तिच्यात काही बदल झाला असेल का नाही? कि तुम्ही दोघे पण आता तसेच दिसणार आहेत लहानपणीसारखं?" निखिलने विचारले. 

"हो, बदलेलं तर असू." अभय भोळसटपणे म्हणाला.   

"मग लेका कसं ओळखणार ती तुला."

"यार पण तरी सुद्धा तिने ओळखलं असतं मला."

"हो बरं. जर तिने तुला ओळखलं असतं आणि जर ती ऋतिकाच चिऊ असती तर तिने लगेच तुला मिठी मारली असती किंवा निदान ओळख तरी दाखवली असती." निखिल म्हणाला. 

"हो, ते पण आहेच."

"मग कशावरून तू असं म्हणत होतास अभ्या?" निखिलने अभयला प्रश्न केला. 

"निख्या माझं मन म्हणतंय तसं. राहून राहून मला सारखं हेच वाटतंय कि, ऋतिकाच चिऊ आहे म्हणून. ते तिला विचारणार होतो मी पण गडबडीत नाही जमलं ते आणि आता तिला कॉल करायला मोबाईल घेतला तर..." अभय मधेच थांबत म्हणाला. 

"तर काय अभ्या?" निखिलने प्रश्नार्थक नजरेने अभयकडे पहिले. 

"तर तिचा नंबरच नाहीय माझ्याकडे." अभय हताशपणे म्हणाला. 

"काय?" निखिल जवळ जवळ ओरडलाच, "अरे तिने दिलेला ना तिचा मोबाईल नंबर."

"हो दिलेला, पण मी तो तेव्हा सेव्ह नव्हता केला. म्हणजे माझ्या लक्षात नव्हतं राहिलं आणि ज्यावर तिने तो लिहून दिलेला तो कागद पण हरवलाय."

"अरे देवा. धन्य आहात तुम्ही अभय साहेब. खरंच धन्य आहात. काय फायदा रे तुझा एवढा हुशार असून साल्या. खाल्लीस ना माती शेवटी. तुला साधा एक मोबाईल नंबर जपून ठेवता नाय आला. तो पण एका मुलीने दिलेला. च्यायला आम्ही इकडे तरसतो मुलींनी आम्हाला मोबाईल नंबर द्यावा म्हणून आणि तू, तू तर स्वतःहून मुलीने दिलेला मोबाईल नंबर हरवून बसला आणि तो पण कोणाचा तर जिच्यावर प्रेम करतो तिचाच. वा भाई. आपके चरण कहा है प्रभू ." असं म्हणून निखिल अभयच्या पाय पडायला खाली वाकला. 

अभयला माहिती होतं निखिल त्याच्यावर भडकणार ते. म्हणून तो त्याला हे सांगणार नव्हता. पण बोलता बोलता तो नकळत बोलून गेला आणि आता त्याच्या शिव्या खात होता. 

"अरे निख्या नाही राहिलं लक्षात तेव्हा. मी तिच्याच विचारांत होतो तेव्हा." अभय आपलं सारवासारव करत होता. त्याला माहिती होतं कि निखिल आता काय त्याला सोडणार नाय. त्याला पार पिळून काढणार. 

"हो का. अरे माणसा मग निदान माझ्याकडे तरी द्यायचा. मी तरी ठेवला असता ना सांभाळून. तुला कदरच नाय रे मुलींची. आता बस बोंबलत" निखिल अभयवर उखडतच होता. त्याच्या मते अभयने फार अक्षम्य गुन्हा केलेला होता. 

"ओ कदरदार. हो देणारच होतो, पण तेव्हाच हरवला तो." अभय म्हणाला. 

"अच्छा म्हणजे माझ्याकडे द्यायचा म्हणून हरवला कि माझ्याकडे देण्याअगोदर हरवला. हा" निखिल म्हणाला. 

"अरे तुझ्याकडे देण्याअगोदर रे निख्या" अभय आपलं बचावकार्य करत होता. 

"च्यायला अभ्या, काय तू पण?" निखिल म्हणाला. 

"अरे मला काय माहिती असं होईल म्हणून. आणि तसंही मला काय सवय नाय ना तुझ्यासारखी असल्या गोष्टींची." अभयने निखिलच्या नसेवर दाबलं. 

"हो ना, तरीच म्हटलं अजून मला कसं काय नाय बोलला अजून ते." निखिल अजूनच चरफडला. 

"मी सांगतोय रे फक्त, तुला नाय काय बोलत आहे निख्या" अभय आपलं येणारं हसू दाबत म्हणाला. 

"कळतं रे अभ्या, मला कळतं सगळं साल्या. एकतर तुमची मदत करा आणि वरतून तुमचीच बोलणी ऐका. भलाईका जमानाच नहीं रहा अभी तो" निखिल नाटकी आवाज करून म्हणाला. तसं अभयला हसू फुटलं. 

"बरं बास रे बाबा, आता किती बोलशील अजून. सॉरी यार. पुढल्या वेळी लक्षात ठेवीन." अभय शरणागत पत्करत म्हणाला. 

"अभ्या अरे, असं नाय रे. पण असा चान्स सारखा सारखा नाय भेटत. आता कसं कॉन्टॅक्ट करणार तू तिला. ती बिचारी तुझी वाट बघत असेल आणि तू इकडे तडपतोय तिच्यासाठी. कुठेतरी जुळत आलं होतं तुमचं. आता मला बघवत नाहीय यार. एकतर आपण इकडे आलोय तुझ्या घरी. ती किती लांब आहे माहितीय ना. आणि आपण परत कधी जाणार ते पण काही सांगत नाहीस तू." निखिल अभयला समजवत म्हणाला. 

"हो जाऊयात लवकरच, इकडे ज्या कामासाठी आलोय ते झालं कि जाऊयात. थोडे दिवस थांब. तोपर्यंत हा ऋतिकाचा विषय थांबवूयात. आणि चिऊचा पण"

"मी थांबवेन रे, पण माझ्या मित्रा तू राहू शकशील का? किती बेचैन होत होतास तिच्यासाठी. बघितलंय मी तुला. कसा राहशील मग? आणि चिऊचं काय?" निखिल काळजीने म्हणाला. 

"नको काळजी करुस निख्या. जसा इतके दिवस चिऊशिवाय राहिलो तसाच आणखी थोडे दिवस राहील आणि ऋतिकाचं म्हणशील तर थोड्या दिवसांचा तर प्रश्न आहे. आधी इथलं महत्त्वाचं काम झालं कि मग चिऊ आणि ऋतिकाला शोधून नक्की त्या दोघी एकच आहेत कि वेगवेगळ्या हे क्लिअर करेन." अभय काहीतरी विचार करत म्हणाला. 

"हम्म बरं." निखिल म्हणाला. "पण कसलं महत्वाचं काम आहे अभ्या तुझं इकडं?" निखिलला अभयच्या बोलण्याचा अर्थ न समजून त्याने विचारले. 

अभय आपल्या विचारात होता, आपण नेमकं काय कामासाठी आलेलो तेच करायचं राहून गेलं होतं. आजीने आपल्याला आता हा आपला बिजनेस सांभाळण्यासाठी बोलावून घेतलं होतं. आणि त्यात निखिलची आपल्याला मदत होईल आणि तो आपल्या सोबतपण राहील म्हणून निखिलला आपल्या बिजनेस संदर्भात कामासाठी घेऊन आलेलो. त्याची आपल्याला काही मदत होईल बिजनेस साठी. बाहेरच्या गोष्टीमध्ये त्याचं डोकं तसंही भरपूर चालतं. तिकडे असता तर फुकट त्याच टॅलेंट वाया जाण्यापेक्षा त्याचं डोकं आपल्या बिजनेस मध्ये वापरलं तर त्याचाही फायदा आहे त्यात आणि आपलाही. आपल्यासोबत राहून त्याचीही प्रगती होईल आणि आपल्या मनालाही शांती होईल. आजीसोबत पण तो ह्यासंदर्भात बोलला होता. तेव्हा आजीलाही काही हरकत नव्हती. उलट तिला आपल्या नातवाचे कौतुक वाटलं. 

"अरे निख्या, तुला मी म्हटलं होतं ना, कि आपल्याला बिजनेस करायचा आहे वगैरे. आठवलं का?" अभय आपल्या विचारांच्या गराड्यातून बाहेर येत म्हणाला. 

आपल्या मेंदूवर जोर देत काहीतरी आठवून निखिल म्हणाला,

"अरे हो, तू  बोललेलास एकदा. पण त्याचं काय आता."

"हा तर त्याच संदर्भात बोलायचं आहे तुझ्याशी." अभय म्हणाला. 

"हा बोल. पण मी तर बिजनेस चालू करणार आहे पण त्याला वेळ आहे रे साल्या अजून. आधी त्यासाठी पैसा वगैरे तर जमवू दे. मग करू कि आपला बिजनेस चालू." निखिल मस्तपैकी डोक्याच्या मागे हात करून रेलून बसत म्हणाला. 

"अबे ओये. अंबानींची औलाद." अभय निखिलच्या डोक्यावर एक टपली मारत म्हणाला," मी असताना तुला दुसरा बिजनेस चालू करायची काय गरज?"

"म्हणजे?" निखिल आपलं डोकं चोळत म्हणाला. अभयची टपली जोरात लागली होती त्याला. 

"म्हणजे इकडे मी आमचा बिजनेस जॉईन करायला आलो आहे. आजीने मला त्यासाठीच बोलावून घेतलंय. एकदा एकदा का मी ह्यात सेटल झालो कि, नंतर माझी पर्सनल कामं करता येतील. आणि तुझ्यासाठी पण एक काम आहे."

"काम? म्हणजे नेमकं काय म्हणायचं आहे तुला." निखिलला काहीच समजत नव्हतं. 

"म्हणजे, तुझ्यासाठी एक ऑफर आहे." अभय मस्त एक स्माईल देत म्हणाला. 

"कसली रे?" निखिल न कळून म्हणाला. 

"तुला मी आपल्या बिजनेस मध्ये इन्व्हॉल्व्ह करून घेतोय. आज आणि आता पासून. आणि आपल्याला त्यासाठीच ऑफिसला जायचं आहे काही फॉर्मॅलिटीज पूर्ण करायला. आजपासून तू माझ्यासोबत काम करणार आपल्या बिजनेसमध्ये " हे सांगून अभय आपल्या हाताची घडी घालून निखिलच्या चेहऱ्यावर काय भाव येतात ते पाहू लागला. 

क्षणभर त्याचा आपल्या कानांवर विश्वासच बसला नाही. नाही म्हणजे, अभय आपल्याला त्याच्या बिजनेसमध्ये  सामील करून घेतोय आणि का? आपली तेवढी क्षमता आहे का? कारण अभयची कंपनी हि एक इंटरनॅशनल लेव्हलची कंपनी आहे. आणि तिथे काम करायला आपल्याला काही येतं तरी का ? आपलं आताच तर कॉलेज झालय. अजून रिजल्ट यायचाय. आणि हा भाऊ म्हणतोय डायरेक्ट आपल्या कंपनीत ये म्हणून. त्याचं एक ठीक आहे, त्याला जन्मजात ते स्किल्स आहेत. म्हणून तो करेल सगळं मॅनेज आणि आपलं काय? साला आपण तर त्याची कंपनी विकायला काढू? आपल्या विचारांचं त्याचं त्यालाच हसू आलं. 

"अबे ये निख्या, हसतोय काय. बोल कि काहीतरी." अभय त्याला हसताना पाहून म्हटलं. त्याला हे कळेना तो हसतोय का ते. 

"जोक भारी मारला रे तू म्हणून हसायला आलं मला." निखिल  म्हणाला. 

"जोक  नाय रे साल्या, खरं बोलतोय मी. तुला माझ्यासोबत आपल्या कंपनीत काम करायचं आहे." अभयचा निर्णय झाला होता आधीच. त्यामुळे तो निखिलचं काही जास्त ऐकून घेणार नव्हता. 

"पण अभ्या, मला काय येत नाय रे अजून काही आणि कसला अनुभव वगैरे नाहीय मग तुझ्या एवढ्या मोठ्या कंपनीत माझं काय काम? तुला तुझी कंपनी बुडवायची आहे का साल्या?" निखिलने आपल्या मनातलं बोलून दाखवलं. 

"अरे काही नाही होत. बॉबी अंकल आणि आजी आहेत सगळं शिकवायला आपल्याला. मी पण नवीनच आहे ह्या सगळ्यांत. मला तरी कुठे एवढं काय येतं." अभय म्हणाला. 

"तुझं ठीक आहे रे बाबा, तुझ्यात आधीपासून तेवढं टॅलेंट आहे त्यामुळे तू हे सगळं करू शकतोस. आपल्याला नाही जमणार हे सगळं." निखिल हात हलवत म्हणाला. 

"निख्या, च्यायला सांगितलं ना तुला एकदा. मग मुकाट्याने ऐकायचं. नायतर देईल एक ठेऊन." अभय निखिल ऐकत नाही हे पाहून रागात म्हणाला. तसा निखिल गप्प खाली बसला आणि अभयकडे  पाहू लागला. ते पाहून अभयला  हसू आलं. तसा तो नरमाईने म्हणाला,

"यार निखिल ऐक माझं, हे बघ तुला सुद्धा बिजनेस करायचा आहे आणि मला सुद्धा बिजनेसच करायचा आहे. बरोबर" 

निखिलने मान डोलावून 

"हो"  म्हटलं. 

"आणि इकडे आपल्याला तो चान्स भेटतोय. तू तुझा बिजनेस उभा करणार त्यासाठी तुला खूप मेहनत घ्यावी लागणार. खूप पैसे लागणार. वेळ लागणार. आणि तुला अजून माहित पण नाहीय कि तुला नक्की  कसला बिजनेस करायचा आहे. तुला तर फक्त बिजनेस करायचा एवढंच माहित आहे. ह्या सगळ्यांमध्ये खूप वेळ वाया जाईल आणि हाती काहीच लागणार नाही. मला माहितीय कि तु करशील बिजनेस, पण तो एका लेव्हल पर्यंत. त्यापुढे काय?" अभय निखिलला समजावत होता.

"इकडे तुला पण तेच करायचं आहे. मी काही तुला माझ्या हाताखाली वगैरे ठेवत नाहीय तर तु माझ्या सोबत राहणार आहेस आपल्या बिजनेस मध्ये. तू ज्या गोष्टी बाहेर जाऊन एकटाच धडपडून करशील त्याच गोष्टी तुला इथेही करायला भेटतील. इकडे आपल्या खूप साऱ्या कंपन्यांचे ग्रुप्स आहेत. तुला ज्या कंपनीत इंटरेस्ट आहे तू त्या कंपनीचा बिजनेस हॅन्डल कर. आपण दोघे मिळून हा बिजनेस चालवू पुढे. कारण आता आजीला जास्त लक्ष द्यायला जमत नाहीय आणि बॉबी अंकल तरी किती दिवस हॅन्डल करणार हे सगळं. त्यामुळे आपण दोघांनी जर हे सगळं आपल्या डोक्यावर घेतलं तर दोघे मिळून आपण खूप काही करू शकतो. आजी आणि बॉबी अंकल आहेतच आपल्या सोबत. ते सांगतील सगळं आपल्याला. आपलं काही चुकलं तर शिकवायला. माहितीय मला कि आपलं आताच कॉलेज झालंय आणि अजून आपल्याला कसलं नॉलेज नाहीय, पण विचार कर निखिल आपण जर ह्या  वयात  बिजनेस मध्ये इन्व्हॉल्व झालोत तर आपल्याला किती काय काय करता येईल आणि किती काही शिकता येईल. आपण आता इतके हि लहान नाही आहोत कि आपल्याला काही कळत नाहीय. आपण नक्कीच यशस्वी होऊ. विचार कर, छत्रपती शिवाजी महाराजांनी लहान वयातच स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती आणि पुढे जाऊन त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं होतं. जर त्यांनी त्यावेळीस हा विचार केला असता कि, आपण आता लहान आहोत. आपण मोठे झाल्यावर स्वराज्य स्थापन करू. तर नंतरची परिस्थिती हि वेगळी असती. त्यांनी आलेल्या संधीचा फायदा घेऊन त्यानुसार  कामगिरी केली. म्हणूनच ते यशस्वी झाले. आणि आपल्याला सुद्धा हेच करायचं आहे. बघ विचार कर आणि सांग मला " इतकं बोलून अभय शांत झाला. 

अभयने निखिलचा क्लीन बोल्ड केला होता, कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्यावर त्याचा आत्मा सळसळला. त्याला अभयला नकार द्यायचं कारणच दिसेना. त्याला स्फुरण चढले.  

"चल अभ्या मी आहे सोबत. काय होईल ते बघून घेऊ आता. येत नसलं काय म्हणून काय झालं. शिकून घेऊ आपण सगळं. हा मावळा आहे तुझ्यासोबत." निखिल जोशात येऊन म्हणाला. 

"ये हुई ना बात" असं म्हणत अभयने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. त्याचा अवतार पाहून अभयला बरं वाटलं. त्याची मात्रा बरोबर लागू पडली होती त्याच्यावर. 

                  झालं. दुसऱ्या दिवशी अभयच्या आधी निखिल तयार होऊन आला. नाश्ताच्या टेबलवर त्याची वाट पाहत बसला. थोड्याच वेळात अभय पण आला आणि त्याच्या बाजूला बसला. त्याला आपल्या आधी आलेला पाहून तो चमकला. पण काही बोलला नाही. तो पण ऑफिस ला जायला उत्सुकच होता. पण निखिल जरा जास्तच. कालचं आपलं लेक्चर आठवून त्याचं त्यालाच हसू आलं. निखिल कसली तरी फाईल घेऊन बघत होता. ते पाहून अभय त्याला म्हणाला,

"अरे वा, सकाळी सकाळी कामाला सुरुवात पण केलीस तू. क्या बात है?"

"हो मग, करायला नको. शिकायचं आहे ना सगळं, मग सुरुवात तर करायलाच पाहिजे ना." निखिल अजूनच फाईल मध्ये घुसत म्हणाला."पण साला हि फाईल कसली आहे, ते कळलं नाही अजून मला. सगळे हिरो आणि हिरोइन्स चे फोटोच आहेत राव ह्याच्यात. काय तुमची कंपनी मॉडेल वगैरेचे फोटो छापते काय?"

अभयने त्याच्या कडे बघितले आणि एकवार त्याच्या हातातल्या फाईलकडे नजर टाकली. निखिलच्या डोक्यात एक टपली मारून अभय जोरात हसायला लागला. इतका कि त्याच्या हसण्याच्या आवाजाने आजी आणि बॉबी अंकल पण लगेच तिकडे आले. 

"काय झालं रे हसायला तुला?" निखिलने अभय का हसतोय हे न कळून विचारलं. आजी आणि बॉबी अंकल 

अभयला त्याचं हसू आवरत नव्हतं. कसबसं आपलं हसू दाबत तो म्हणाला,

"साहेब, तुम्ही मघापासून जी फाईल घेऊन वाचताय ना एवढं मन लावून ती एक मॅगझीन आहे. त्यात सगळ्या बातम्या आणि हिरो हिरोइन्सचे कारनामे असतात. आपल्या कंपनीचा आणि त्या मॅगझिनचा काही एक संबंध नाहीय." असं म्हणून अभय परत जोर जोरात हसायला लागला. त्याच्या हसण्याचा अर्थ लक्षात येऊन आता आजी आणि बॉबी अंकल पण त्याच्या हसण्यात  सामील झाले. त्या सगळ्यांत निखिलचा चेहरा मात्र बघण्यासारखा झाला होता. 

                 नाश्ता करून झाल्यावर आजीने बॉबी अंकलला अभय आणि निखिल आजपासून ऑफिसला येणार आहेत हे सांगितलं. त्यांनादेखील हे ऐकून आनंद झाला. 

"अभिनंदन अभय बाळा. चला आजपासून आम्हाला आमचे नवीन साहेब मिळाले." असं म्हणून त्यांनी अभयशी हात मिळवले. 

"साहेब काय म्हणताय बॉबी अंकल, तुमच्यासाठी मी अजून तोच अभय बाळ आहे आणि कायम अभय बाळच राहणार." असं म्हणून अभय त्यांचा आशीर्वाद घ्यायला खाली झुकला. पण बॉबी अंकलनी त्याला अडवले आणि म्हणाले,

"अभय बाळा, तुमची जागा आमच्या हृदयात आहे. पायाजवळ नाही." आणि त्यांनी अभयला मिठी मारली. हे बघून आजीचे डोळे भरून आले. अभयने आजीचा आशीर्वाद घेतला. 

"यशस्वी भव: शतायुषी भव:" आजीने आपल्या नातवाला मायेने आशीर्वाद दिला. आता आपला अभय पुढच्या वाटचालीसाठी तयार झालेला पाहून आजीचा ऊर भरून आला होता. 

"अभय बाळा, आता हे सगळं तुझ्यावर सोपवतोय. माहितीय हे सगळं खूप लवकर होतंय, पण मला खात्री आहे कि तू हे व्यवस्थित संभाळशील."

"हो आजी नक्कीच." अभय आत्मविश्वासाने म्हणाला. 

निखिल हे सगळं पाहत होता. त्यालासुद्धा आपण खूप नशीबवान आहोत म्हणून आपल्याला अभयसारखा मित्र भेटला असं वाटत होतं. तेवढ्यात आजीने निखिलला आवाज दिला. 

"निखिल बाळा, अभयसारखाच तुही माझा  नातू आहेस. कायम दोघे सोबत राहा. एकमेकांची साथ कधीच  सोडू नका. आलेल्या संकटाना धैर्याने सामोरे जा आणि यश मिळवा. मला तुम्हा दोघांनाही एकत्र  यशस्वी झालेलं पाहायचं आहे." 

"हो आजी. तुमच्या म्हणण्याप्रमाणेच होईल सगळं." अभय आणि निखिल एकदमच म्हणाले. आणि त्या दोघांनी आजीचा निरोप घेतला आणि ऑफिसला जायला निघाले. आपल्या नातवाचा तिला आधीपासूनच अभिमान होता, पण आता तिची मान अभिमानाने आणखीनच उंचावली होती. 

                हळू हळू दिवस सरत होते. चार-पाच वर्ष झाले असतील. अभय आणि निखिलचा हा प्रवास तर सुरु झाला होता. ते दोघेही हळू हळू सगळ्या गोष्टी शिकत होते, आत्मसात करत होते आणि तितक्याच लवकर प्रगती करत होते. आधीचा त्यांचा असणारा बिजनेस त्यांनी अजूनच वाढवला होता. अभय अगदी मन लावून कामी करत होता आणि निखिलही त्याला मनापासून साथ देत होता. आज अभयमुळेच निखिलचं बिजनेसमॅन होण्याचं स्वप्न पूर्ण झालं होतं. त्यामुळे निखिल त्याची साथ दयायला कुठेच कमी पडत नव्हता. आजी आणि बॉबी अंकल त्याची प्रगती पाहून सुखावले होते. कारण एका राजकुमाराचे रूपांतर आता एका राजामध्ये झाले होते. निखिल त्याच्या घरी सांगून इकडेच शिफ्ट झाला होता. त्याच्या घरच्यांनी देखील आपला मुलगा चांगल्या संगतीला लागलेला पाहून त्याला परवानगी दिली होती. महिन्यातून एकदा तो त्यांना भेटायला घरी जात असे. त्याच्या घरचे देखील आनंदात होते आपल्या मुलाची प्रगती पाहून. आपला मुलगा अशी प्रगती करू शकतो याचे त्यांना नवल वाटत होते आणि तितकेच अभयचे कौतुकही. 

          अभय जेव्हापासून ऋतिकाला भेटला होता, तेव्हापसून ऋतिका एका वेगळ्याच जगात हरवलेली असायची. सारखा अभयचा विचार तिच्या मनात येत असायचा. पण लगेच तिच्या म्याऊचा विचार आला कि तो अभयचा विचार झटकून टाकत असे. का माहिती नाही, पण तिला अभयबद्दल एक वेगळीच ओढ वाटू लागली होती. कसा तो अचानक आपल्याला भेटला तेही ऍक्सीडेन्टच्या कारणाने. तेव्हाच त्याला पहिल्यांदा बघून त्याच्याबद्दल एक ओढ निर्माण झाली होती. त्याच्यात असं काहीतरी होतं कि, जे ऋतिकाला त्याच्याकडे खेचत होतं. एक अदृश्य बंध होतं त्यांच्यात. एक अनामिक ओढ होती. एक असं अनोळखी नातं होतं कि ज्याला प्रेमही म्हणू शकतो. पण ऋतिका म्याऊच्या कारणास्तव हे स्वीकारू शकत नव्हती. कारण म्याऊ तिचं पहिलं प्रेम होतं आणि ती त्याला विसरू शकत नव्हती. इतक्या वर्षांनंतरही तिचं त्याच्यावरचं प्रेम कमी झालेलं नव्हतं. तिला हेदेखील माहित नव्हतं कि, तिचा म्याऊ सध्या कुठे आहे. काय करतोय. एवढ्या वर्षांनंतर तो अजून पण तिला भेटला नव्हता. पण तिला खात्री होती कि, तिचा म्याऊ तिला एक दिवस नक्की भेटेल. जसा तो स्वतःहून दूर गेला होता, तसाच तो स्वतःहून तिला शोधत येईल. 

           म्याऊ तिच्यापासून दूर गेल्यावर ऋतिका देखील तिच्या वडिलांची बदली झाली म्हणून ते गाव सोडून दुसरीकडे राहायला गेली तिच्या कुटुंबासमवेत. तसंही तिथे राहून तिला म्याऊची सारखी आठवण येत होती. तो परत तिच्यासोबत खेळायला येईल म्हणून सारखी त्याची वाट बघत असायची. पण हळूहळू तिलादेखील कळून चुकले कि, तो आता परत कधीच येणार नाही. तिच्यापासून तो दूर कुठेतरी निघून गेला होता. तिला न सांगता. आपल्याशिवाय एक क्षणही न राहणारा आपल्याला सोडून कसा काय जाऊ शकतो, हेच तिला कितीतरी दिवस खरं वाटत नव्हतं. पण नंतर तिने आपल्या बालमनाला समजावले आणि तो परत येईपर्यंत त्याची वाट बघायची असा निरागस पण ठाम निर्णय घेतला. तिला विश्वास होता तिचा म्याऊ नक्कीच परत येईल तिच्याकडे. आणि एकदा तो परत आला कि, त्याला कुठे जाऊ नाही देणार मी. 

           तेव्हापासून आजपर्यंत ऋतिका तिच्या म्याऊची वाट बघत होती. अभयला पाहून तिला एक वेळ असच वाटलं कि,तोच तिचा म्याऊ आहे.  तिला उगाच असं वाटत होतं कि, अभय आपला खूप जवळचा मित्र आहे आणि तो सध्या आपल्याला विसरलाय. त्याच्या बद्दल  तिच्या मनात एक ओढ निर्माण झाली होती. एक आपुलकीपणा जाणवत होता. पण तिला खात्री नव्हती, कि तोच तिचा म्याऊ आहे ते. जर तो म्याऊ नसेल आणि आपण जर त्याच्या प्रेमात पडलो, तर ती  आपल्या लहानपणीच्या प्रेमासोबत प्रतारणा ठरली असती. म्हणून भलेही तिला अभयबद्दल कितीही काही वाटू दे. ती आपल्या म्याऊवरच्या निस्सीम प्रेमावरच ठाम राहणार होती. जोपर्यंत तिला खात्री होत नाही कि, अभय आणि म्याऊ वेगवगळे आहेत. तोपर्यंत तिने अभयचा विचार करणं सोडून द्यायचं असं ठरवलं.  जर अभयच म्याऊ असेल तर तिच्यासारखी नशीबवान व्यक्ती कुणी असणार नव्हती. ती मनोमन बाप्पाला हीच प्रार्थना करत होती. कदाचित बाप्पाच्या मनात देखील हेच असावे. पण योग्य वेळ येण्याची प्रतीक्षा असावी. तसंही अभय तिला जास्त भेटला नव्हता. त्या दोन-चार भेटीनंतर मात्र तो अचानक कुठे गायब झाला होता. शेवटच्या भेटीनंतर जाताना तो परत तिला भेटेल कि नाही अशी तिच्या मनात भीती होती आणि तीच खरी ठरली होती. त्यांनतर अभय तिला भेटलाच नव्हता. हळूहळू अभय तिला विस्मरणात गेला. ती फक्त म्याऊचा विचार करायची. त्याला कसं शोधता येईल याच्या विचारात ती नेहमी असायची. 

            आज पाच वर्षं झाली होती. तिकडे अभय एक यशस्वी बिजनेसमॅन आणि इकडे ऋतिका एक चांगली डॉक्टर झाली होती. शहरातल्या एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये ती कार्यरत होती. तिच्या प्रेमळ आणि मनमिळाऊ वागण्यामुळे आणि हुशारीमुळे ती अल्पावधीतच नावारूपाला आली होती. आजच्या तारखेला तीची शहरातल्या चांगल्या डॉक्टरांमध्ये गणना होत होती. तिने आपल्या घराजवळ एक स्वतःचं  क्लीनिक सुरु केलं होतं. पण ते गरीब आणि गरजू लोकांसाठी. त्यांच्यावर ती मोफत उपचार करायची. आपल्या हॉस्पिटलमधल्या वेळा सांभाळून ती एक प्रकारे समाजसेवाच करत होती. आणि त्यासोबतच विविध अनाथ आश्रमांना वैद्यकीय सेवा पुरवत होती.  तिच्या अण्णांना तिचा खूप अभिमान होता. आपली ऋतिका म्हणजे सोनं आहे असंच वाटायचं त्यांना. 

            ऋतिका आपल्या क्लीनिक आणि हॉस्पिटल मध्ये खूप बिझी झाली होती. सकाळची संध्याकाळ कधी व्हायची हेच तिला कळायचं नाही. तिचं डेलीचं रुटीन पण अगदी ठरून गेलं होतं. पण ह्या सगळ्यात ती तिच्या म्याऊला विसरलेली नव्हती. ती अजुनपण त्याचीच वाट पाहत होती. ह्या सगळ्यातून उसंत मिळाली कि, ती म्याऊच्या आठवणीत रमून जात असे. कुठे खेळणारी लहान मुले दिसली कि तिला त्यांच्यात तेच लहानपनीचे चिऊ नि म्याऊ दिसायचे. तिने आपल्या केबिन मध्ये देखील त्यांचा एक लहानपणीच फोटो लावला होता. त्यामध्ये ती म्याऊला शोधत राहायची.

            ऋतिकाच्या हॉस्पिटलसमोर रस्त्याच्या पलीकडे एक  मोठ्या कंपनीचं ऑफिस होतं. कंपनी खूप मोठी असणार असं त्या ऑफिसकडे बघून वाटायचं. ती कुठली आणि कोणाची  कंपनी आहे, ह्याबद्दल ऋतिकाने कधी विचार नव्हता केला. पण काय माहित, पण अचानक तिच्या मनात विचार चमकून गेला आणि सोबत एक प्रकारची बेचैनी देखील आली.  हॉस्पिटलमधल्या आपल्या केबिनमध्ये बसून तिच्या मनात विचार तो डोकावला. ही नक्की कोणाची कंपनी असेल आणि तिचा  मालक कोण असेल. खूप मोठी कंपनी असेल हि आणि तिचा मालकही तेवढाच मोठा माणूस  असेल. पण जाऊदे आपल्याला काय करायचं. आपल्याला कुठे तिथे जॉबला जायचं आहे. असं म्हणून तो विचार झटकून टाकला आणि ती आपल्या व्हिजिटला निघाली. पण जाताना तिला उगाच त्या फोटोमधील म्याऊ हसल्यासारखा वाटला. तसा तो फोटो ते दोघे हसत असतानाच काढला होता. पण नेमका तो खरंच हसला कि ह्याचा तिला भास झाला असं समजून तिने त्याकडे दुर्लक्ष केले. 

           अभयला आज सकाळपासून वेगळेपण जाणवत होतं. आज नक्कीच  काहीतरी वेगळं घडणार असं त्याचं मन त्याला सांगत होतं. अभय आपल्या कंपनीच्या वेगवेगळ्या शहरातील असणाऱ्या ब्रांचला भेट द्यायला जाणार होता. तसं त्याने सुरुवात देखील केली होती. सगळीकडे भेट देऊन झाल्यावर शेवटची एक ब्रँच उरली होती. तिकडेच आज जायचं होतं. तेव्हाच अभयला असं जाणवू लागलं होतं. जाऊयात कि नको असं अभयला वाटत होतं. पण शेवटचीच एक ब्रँच उरलीय आणि परत ह्या सगळ्यांसाठी वेळ नाहीय म्हणून तो जायला निघाला. पण त्याचं हृदय मात्र जोरजोरात धडधड करत होतं. आज कितीतरी दिवसांनी तो हे धडधडणं अनुभवत होता. आणि त्याला अचानक ऋतिकाची आठवण झाली. हो अचानकच. कारण इतकी वर्षं तो तिला विसरलेलाच होता. किंबहुना कामाच्या गडबडीत आणि बिजनेसमध्ये सेटल व्हायच्या भानगडीत त्याला ऋतिकाचा विसर पडला होता. फक्त त्याच्या चिऊला सोडून. ती नेहमी त्याच्या लक्षात राहायची. दिवसभर कितीही बिझी असला तरी रात्री झोपताना तो चिऊची आठवण काढतच झोपायचा. पण आज इतक्या वर्षांनी ऋतिका कशी आठवली अचानक हेच त्याला समजेना. कारण जेव्हा ती त्याला भेटली होती तेव्हा तो तिला कधी विसरणारच नाही असं वाटत होत. पण तो देखील ऋतिकासारखंच आपल्या लहानपणीच्या प्रेमासमोर एकमेकांना विसरले होते. 

           याबद्दल त्याने निखिलशी बोलायचं ठरवलं. म्हणून तो गाडीत बसून  निखिल यायची वाट  बघू लागला. लगेच निखिलदेखील आला आणि ते निघाले. थोडं पुढे गेल्यावर अभयने निखिलला सांगायचं ठरवलं. 

"निखिल" अभयने पुढे बसलेल्या निखिलला आवाज दिला

"हा बोल अभ्या. काय झालं रे" त्याच्या आवाजवरून काहीतरी झालं असं वाटून निखिल म्हणाला. 

 "निखिल, यार आज खूप बेचैन वाटतंय" अभय म्हणाला. 

"का रे? काय झालं? तब्येत ठीक नाहीय का? निघताना तर व्यवस्थित होतास कि"

"नाही रे, बरा आहे मी फक्त थोडं अस्वस्थ वाटतंय, जसं ऋतिका पहिल्यांदा भेटल्यावर वाटत होतं तसंच वाटतंय." अभयने निखिलला मनातलं बोलून दाखवलं. 

"काय पण काय अभ्या, च्यायला तू तर तिला विसरून पण गेला होतास इतक्या वर्षांत. आणि आज अचानक तुला कशी आठवली ती. त्या दिवसांनंतर कधी साधा तिचा विचारपण केला नाहीस आणि आज म्हणतोय की, बेचैन वाटतंय म्हणून. तिची आठवण आली म्हणून " निखिल  म्हणाला. कारण इतक्या दिवसांनी ऋतिकाचं नाव ऐकून तो थोडा विचारांत पडला होता. 

"तसं नाही रे निख्या, माझ्यासाठी ऋतिकापेक्षा चिऊ जास्त महत्त्वाची आहे म्हणून मी तिचा विचार सोडून दिला होता. पण आज अचानक माहित नाही का पण जसं ऋतिका भेटायच्या वेळेस झालं होतं नेमकं तसंच होतंय." अभय मनातली बेचैनी निखलला सांगत होता. 

"म्हणजे तुला काय म्हणायचं आहे कि, आज तुला ऋतिका भेटणार आहे" निखिल चमकून म्हणाला. 

"माहित नाही. पण काय सांगू नाही शकत. मन खूप अस्वस्थ आहे." अभय म्हणाला. 

"बरं जाऊ दे. तू जास्त विचार नको करुस. बघू काय होईल ते. आज शेवटच्या  ब्रँचची  व्हिजिट आहे आपली. ती आटपून झाली कि बघू काय ते." असं म्हणून निखिल आपल्या सीटवर रेलून बसला. कारण ती ब्रँच तशी खूप दूर होती त्यांच्या घरापासून. अभयपण नाईलाजाने मागे टेकून बसत विचार करायला लागला.  

कॉलेजच्या दिवसातला फ्लॅशबॅक लगेच त्याच्या डोळ्यांसमोरून सर्रकन गेला. त्या विचारातच त्याला झोप लागली. निखिलपण विचार करत होता, कि ह्याचं पण काय कळत नाही. कधी चिऊच माझं प्रेम आहे म्हणतो तर कधी ऋतिकाच्या मागे वेडा होतो. इतक्या दिवसांनी आज त्याला ऋतिका आठवणे म्हणजे नवलच आहे. नक्की काय ते समजत नाही ह्याचं. ऋतिका कि चिऊ. किंवा दोघीही. बघुयात...