Search This Blog

Thursday, April 29, 2021

अनोळखी हे प्रेम - Part 8            आज ऋतिकाचं मन थोडं अस्वस्थ होतं. म्हणून ती घरी लवकर जायचं ठरवते. तसंही तिचं आजचं काम झालेलं असतं. काही महत्त्वाच्या सूचना नर्सेसना देऊन ती आपल्या केबिन मध्ये परत येते. आवरा आवर करत असताना तिचं त्या फोटोकडे लक्ष जातं. तिला वाटलं कि आताही तिचा म्याऊ तिच्याकडे बघून हसतोय कि काय. पण तसं नव्हतं. मग सकाळीच तिला असं का वाटलं, तो आपल्याकडून बघून हसला. कि आपला तो भास होता. हो, भासच असेल कदाचित. कारण आजवर तर असं नाही झालं कधी. तिने तो फोटो हातात घेतला. हळुवार त्याच्यावरून हात फिरवला. आणि म्याऊचं ते हसरं रूप पाहू लागली. तसं तिच्या डोळ्यांतून हलकेच दोन थेंब ओघळले. आज काय माहित नाही, पण तिला म्याऊची खूप आठवण येऊ लागली. 
"कुठे आहेस तू म्याऊ? लवकर ये ना प्लिज, कधीपासून मी तुझी वाट पाहतेय. लहानपणी जसा तो गेलायस तसा अजून परत आलेला नाहीयेस. कुठे गेलायस न सांगता मला तू? मी नाही राहू शकत रे आणखी तुझ्याशिवाय. थकलेय रे तुझी वाट पाहून. येशील तू लवकरच याची खात्री आहे मला. मला नाही राहवत आहे आणखी. मला माझा म्याऊ लवकरात लवकर परत हवाय " असं म्हणून तिने तो फोटो आपल्या हृदयाशी घट्ट धरून ठेवला. 

               तेवढ्यात तिच्या केबिनच्या दाराजवळ टकटक झाली. तिने आपले डोळे पुसले आणि तो फोटो परत आपल्या टेबलावर ठेवला. 

"येस, प्लिज कम इन." असं म्हणून तिने दार ठोठावणाऱ्याला आत यायची परवानगी दिली. तशी एक नर्स आत  शिरली आणि घाईघाईने तिला म्हणाली,

"मॅडम, चला लवकर एक अर्जेंसी आलीय. रूम नंबर २०७ मधल्या पेशंटला अचानक श्वास घ्यायला त्रास होतोय."

"अरे, असं कसं मी आताच चेक करून आलेली त्यांना.  व्यवस्थित होते ते. बरं ठीके चल पटकन " असं म्हणून ऋतिकाने आपली पर्स तशीच परत ठेऊन आपला स्टेथोस्कोप उचलला आणि त्या नर्ससोबत निघाली. 

                 आज लवकर जायचं होतं मनात तिच्या. पण आज असं काहीतरी घडणार होतं, ज्यामुळे तिला अचानक थांबावं लागलं. कधी कधी बाप्पाच्या मनात असं काही असतं, कि त्याचा आपल्याला अंदाज येत नाही. कारण बाप्पाला आपल्याला सरप्राईज द्यायचं असतं. आपण एखाद्या गोष्टीची खूप दिवस वाट बघत असतो. खूप आतुरतेने. पण ते काही आपल्याला भेटत नाही. मग आपण ती वस्तू किंवा व्यक्ती भेटू दे, म्हणून बाप्पाजवळ प्रार्थना करत असतो. आणि मनोमन तेच मागत असतो. पण त्याची योग्य वेळ यायची असते. आणि त्याची वेळ आल्यावर ते आपल्या ध्यानीमनी नसताना अचानक आपल्यासमोर प्रकट होतं. असंच काहीसं आज ऋतिकासोबत घडणार असतं. तिचं घरी जाताजाता अचानक पेशंटची अर्जेंसी येणं आणि तिला थांबावं लागणं हे निव्वळ एक कारण असतं. 


               ब्रँच  ऑफिस मध्ये धावपळ उडालेलीहोती, कारण आज चक्क कंपनीचे मालक येणारहोते. त्यामुळे ऑफिसमधले सगळे जण त्यांच्या स्वागताकरिता उत्सुकहोते. त्यांच्यापैकी अजून कोणी  त्यांच्या नवीन मालकांना बघितलेलंनव्हतं. त्याची एक उत्सुकता होती सगळ्यांमध्ये, कि आपले बिगबॉस कसे असतील ते. त्यांच्या स्वागतासाठी एक छोटा कार्यक्रम पण आयोजित केलेला होता  तिथल्या एम्प्लॉयीसने. कारण शेवटी कंपनीचे मालक येतायत आणि ते हि पहिल्यांदा. म्हणून तिथल्या ब्रॅंचहेडनि हे हा सगळा खटाटोप केलेला असतो. 

               थोड्याच वेळात तिथे एक गाड्यांच्या ताफ्याचं आगमन होतं. एकापेक्षा एक अशा आलिशान गाड्या पाहून सगळेच दिपून जातात. त्यातल्या सगळ्यांत आलिशान गाडीमध्ये होते त्या कंपनीचे मालक अभय आणि त्याच्यासोबत निखिल. आणि त्यांच्या मागेपुढे असलेल्या गाड्यांमध्ये कंपनीचे इतर अधिकारी आणि सेक्युरिटी गार्ड्स. ऑफिसच्या कॅम्पस मध्ये गाड्या आल्यावर सगळेजण त्यांच्या स्वागतासाठी पुढे धावले. तिथले जे मुख्य अधिकारी होते, त्या सगळ्यांच्या हातात मोठाले जाडजूड हार होते. ते पाहून निखिल हळूच अभयच्या कानात म्हणाला,
"अभ्या, यार एवढे मोठे हार घातल्यावर तू त्याच्यामध्ये गुदमरूनच मरशील लेका." 

"निखिल, आपण ह्या कंपनीचे मालक आहोत हे विसरतो काय तू कधी कधी. जरा तसं वागना मूर्खां कधीतरी." असं निखिलला म्हणून तो त्यांचं स्वागत स्वीकारायला पुढे झाला.  त्याच्या पाठोपाठ निखिलदेखील. त्या लोंकांमधले सगळेजण त्यांना पहिल्यांदाच भेटत होते. अभय सगळ्यांची आस्थेने चौकशी करत होता आणि त्यांना काही प्रॉब्लेम्स असतील तर त्यावर काही सोल्युशन पण काढत होता. काही बदल त्याला करावे वाटत असतील तर सर्वानुमते त्या अमलात आणण्याच्या सूचना देखील देत होता. अभयचं आकर्षक व्यक्तिमत्व, त्याचा रुबाबदारपणा, त्याच्या बोलण्याच्या खास शैलीमुळे आणि त्याचं सगळ्यांशी आपुलकीने बोलणं पाहून तिथल्या लोकांच्या मनात त्याच्याबद्दल असलेली भीती जाऊन एक आदर निर्माण झाला होता.  तिथला लेडीज स्टाफ तर अक्षरशः अभयवर फिदा झाला होता. कधी एकदा त्याच्याशी ओळख होतेय याची वाट पाहत होत्या, पण अभय हा आहे त्या सगळ्यांचा गॉडफादर आहे, हे लक्षात येऊन हिरमुसत होत्या. निखिल आपला त्या सगळ्यांची मजा बघत होता. 

            तिथल्या लोकांनी आपुलकीने केलेल्या स्वागतसमारंभामुळे अभय खूप भारावून गेला होता. आपल्या मित्राचा स्वागत सोहळा पाहून निखिलला सुद्धा खूप आनंद झाला होता. स्वागतसमारंभाच्या कार्यक्रमानंतर एक छोटासा जेवणाचा कार्यक्रम होता. तिथल्या स्टाफच्या विनंतीमुळे अभय थांबायला तयार झाला होता. त्यानंतर तिथल्या मुख्य अधिकाऱ्यांसोबत एक मिटिंग घेऊन तो परतणार होता. 

            ह्या सगळ्यांमध्ये संध्याकाळ झाली. मिटिंग संपल्यावर सगळे अधिकारी मिटिंग रूम मधून बाहेर पडले. निखिल काही महत्त्वाचं बोलायचं म्हणून त्यांच्यासोबत बाहेर गेला. अभय एकटाच होता आतमध्ये. निखिल परत येईपर्यंत थांबणार होता तो तिथे. म्हणून तो बसल्या बसल्या ती मिटिंग रूम न्ह्याहाळू लागला. त्या रूमला खूप मोठ्या खिडक्या होत्या, पण त्यावर पडदे सोडले होते. अभयने ते पडदे बाजूला सारले आणि बाहेरचं दृश्य पाहू लागला. ऑफिसच्या बिल्डिंगसमोरच मध्ये एक मोठा रस्ता होता आणि त्यापलीकडे एक हॉस्पिटल होतं. आजूबाजूला काही छोटोमोठी ऑफिसेस असलेल्या बिल्डिंगा होत्या. रहदारी वाहत होती रस्त्यांवरून. गाड्या सिग्नलवर थांबून सुटत होत्या. एखादीच बाईक  सिग्नल तोडून मध्येच पळत होती. ते पाहून अभयला आपले कॉलेजमध्ये असताना तोडलेल्या सिग्नल्सची आठवण झाली. सगळे आपल्यापल्या घाईत होते. कोणाला दुसऱ्याकडे लक्ष द्यायला वेळ नव्हता. प्रत्येकजण आपल्या नाकासमोर चालत होता. एक बिझी संध्याकाळ होती.  त्या संध्याकाळचा स्वछ सूर्यप्रकाश सगळीकडे पसरलेला होता. अचानकच तिथला तो सूर्यप्रकाश जाऊन अंधार दाटू लागला. आकाशात काळ्या ढगांनी गर्दी केली. जोराचा वर सुटला आणि विजा चमकू लागल्या. त्यासोबतच ढगांचा जबरदस्त गडगडाट चालू झाला. आणि त्यासोबतच जोरदार पावसाला सुरुवात झाली.  अचानक झालेल्या वातावरणातील बदलामुळे सगळ्यांची धावपळ सुरु झाली. सगळे आडोसा शोधायला पळू लागले. 

               तेवढ्यात निखिल देखील आला. बाहेरचा कोसळणारा पाऊस पाहून अभयने त्याला पटकन घरी चालण्याची सूचना केली. तसे ते जायला निघाले. तिथल्या लोकांचा निरोप घेऊन अभय आणि निखिल आपल्या गाडीकडे जाऊ लागले. पण अचानक अभयच्या मनात परत तीच बेचैनी होऊ लागली. त्याचं हृदय परत एकदा जोरजोरात धडधडू लागलं. त्याचं मन चलबिचल होऊ लागलं. त्याला कळेचना हे सगळं काय होतंय. सकाळी होणारी हृदयाची धडधड थांबली होती. ती परत आता सुरु चालू होती. अभयचा हात छातीवर गेला तसं सगळे त्याला सावरायला धावले. पण अभयने सगळ्यांना ठीक आहे असं सांगून गाडीत बसला. निखिलला कळून चुकलं कि काहीतरी गडबड आहे ते. अभयची गाडी तिथून बाहेर पडली आणि मेन रोडला आली. पण तिथे सिग्नल असल्यामुळे त्यांना थांबावं लागलं. 

                     ऋतिकादेखील अचानक पाऊस आलाय म्हणून जायला निघाली. पण तिचं मन देखील एका अनामिक ओढीने धडधडू लागलं. तिला अशी धडधड आधी कधीच जाणवली नव्हती. काय होतंय हे तिचं तिलाच कळत नव्हतं. एक हुरहूर मनात दाटून आली होती. बाहेर अचानक  पडणाऱ्या मुसळधार पावसाप्रमाणेच तिच्या मनात देखील भावनांचा मुसळधार पाऊस चालू झाला होता. मनात विचारांचं काहूर माजलं होतं. तसा पाऊस तिच्या खूप आवडीचा. पाऊस आला कि एक क्षण पण थांबत नसे. कधी एकदा जाईन पावसात असं तिला व्हायचं. पण आज वेगळंच काहीतरी होतं. विचार करता करता ती बाहेर आली पण आपल्या स्कुटीकडे न जात ती सरळ पावसात निघाली. भिजायला. चिंब व्हायला. कशी आली ते तिचं तिलाच कळलं नाही. पण ती आली. आणि पावसाचं पाणी अंगावर पडताच ती मनातल्या साऱ्या गोष्टी विसरून अक्षरशः पावसात उड्या मारू लागली. तिला तसं पाहून तिथली लहान मुलं पण तिच्या जोडीला आली आणि ते सगळे मिळून तिथल्या पाण्यात खेळू लागले. ऋतका भान हरपून पावसात भिजत होती. पावसाची मजा घेत होती. आपण कोण आहोत ह्याचा तिला त्याक्षणी विसर पडला होता. ती फक्त त्या क्षणात जगत होती. पावसात मनसोक्त न्हाऊन निघत होती. तिला बाकी जगाची पर्वाच  नव्हती. 

                  अभय कारच्या खिडकीतून बाहेरचा धो धो कोसळणारा पाऊस बघत होता. त्याच्या मनातली ती अनामिक हुरहूर अजूनच वाढली होती. तो अजूनच अस्वस्थ होत होता. हृदय इतक्या जोरात धडधडत होतं कि, जणू काही ते छाती फाडून बाहेरच येईल. अचानक त्याचं लक्ष समोर गेलं. तिथल्या दृश्याकडे. तिथे एक मुलगी अगदी मनसोक्त पावसात भिजत होती. सोबतीला चार-पाच लहान मुलं होती. त्यांच्यासोबत ती तिथे साचलेल्या पाण्यात अक्षरशः उड्या मारत नाचत होती. तिच्या कपड्यावरून तरी ती सुशिक्षित वाटत होती. पण ती अशी वेड्यासारखी का भिजतेय पावसात हे अभयला कळलं नाही. तिचा चेहरा व्यवस्थित दिसत नव्हता. पावसाने ओलेचिंब झालेले केस तिच्या चेहऱ्यावर आले होते आणि ती तशीच पावसाचा आनंद घेत होती. हा नजारा त्याने याआधी पण पहिला होता. सेम. अगदी जशाच्या तसा आताही तसाच नजारा समोर होता. फक्त वेळ बदलेली होती. ठिकाण बदलेलं होतं. 

            आणि  तिला पाहून का माहित नाही, पण अभय गाडीतून खाली उतरला. संमोहित केल्यासारखा तिच्या दिशेने चालू लागला. तसाच पावसात भिजत. त्याच्या मागोमाग निखिल देखील उतरला आणि त्याला थांबवायला पूढे झाला. पण अभयने त्याला अडवले आणि तसाच तो तिच्याकडे चालू लागला. थांबला नाही. निखिल आणि बाकीचे सेक्युरिटी गार्ड्सदेखील त्याच्या मागे निघाले. तिच्यापासून थोड्या अंतरावर जाऊन अभय थांबला तशी एक जोरात वीज कडाडली. बहुतेक कुठेतरी पडली देखील असावी. आणि त्याचवेळी अभयचं लक्ष तिच्या चेहऱ्यावर गेलं आणि त्याच्या तोंडून आपसूकच निघालं,

"ऋतिका." 

                होय. तीच ऋतिका. जिला पाहून अभयचं पहिलेही हृदय धडधडलं होतं. तीच अनामिक हुरहूर त्याच्या मनात दाटली होती. तसेच मन बेचैन झालं होतं. तिच्यात काहीच बदल झाला नव्हता. तेच तिचे काळेभोर गहिरे डोळे. तीच ती काळजाचा ठाव घेणारी नजर. तसेच मोकळे सोडलेले आणि पावसात भिजलेले केस. कपाळावर बारीकशी टिकली. फिकट गुलाबी रंगाचा पंजाबी ड्रेस त्यावरील पांढरी शुभ्र ओढणी आणि पावसात चिंब भिजून आणखीनच मनमोहक झालेला तिचा देह. अभय हे सौंदर्य भान हरपून पाहत होता. 

          आता त्याला त्याच्या हृदयाच्या जोरजोरात धडधडण्याचं कारण त्याला कळलं होतं. त्याच्या अस्वस्थ मनाचं गुपित त्याला उलगडलं. आणि त्याच्या मनातली अनामिक हुरहूर तिला पाहून शांत झाली. त्याची होत असलेली बेचैनी थंडावली. त्याचं मन शांत झालं. आणि त्याच्या चेहऱ्यावर हलकेच  एक हसू उमटलं  आणि त्याने परत एकदा तिला आवाज दिला. 

"ऋतिका." 

             त्याचा अस्पष्ट आवाज ऐकून ऋतिकाने त्याच्या कडे बघितले आणि ती बघतच राहिली. तिला ज्याच्याबद्दल जी अनामिक ओढ वाटत होती. ज्याला पाहून ती त्याच्याकडे खेचली गेली होती तो प्रत्यक्षात तिच्यापुढे उभा होता. तिलादेखील तिच्या हृदयाच्या अचानक धडधडण्याचं कारण समजलं होतं. ती स्तब्ध होऊन अभयकडे पाहत होती.   

         पाऊस तसाच धो धो कोसळत होता. त्या पावसात ते दोघे एकमेकांसमोर काही अंतरावर उभे होते. त्यांना काय प्रतिक्रिया द्यावी हेच कळत नव्हतं. दोघेही भान हरपून फक्त एकमेकांना पाहत होते. कोणीच काही बोलत नव्हते. त्यांच्यामध्ये एक मूक संवाद चालू होता. नजरेनेच त्यांच्या संभाषण होत होते. त्यांच्यामध्ये फक्त थोडंसं अंतर होतं. ते अंतर आता मिटणार होतं. इतक्या दिवसांची त्यांची प्रतीक्षा आज संपली होती. त्यांच्यामध्ये असणाऱ्या अनेक प्रश्नांची उत्तरे आज मिळणार होती. 

         निखिल मागेच थांबला होता आणि त्याने गार्ड्सना पण थांबवले होते. आणि तो पुढे काय होतंय ते पाहू लागला. कारण त्याच्या मित्राचं प्रेम परत एकदा समोर आलं होतं. 

           अभय तिच्यात पुन्हा एकदा हरवून गेला होता. ढगांच्या गडगडाटाने तो भानावर आला. तिच्याशी बोलायला म्हणून त्याने तिच्या दिशेने पाऊल टाकले. पण इतक्यात असे काही घडले कि, ज्याची कुणाला अपेक्षाच नव्हती. अचानक गाडीच्या जोरात हॉर्न आणि ब्रेक्स एकदमच मारल्याचा आवाज आला. मुसळधार पाऊस चालू असल्याने पहिल्यांदा कोणाला काहीच कळले नाही, कि नक्की काय झालंय ते. पण जेव्हा कळलं तेव्हा मात्र सगळ्यांची एकच धावपळ उडाली. ऋतिका अभयला शोधत होती. अभय आत्ताच तिच्यासमोर उभा होता. तिच्याकडे पाहत. आणि अचानक कुठे गेला. कोणीतरी त्या गाडीच्या धक्क्याने वरती उडून खाली जोरात आदळलं होतं.  तिची नजर त्या खाली पडलेल्या व्यक्तीकडे गेली आणि ती जागीच थिजली. तो अभयच होता. अभयचा ऍक्सीडेन्ट झाला होता. त्या मुसळधार पावसात त्या गाडीने समोरचे काहीच न दिसल्यामुळे अभयला उडवले होते. ते पाहून ती जोरात ओरडली,

"अभय"
आणि मटकन खाली बसली. तिला काहीच सुचेना.  ती अभयच्या जवळ बसली आणि त्याचं  डोकं आपल्या मांडीवर ठेवून जोरजोरात रडायला लागली. एवढ्यात तिथे गर्दी देखील जमा झाली होती. आणि पावसाचा जोर कमी झाला होता. 
"हेल्प,हेल्प. कुणीतरी मदत करा प्लिज. प्लिज माझी मदत करा." म्हणून मोठमोठ्याने ओरडत होती. पण कोणी तिची मदत करायला पुढे येत नव्हतं. तिचा आवाज ऐकून निखिल जोरात धावत तिथे आला. त्याच्यामागे त्याचे गार्ड्स पण धावत आले. निखिलने अभयला बघितले आणि त्याचे अवसानच गळाले. आपल्या मित्राला असं ऋतिकाच्या मांडीवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं पाहून त्याची मतीच गुंग झाली. 

"अभय, अभय. यार डोळे उघड अभय. काय झालं तुला, उठ, उठ ना यार अभय." असं म्हणून तो अभयला हाक मारू लागला. रडू लागला. 

त्याला तसं बोलताना पाहून ऋतिकाला समजलं कि, तो अभयला ओळखत असावा. म्हणून ती उसनं अवसान आणून निखिलला म्हणाली,"प्लिज माझी  हेल्प करा, ह्यांना लवकरात लवकर हॉस्पिटलला घेऊन गेलं पाहिजे. प्लिज. तुमच्या पाय पडते मी, ह्यांना उचलून घेऊन चला. इकडे मागेच माझं हॉस्पिटल आहे. प्लिज ह्यांना घेऊन चला ना लवकर." म्हणून रडू लागली. 

"हो हो, येतो मी चला. माझा जिगऱ्या आहे तो. चला लवकर. कुठे आहे तुमचं हॉस्पिटल दाखवा मला." असं म्हणून निखिलने आपले डोळे पुसत अभयला दोन्ही हातांवर उचलले. बाकीचे गार्डस पण पुढे आले निखिलच्या मदतीला. आणि ते अभयला घेऊन जाऊ लागले. ऋतिका उठून उभी राहिली आणि त्यांना घेऊन हॉस्पिटलच्या दिशेने धावत सुटली. त्या गार्ड्सपैकी दोघांनी त्या गाडीवाल्याला पकडले होते आणि ते त्याला निखिलकडे सोपवणार होते. 

           तिथे मागेच होते ते हॉस्पिटल. ऋतिकाच्या हॉस्पिटलच्याच गेट समोर तो प्रकार झाला होता. म्हणून नशीब होतं.  ऋतिकाने पटकन तिथल्या वॊर्डबॉयलाआवाज दिला. ऋतिकाचा आवाज ऐकून आतले दोन वॊर्डबॉईज धावत आले आणि त्यांनी पटकन जाऊन स्ट्रेचर आणले. त्यावर अभयला झोपवले आणि आत ऍडमिट करायला घेऊन गेले. ऋतिकाने एमेरजन्सी मध्ये लगेच अभयला ऑपरेशन थिएटर मध्ये नेले. ती देखील तशीच भिजलेल्या अवस्थेमध्ये आतमध्ये घुसली आणि तिने ऑपेरेशनच्या तयारीला लागली. तोपर्यंत बाकीचे डॉक्टर्स आणि नर्सदेखील तिच्या मदतीला धावत आले होते. ह्या वेळांत निखिल समजून गेला होता कि, ऋतिका तिथलीच एक डॉक्टर आहे ते. म्हणून तो तिथेच मनोमन देवाचे आणि तिचे आभार मानत बाहेर उभं राहून वाट पाहू लागला ऋतिका बाहेर येण्याची. तेव्हा तिथे त्या गार्ड्सपैकी एक जण आला आणि त्याने त्या गाडीवाल्याला पकडले असल्याची माहिती दिली. हे ऐकून निखिलचे डोकेच सटकले. तो तसाच रागाने त्या गाडीवाल्याला मारायला त्याच्याकडे धावला. कारण त्याच्यामुळेच निखिलच्या जिवलग मित्राची हि अवस्था झाली होती. त्याने त्या गाडीवाल्याला बेदम चोपला. त्याने तसं का केलं म्हणून विचारत होता. पण तो देखील निगरगट्ट असल्यासारखा उर्मटपणे बोलत होता आणि उद्दामपणे  त्याची काही चुकी नाही ते  सांगत होता. ते पाहून निखिल आणखीनच बिथरला आणि तो नुसता त्याला मारत सुटला. आपण हॉस्पिटलमध्ये आहोत याचे देखील त्याला भान नव्हते. जोरदार पावसामुळे आपली गाडी स्लिप झाली आणि आपला गाडीवरील कंट्रोल सुटला हेच तो  सांगत होता. पण निखिलला त्याच्यावर विश्वास बसत  नव्हता. शेवटी तो त्याला मारून मारून दमला आणि त्या गार्ड्सना पोलिसांना फोन करून त्याला पोलिसांच्या ताब्यात द्यायला सांगून परत ऑपरेशन थिएटरजवळ आला. अजून देखील तिथे असलेला वरचा लाल दिवा पेटलेलाच होता. म्हणून निखिल तिथेच बाकड्यावर बसला. 

                 काही तासांनी तो दिवा विझला. तसा निखिल देवाला हात जोडत उभा राहिला आणि ऋतिका आणि बाकीचे डॉक्टर्स बाहेर येण्याची वाट बघू लागला. बाकीचे डॉक्टर्स बाहेर आले, पण ऋतिका मात्र बाहेर नव्हती आली. म्हणून निखिल विचारात पडला आणि त्याने बाहेर येणाऱ्या एका नर्सला तिच्याबद्दल विचारले. तेव्हा तिने ऋतिका आतमध्येच पेशंट जवळ असल्याचे सांगितले. तेव्हा निखिल त्या नर्सची परवानगी घेऊन आत मध्ये आला. ऋतिका अभयच्या डोक्याजवळ बसली होती. ती अजूनही तशीच भिजलेल्या अवस्थेमध्ये होती. फक्त वरतून ऑपेरेशन चा युनिफॉर्म घातला होता तिने. अभयचा हात हातात घेऊन ती  त्याच्याकडे टक  लावून पाहत  होती. तिची पापणी अजिबात लवत नव्हती, पण डोळ्यांतून येणारं पाणी मात्र थांबत नव्हतं. तिला अभयबद्दल असणाऱ्या अनामिक ओढीने तिथेच जखडून ठेवले होते.  निखिलने एकवार अभयकडे पहिले. त्याच्या अंगाला विविध ठिकाणी कसलेतरी स्टिकर आणि वायरींचं जंजाळ होतं. डोक्याला मार  लागलेला असल्यामुळे संपूर्ण डोक्याला पट्टी बांधली होती. हाताला सलाईन लावलेली होती. एक रिकामी रक्ताची पिशवी सुद्धा अडकवलेली होती. डोक्याला मार लागल्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता. म्हणूच अभयला रक्त चढवण्यात आलं होतं. बाजूला असलेल्या मशिनमधून टिकटिक चालू होती आणि एका मशीनमध्ये एक रेष वर खाली होत पुढे जात होती. 

             निखिलला हे सगळं पाहावलं नाही. नेहमी त्याच्यासोबत असणारा, त्याच्यासोबत मस्ती करणारा त्याचा जिवलग मित्र आज अश्या अवस्थेमध्ये पाहून त्याला खूप दुःख होत होते. आताच थोड्यावेळापूर्वी आपल्यासोबत बोलत असणारा अभय आता अशा स्थितीमध्ये बघायला भेटेल याची त्याने कधीच कल्पना केली नव्हती. सोबतच ऋतिका देखील अशा अवस्थेमध्ये बसून होती. त्याने स्वतःला सावरत तिच्याशी बोलायचं ठरवलं. 

"ऋतिका." हळुवार आवाजात त्याने ऋतिकाला हाक मारली, कारण त्याच्या आवाजाने अभयला जाग आली तर त्यालाच त्रास होईल म्हणून. पण तिचं लक्षच नव्हतं. म्हणून त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला थोडंसं हलवून परत आवाज दिला 

"ऋतिका"

तसं दचकून तिने त्याच्याकडे बघितलं. आणि डोळ्यातलं पाणी पुसत म्हणाली, 

"हा बोला, कोण आपण." काहीतरी बोलायचं म्हणून ती बोलली. 

"मी निखिल, अभयचा मित्र. मघाशी आपण नाही का अभयला हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो." निखिल आपली ओळख सांगू लागला. कारण त्याला माहित होतं कि, ऋतिका त्याला लगेच ओळखणार नाही ते. 

"ओ हा, थँक्स तुम्ही माझी मदत केलीत त्याबद्दल." ऋतिका म्हणाली. 

"अहो थँक्स कसलं बोलताय. माझा मित्र आहे तो. आम्ही दोघे एकत्रच होतो मघाशी. आणि अचानक असं झालं. उलट मीच तुम्हाला थँक्स म्हटलं पाहिजे कि तुम्ही अनोळखी असून पण आमची एवढी मदत केलीत ते. खरच तुमचे खूप खूप धन्यवाद." निखिल हळुवार आवाजात म्हणाला. 

"माझे कसले आभार मानताय, उलट माझ्यामुळेच झालं हे सगळं. आणि मी ओळखते अभयला. त्यामुळे मी अनोळखी नाहीय. जर त्यावेळी मी तिथे नसते तर अभयदेखील तिथे नसता आला आणि त्याचा असा ऍक्सीडेन्ट नसता झाला . मीच जबाबदार आहे त्याच्या अशा परिस्थितीला." असं म्हणून ऋतिका परत रडू लागली. 

"प्लिज शांत व्हा, तुम्ही असं स्वतःला जबाबदार नका समजू. शांत व्हा. नाहीतर अभयला जाग येईल आणि त्याला तुम्हाला असं रडताना बघून त्रास होईल." निखिल तिला समजावत म्हणाला. 

"नाही होणार त्याला त्रास. त्याला ऐकू जाईल तर त्रास होईल ना त्याला." ऋतिका अभयकडे पाहत म्हणाली. 

"म्हणजे? काही समजलं नाही मला."

"म्हणजे तो कोमात गेलाय. आणि कधी शुद्धीवर येईल हे सांगू शकत नाही." ऋतिका थंड स्वरात म्हणाली. 

"काय?" निखिल जवळ जवळ ओरडलाच."काय म्हणताय तुम्ही ऋतिका, हे कसं शक्य आहे. अभय असा कसा कोमात जाऊ शकतो. तुम्ही तर डॉक्टर आहात ना. मग असा कसा गेला तो कोमात हा." निखिल बिथरून गेला होता. कारण अभय कोमात गेलाय हे त्याला खरंच वाटत  नव्हतं. पण हे खरं होतं. कारण मघाशी झालेल्या ऍक्सीडेन्टमध्ये अभयच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती आणि भरपूर रक्तस्राव झाल्यामुळे तो कोमात गेला होता. म्हणूनच ऋतिका इतक्या दुःखात होती आणि त्याच्याजवळून उठली नव्हती. तिलादेखील हे पचवणं जड जात होतं. पण नाईलाज होता. ती देखील स्वतः एक डॉक्टर होती. असं असूनदेखील ती काहीच करू न शकल्यामुळे स्वतःला दोष देत होती. पण हेच वास्तव होतं. आणि ते त्यांना स्वीकारावं लागणार होतं. 

           नशिबापुढे  निखिल आणि ऋतिका दोघेही हतबल होते. निखिलचा जिवलग मित्र कोमात होता आणि ऋतिकाचा ज्याच्याशी काहीच संबंध नव्हता पण एक अनोळखी बंध त्यांच्यात असल्यामुळे तो तिला तितकाच जवळचाच होता. दोघेही समदुःखात होते. निखिलने स्वतःला कसेबसे सावरले. आणि तिथून कसातरी बाहेर आला. ऋतिका अजून तिथेच थांबली होती.  त्याला त्याच्या मित्राच्या आठवणीने आणि काळजीने खूप रडू येत होते. बाहेर येऊन तो लहान मुलासारखा भिंतीला टेकून रडत होता. कसबसं शांत होत तो आता पुढे काय करायचं याचा विचार करू लागला. आता आजीला हे सांगावं कि नको हे त्याला कळत नव्हतं. कारण त्यांना जर समजलं कि तिचा एकुलता एक आधार असा कोमात गेलाय तर त्यांचं काही बरंवाईट होण्याची शक्यता होती. पण बॉबी अंकलना तर सांगावेच लागणार होतं, पण त्यांनी आजीला ह्यातलं काही कळणार नाही ह्या अटीवर सगळं सांगितलं होतं. तिथे असलेल्या गार्ड्सना सांगून  त्यांना २४ तास हॉस्पिटलमध्ये थांबायची सूचना देऊन आणखी काही गार्ड्स बोलावून घेऊन कोणालाही न कळता पहारा देण्याचं सांगतो. कारण फक्त निखिलला आणि त्यांच्या काही ठराविक गार्ड्सनाच ह्याबद्दल माहिती असतं. आणि निखिलला हे बाहेर कोणालाही कळू द्यायचं नव्हतं. 

               त्यांच्या ब्रँच ऑफिस समोरच हे सगळं झालं होतं. पण तिथे कोणी काही कळवलं नव्हतं. निखिलनेच तसं कुणालाही न कळवण्याबद्दल सांगितलं होतं. नाहीतर उगाच बाहेर हि बातमी लीक होऊन लोकं तिथे गर्दी करतील. आणि बाहेर काही ना काही अफवा उठतील. कारण अभय कोणी साधा माणूस राहिला नव्हता. तो आता एक मोठा बिजनेसमॅन झाला होता. एका मोठ्या इंटरनॅशनल लेव्हलच्या कंपनीचा मालक होता आणि त्याच्याबद्दल असलं काही अभयला पसरू द्यायचं नव्हतं म्हणून त्याने खूप गुप्तता बाळगली होती. एवढी कि त्याने हॉस्पिटलमध्ये देखील कोणालाही कळू दिलं नव्हतं कि अभय कोण आहे ते. अगदी ऋतिकाला सुद्धा. म्हणून त्याने हॉस्पिटलच्या डीनशी बोलून घेऊन सर्व प्रकारची गुप्तता पाळून अभयची एका स्पेशल प्रायव्हेट रुम मध्ये ट्रीटमेंट चालू केली होती. 

               ऋतिका नेहमी अभयजवळच बसून असायची.  हॉस्पिटलमधील बाकी कामाच्या मध्ये देखील ती  अभयला एकदा बघून जायचीच. त्याला बघून तिला कसनुसं व्हायचं. पण तिच्या हातात काहीच नव्हतं.  निखिलने थोडे दिवस आपलं ऑफिसचं काम तिथूनच करायचं ठरवलं होतं. म्हणून त्याने जवळच असणाऱ्या एका हॉटेलमध्ये  एक रूम घेतली होती. पण त्याचा जास्तीत जास्त वेळ अभयजवळ असण्यातच जायचा. कारण अभयला कधी शुद्धी येईल सांगता येत नव्हतं.  हॉटेलमध्ये  फक्त तो फ्रेश होण्यासाठी आणि जेवणासाठीच जायचा.  समोर असणाऱ्या ब्रँच ऑफिसमध्ये सांगून तो थोडे दिवस तिथून काम पाहणार असल्याचं त्याने आधीच सांगून ठेवलेलं होतं. अभयच्या अनुपस्थित आता निखिलच्या खांद्यावर सगळी जबादारी होती. बॉबी अंकलशी कॉन्टॅक्ट मध्ये राहून तो ती जबाबदारी सांभाळत होता.  

                   हळूहळू करत पंधरा ते दिवस उलटून गेले होते. अभयच्या प्रकृतीमध्ये काहीच सुधार नव्हता. त्याच्या बाकीच्या जखमा फक्त हळूहळू भरून येऊ लागल्या होत्या. पण तो शुद्धीवर येण्याची काहीच चिन्हं दिसत नव्हती. आता फक्त बाप्पाच काहीतरी करू शकत होते. डॉक्टरांनीदेखील त्यांच्यावरच सगळं सोडून दिलं होतं. ऋतिकाने हार नव्हती मानली. तिला विश्वास होता कि, अभय लवकरच शुद्धीवर येईल. पण आता महिना होत आला तरी काहीच बदल नव्हता. ऋतिकाचं अभयची काळजी करणं, वारंवार त्याची चौकशी करणं, त्याच्या ट्रीटमेंटवर व्यवस्थित लक्ष ठेवणं, त्याच्या औषधं देण्याच्या वेळा पाहणं हे सगळं ती रोज न चुकता मनापासून करत होती. तिच्या मनात खूप सारी प्रश्न होती, तक्रारी होत्या. त्याची उत्तरे फक्त अभयच देऊ शकत होता, पण तोच आता शुद्धीवर नव्हता. ती फक्त तो लवकरात लवकर शुद्धीवर यावा म्हणून वाट पाहत होती आणि रोज गणपती बाप्पा जवळ प्रार्थना करत होती. 

              निखिल हे सगळं पाहत होता. त्याला तिच्याबद्दल सहानुभूती वाटत होती. तिचं अभयबद्दल इतकी काळजी करणं त्याला कुठंतरी बरं वाटत होतं. तिथे राहून ऋतिका आणि निखिलची चांगली मैत्री झाली होती. त्याला मनात कुठंतरी असंच वाटत होतं कि, हीच चिऊ असेल कदाचित. कारण इतकं उगाच कोणी अनोळखी व्यक्तीसाठी करणार नाही. पण हे कळणार कसं?  ह्याचा शोध घेतला पाहिजे आपण. इथे आहे तोपर्यंत हे शक्य होईल. नंतर परत हे जमेल ना जमेल माहित नाही. म्हणून तो योग्य वेळ पाहून तिच्याशी बोलायचं ठरवतो ह्याबद्दल.  आता फक्त तो तिच्याशी बोलायला योग्य वेळ येण्याची वाट पाहत होता. त्यासाठी तो तिच्याशी जमेल तितकी मैत्री वाढवत होता. तेव्हाच तर त्याला समजणार होतं कि, नक्की ऋतिका कोण आहे ते......