Search This Blog

Sunday, April 5, 2020

अनोळखी हे प्रेम... part 1

(टीप: हि कथा पूर्णपणे काल्पनिक असून कुठून ढापलेली किंवा कॉपी पेस्ट केलेली नाहीय. So read and enjoy the story.)

         प्रेम... म्हणजे?

सुरुवात तर अशी आहे. पण नेमकं प्रेम म्हणजे काय? खरंतर प्रेमाची व्याख्या ही काही एवढी अवघड नाहीय, पण त्याचं कसं आहे ना प्रेम हे त्यालाच कळतं जो कोणाच्या तरी प्रेमात पडतो. आणि मग स्वतःला विसरतो. मग ते आपल्या आवडत्या व्यक्तीच्या असो, स्वतःच्या असो किंवा इतर कोणाच्या असो. पण प्रेमाचं हे असं आहे. प्रेम हे कधी ओळखीच्या व्यक्तीवर होतं, कधी कधी अनोळख्या व्यक्ती वर होतं, तर कधी ओळखीच्या व्यक्तीवर होऊन सुद्धा ते अनोळखी राहतं कदाचित... आपणच त्याला ओळखायला विसरतो. जर ओळखायला आलं आपल्याला आपलं प्रेम तर क्या बात हैं..।

हे असंच काहीतरी आहे अभय च्या बाबतीत... Let's start the journey... अनोळखी हे प्रेम...



"अरे ये अभ्या, चल ना लवकर. साल्या बाईक चालवतोय का सायकल?" बाईक या बैलगाडीच्या स्पीड ला बघून निखीलची सटकली. आधीच उशीर झालाय कॉलेजला आणि त्यात हा अशी बाईक चालवतोय. त्याच्यामुळे मागून येणारी एक स्कुटी वाली त्यांना कट मारून पुढे गेली. तसा निखिल जोरात ओरडला,
" अभ्या, लेका ती एवढूशी पोरगी पण तुझ्यापेक्षा फास्ट चालवते रे स्कुटी."
तसा अभय म्हणाला
" अरे हो रे, पण तुला काय घाई रे एवढी कॉलेज ला जायची. फुकणीच्या कधी लेक्चर ला तरी बसलाय का कधी. फुकटात पोरी बघायला भेटतील म्हणून येत असतो" अभय आपलं बाईक चालवण्यावर लक्ष देत म्हणाला.
" हो, मग तुमच्या सारखं हुशार नाय ना रे मी, आणि लेक्चर ला बसलं की कोण ना कोण बाहेर काढत असतं मला सारखं म्हणून मीच नाय बसत लेक्चर ला." निखिल आपली केसं नीट उभी करत बोलला "जिकडे आपल्याला इज्जत नाय, तिकडे आपण कधी जात नाय." 

" हो ना, बाप सावकार आहे ना साल्या तुझा म्हणून असली नाटकं अंगात तुझ्या." अभय ने आपली टेर खेचली त्याची.

"हो मग आहेच आपला बाप सावकार. आणि तसं पण आपण काय शिकून तुझ्यासारखी नोकरी वगैरे करणार नाही, आपल्याच्याने नाय व्हायचं बाबा ते, आपण तर भाई बिझनेस करणार. " निखिल आपल्यातच मस्त होता.

"हा बे, थोडं दमाने घे. समोर बघ साल्या सासरा उभा आहे तुझा, आणि त्यात मी हेल्मेट नाही आणलाय." अभय ने बाईक स्लो करत म्हटलं. इकडे आजूबाजूच्या हिरवळीवरून लक्ष काढून निखिल ने अभयच्या बोलण्याकडे लक्ष दिलं, तर समोर सिग्नल ला त्याला दोन ट्रॅफिक पोलीस दिसले. तेव्हा त्याला कळलं की, अशा वेळी अभय कडून काही होणार नाही. आपल्यालाच काहीतरी केलं पाहिजे, नाहीतर फुकट शंभर दोनशे ला चुना लागेल.

"एक काम कर अभ्या, तू उतर खाली. मला चालवू दे बाईक" निखिल चं ते बोलणं ऐकून अभय ला समजलं की, आता तो काहीतरी भन्नाट करणारे. गुपचूप बाईक साईड ला घेऊन त्याने निखिल ला बाईक चालवायला दिली.

" अब देख तेरा भाई क्या करता हैं." असं बोलून निखिल ने 1st गियर टाकला आणि जोरात रेस करत क्लच सोडला. तशी बाईक जोरात हिसका घेऊन पुढे गेली. अभय आपला मागे धरून आता निखिल काय करतोय ते मुकाट्याने बघत बसला. सिग्नल ला उभे असलेले हवालदार त्यांच्या कडेच बघत होते आणि आता हे लोक आपल्या तावडीत येतील म्हणून वाट बघत होते. पण कसलं काय. निखिल ने सिग्नल सुटला तसा बाजूने येणाऱ्या ट्रकच्या आडोशाने बाईक घेतली आणि तशीच पुढे नेली थोडी आणि पट्कन उजव्या बाजूला असणाऱ्या छोट्या गल्लीतून तशीच पुढे नेली. तिकडे ट्रॅफिक वाले येणारी आपली शिकार कुठे गायब झाली ते बघत होते. पण त्यांना कळेपर्यंत ही दोघे एव्हाना त्यांना हूल देत कॉलेज जवळ पोचली होती.

"हुश्श... निख्या साल्या. मरवशील एखाद दिवस. नीट चालवत जा रे बाईक जरा" अभय सुस्कारा टाकत बाईकवरून उतरला. आपण सुखरूप पोचलो हेच त्याच्यासाठी खूप होतं. करण निखिल बाईक चालवताना त्याची हवा टाईट होत असे. तशी तो सहसा निखिलला देत नाही बाईक चालवायला, पण काय करणार आज खिशात होते त्या पन्नासचं पेट्रोल टाकलं त्याने आणि जर हवालदाराने पकडलं असतं तर सेविंग ला ठेवलेले शंभर द्यावे लागले असते. आणि सोबत निखिल असल्यावर आपल्यावर अशी वेळ नाही येणार कधी, हे त्याला माहित होतं. कारण एक तर तो सॉलिड बाईक चालवतो, त्यामुळे त्याला कोणी पकडू शकत नाही आणि कधी पकडलाच त्याला कधी तर अशी काही इमोशनल स्टोरी सांगत असे की समोरचा हवालदार त्याला स्वतःकडचे पैसे देत असे मदत म्हणून.

" मी असल्यावर घाबरत जाऊ नकोस रे अभ्या, मै हू ना" निखिल अभयची अवस्था बघून म्हणाला. त्याने बाईक स्टँडला लावली आणि अभयकडे आला.

" हो ना, त्याचीच तर भीती आहे बाबा." अभय ने चावी घेतली बाईकची त्याच्याकडून, आणि ते कॉलेजकडे जाऊ लागले.

" अभ्या, थांब की लेका. कुठं चाललाय. बसू इथेच कुठंतरी." निखिल आपला मोर्चा जवळ असलेल्या गार्डन कडे वळवत म्हणाला.

" अरे नको निख्या, मला जाऊ दे लेक्चर ला, आज मॅडम काही नोट्स देणारेत. ते बघू दे जरा." त्याला परत खेचत अभय निघाला.

" हा जाऊ, पण साल्या अभ्या तुला कधीपासून गरज पडली रे मॅडम च्या नोट्स ची.  च्यायला मला तर फुल्ल डाऊट आहे त्या मॅडमच्या अन् तुझ्यात. साला सारखी अभय अभय करत असते." निखिल त्याच्या कडे बघत म्हणाला. ते ही बरोबरच होतं म्हणा. कारण अभय जन्मजातच खूप हुशार होता. त्याला असं नोट्स वगैरेच्या बाता करताना ऐकून निखिलला त्याच्यावर संशय येणं स्वाभाविकच होतं. त्याला तर आपल्या मित्राच्या हुषारीचा अपमान झाल्यासारखं वाटलं.

" नाही रे तसं, काहि महत्वाचं आहे एक्सामबद्दल, मला काय गरज पडलीय त्या म्हातारीसोबत लफडं करायची. चल आता लवकर" अभय तसाच पुढे चालत म्हणाला. निखिलही तसाच त्याच्या मागे.

गेटजवळ पोचल्यावर बघतो तर गेट बंद आणि त्यात तो वॉचमन असा काही ह्या दोघांकडे बघत होता जसं काही ते त्याच्या मुलीचा हातच मागायला त्याच्याकडे आलेत. त्याने तुच्छतेने हाकलून देण्याअगोदर अभय निखिलला म्हणाला, " चल बाबा, तू म्हणत होतास तिकडे, हे येडं काय आपल्याला आत सोडणार नाही, आपण थांबून काही उपयोग नाही. थोडावेळ बसूयात बाहेर चल."

"च्यायला ह्या वाचमनच्या, ह्याला एक दिवस ठोकतोच बघ, आता देतोय तो हाकलून आपल्याला, पण नंतर परत सलाम ठोकेल बघ तो." असं म्हणून त्याने दोन चार शिव्या हासडल्या त्या वाचमनच्या नावाने.आणि येऊन बसले ते दोघे परत गार्डन जवळ.

गार्डन पण बंद होतं. म्हणून बाहेरच बसले ते बाकड्यावर एका. 

" दोन कडक कटिंग दया काका पट्कन, तेवढाच मूड चांगला होईल" चहावाल्याला दोन चहा सांगून निखिलने आपली सिगारेट पेटवली आणि आपल्या सायलेन्सर मधून धूर काढत तो अभय कडे वळला.

अभय... एक हुशार, शांत, मॅच्युअर, हसरा, दिसायला हँडसम वगैरे काही नसला तरी, कोणी पहिल्या नजरेतच त्याच्याकडे आकर्षित व्हावं असा होता. बोलणं आटोपशीर, जशास तसं. आपल्या बोलण्याने तो एखाद्याला निरुत्तर वगैरे करू शकत होता, असं लॉजिकल बोलणं. अंगकाठीने काही पहिलवान वगैरे काही नव्हता, पण अंगावर कोणी आल्यावर त्याचं तगडे मोडून देऊ शकत होता. कमी आणि सडेतोड बोलणं आणि सोबत तीक्ष्ण नजर रोखून धरणं त्यामुळे जास्त कोणी त्याच्यासमोर लढत नव्हतं. हे थोडक्यात अभयबद्दल. 

आणि आपला निखिल, एकदम विरुद्ध. शांतपणा वगैरे तर त्याच्या आसपास नव्हता कुठे. बोलताना काही नाही, डायरेक्ट भिडण्याचा प्रकार. मारामारी करायला तर केव्हाही तयार. समोरचा फक्त काही उलट बोलायची वेळ फक्त, की हा पडलाच तुटून त्याच्यावर. पर्सनॅलिटी तर एकदम झक्कास. एकदम हिरोच. तीन चार जणं जरी एकत्र आले तरी त्यांना पुरून उरेल एवढा जोर अंगात, पण डोक्याने तेवढाच कमजोर. अक्कल तर एकदम चायना माल सारखीच. चली तो चाँदतक, नहीं तो शामतक. पण कसाही असला तरी जीवाला जीव देणारा. माणुसकी ठासून भरलेली अगदी, त्याच्या इतर गुणांविरुद्ध. 

असे हे दोघे होते. कधी आपली ओळख झाली, हे दोघांनाही सांगता येणार नाही. हो पण एव्हढी घट्ट मैत्री दोघांची, की जर तिसऱ्या कोणी त्यांच्यात फूट पडायचा प्रयत्न केला तर त्याच्या टांगड्याच गळ्यात डायरेक्ट. एमेकांवर खूप जीव दोघांचा. विश्वासही खूप. जय विरु. अभय खूप जीव लावायचा निखिलला. त्याला कोणी नव्हतं निखीलशिवाय. निखीलपण अभय वर जीव ओवाळून टाकायचा, अभयला साधं खरचटलं तरी तो ज्याच्यामुळे खरचटलं त्याचा बंदोबस्त करायचा पूर्ण. अशी त्यांची मैत्री, यारी, दोस्ती एकदम झक्कास होती.

चहा पिताना अभय म्हणाला,
" यार निखिल, आपली 12th तर झाली इकडे, आता ग्रॅज्युएशन पण होईल या वर्षी. मग पुढे काय करायचं रे."

" काय करायचं म्हणजे, आपलं तर ठरलंय अभ्या, मस्त बिजनेस वगैरे चालू करेल. एखादं हॉटेल वगैरे टाकेल मस्त. तुझ्या सारखं नोकरी बिकरी नाय करणार" निखिल सिगारेटचा धूर हवेत सोडत म्हणाला.

" कोण म्हणालं की मी नोकरी वगैरे करणार आहे. मित्रा हे नोकरी प्रकरण आपल्या रक्तात नाहीय." अभय त्याला धुडकावत म्हणाला.

" मग लेका,  काय करायचं म्हणतोस?" न कळून निखिलने विचारलं.

"सांगेन, तुझ्यासाठी एक सुरप्राइझ आहे खास. आपलं ग्रॅज्युएशन झालं की चल माझ्यासोबत फक्त." अभय एक डोळा मिचकावत म्हणाला.

" कुठं रे? कुठं काय खजाना वगैरे शोधायचा प्लॅन करतोय का?" 

"नाही रे निख्या, लेका तू फक्त चल माझ्यासोबत. घरी सांगून ठेव फक्त की, माझ्यासोबत येतोय म्हणून. म्हणजे तुला कोण जास्त विचारणार नाहीत.

" बरं." असं म्हणत त्याने हातातलं सिगरेटचं थोटुक विझवलं आणि चहाचे पैसे द्यायला गेला.

बराच वेळ झालेला कॉलेजकडे येऊन. पण अभय अन् निखिल अजून लेक्चर ला नव्हते गेले. चहा पिऊन झाल्यावर दोघे तिथेच गप्पा मारत बसले. आज काही वेगळं घडणार हे अभयला सकाळपासून वाटत होतं, पण नेमकं काय ते कळत नव्हतं. आणि त्यातच पावसाळ्याचे दिवस नसताना सुद्धा ढग भरून आले होते. त्यामुळे अभयच्या मनात जास्तच विचारांचं काहूर माजलं होतं. अचानक झालेल्या वातावरणबदलामुळे तो एकदम अस्वस्थ झाला. त्याचं हृदय एकदम जोरात धडधडू लागलं. त्याला असं बघून निखिल म्हणाला,
"काय रे अभ्या, काय झालं? असा का बसलाय? आणि अचानक काय झालं तुला? कसला विचार करायला लागलाय?"

"माहिती नाही यार, असं अचानक कसंतरी व्हायला लागलंय. म्हणजे नेमकं कळत नाहीय, पण काहीतरी विलक्षण घडणार आहे असं वाटतंय" अभय आपल्या छातीवर हात ठेवून उभं राहत आभाळाकडे बघू लागला.

"अरे ये माणसा, जरा शुभ शुभ बोल. असली ऍक्शन काय करतोय तू, काय हार्ट अटॅक वगैरे आलाय का काय?" 

अभय हसला आणि त्याने ती पोज बदलली आणि बोलला,
"नाही निख्या, पण एकदम विचित्र वाटतंय. असं पाहिलं कधीच नव्हतं वाटलं. असं वाटतंय काही तरी असं घडणार आहे लाईफ चेंजिंग काहीतरी. तुला नाही का काय वाटत हे वातावरण बघून"

निखिल त्याच्याकडे बघत होता. हे बेनं असलं काय बोलतंय ह्याचा अंदाज घेत होता. पण काही कळत नव्हतं त्याला. न राहवून तो म्हणाला,
"हे बघ अभ्या, आधीच हे असलं वातावरण तयार झालय आणि तू हे असलं फालतू काही बोलू नकोस. असल्या वातावरणाचा माझ्यावर परिणाम व्हायला मी काय ससा आहे का, की आभाळ पडलं म्हणून पळायला."

"तसं नाही रे, पण... जाऊदे च्यायला" काही बोलायचं न समजून अभय तसाच उभा राहिला.

आणि अचानक विजा कडकडायला सुरुवात झाली. जोरात वारा सुटला आणि जोरदार पावसाला सुरुवात झाली. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे सगळ्यांची धावपळ उडाली. सगळे इकडे तिकडे पळायला लागले. आडोसा शोधायला लागले. पण अभय मात्र तसाच दोन्ही हात पसरून डोळे बंद करून वरती बघत पावसात उभा राहिला. निखिल पण आडोशाला पळाला.अभय ला तसं बघून तो काही बोलला नाही. फक्त त्याच्याकडे बघत होता. कारण त्याला माहित होतं, त्याला पाऊस किती आवडतो ते. पावसात भिजायला तो काहीही करेन. त्याला 
जर आता अडवायला गेला  असता तरी तो आला नसता. म्हणून त्याला  अडवायच्या भानगडीत न पडता तो पावसापासून वाचण्यासाठी टपरीच्या इथे जाऊन उभा राहिला.

 अभय तसाच डोळे बंद करून उभा होता पावसात. त्याच बाहेरच्या जगाकडे लक्षच नव्हतं. तो आपल्याच धुंदीत पावसाचे थेंब अंगावर झेलत शांत उभा होता. असं  किती बरं वाटतं ना बाहेरच्या जगाची पर्वा न करता फक्त आपल्या धुंदीत जगणं. तेवढ्यात त्याच्या कानावर कुणाच्या तरी नाजूक हसण्याचा आवाज आला. क्षणभर तो तसाच कानात घुमला. पण भास असावा म्हणून त्याने लक्ष नाही दिलं. पण परत तेच नाजूक खिदळणं त्याच्या कानावर पडलं, तसे त्याने डोळे उघडले आणि त्या आवाजाच्या दिशेने पहिले आणि पाहतच राहिला. कारण कोणीतरी आणखी अभयसारखंच त्या पावसाचा आनंद घेत होतं. फरक इतकाच कि अभय एकटाच आपल्या विश्वात होता आणि ती व्यक्ती तिथल्याच २ - ४  लहान पोरांसोबत पावसाच्या पाण्यात उड्या मारत आनंद वाटत होती. अभय पाहतच राहिला, कारणहि तसंच होतं. ती जी कोणी होती, अभयचं हृदय तिने केव्हाच पळवलं होतं. कारण ती पावसात भिजताना अक्षरशः वर्षाराणी वाटत होती. होच. तिच्याकडे अभय भान हरपून पाहत होता. पावसात भिजणारी ती आणि तिच्या कडे पाहणारा अभय. एवढंच.

पाऊस जोरदार होता, मन भरून कोसळत होता. विजांचा कडकडाट होताच सोबतीला. आणि त्यात हे दृश्य. अभय आणि ती. अभय स्तब्ध होता. त्याची फक्त नजर तिच्या कडे पाहत होती. तिला आपल्या डोळ्यात सामाणसाठवून घेत होता तो. आणि ती. पावसाने तिचे पूर्ण शरीर चिंब भिजले होते. तिचा तो फिकट गुलाबी आणि पांढऱ्या रंगाचा ड्रेस आणि तो गोरापान रंग पावसात भिजून आणखीनच विलोभनीय दिसत होता. मोकळे सोडलेले केस आणि  कपाळावर लावलेली एवढीशी टिकली तर कहर करत होते. काळेभोर गहिरे डोळे त्यांना सांगड घालत होते. साधंच पण मनमोहक सौंदर्य ते. त्यावर तिचं हसणं तर... वा...

त्या पावसात भिजताना ती आपलं भान हरपली होती. पाऊस चालू झाल्यावर कधी आपल्या गाडीचा दरवाजा उघडून ती बाहेर आली, तिलाच कळलं नाही ते. तिकडून मागून तिची आई तिला आवाज देत होती. लवकर गाडीत ये म्हणून सांगत होती. पण तिचं लक्ष होतंच कुठे. ती तर आपल्याच विश्वात होती. इकडे अभय पण तिच्या कडेच पाहत होता.

पावसाचा जोर अचानक आला तास ओसरला. आणि ती पण. पाऊस थांबल्यावर तिची आई येऊन तिला घेऊन गेली गाडीकडे. तिने त्या मुलांना बाय करत पुन्हा भेटू म्हणून निघून गेली. अभय मात्र तसाच उभा होता अजून. निखिल हा  सर्व प्रकार पाहत होता. अभयचं काय झालं हे त्याला समजून चुकलं. तो तसाच अभय कडे आला. तर तो अजून ती मुलगी गेली त्या दिशने पाहत होता. त्याने त्याच्या डोळ्यांसमोरून हात फिरवला तरी त्याच लक्ष नाही. तो तसाच. मग मात्र निखिलने अभयच्या डोक्यात जोरात टपली मारली. तसा तो भानावर आला.

" काय रे ये? काय झालं? असा काय पाहत होता तिच्या कडे? कोण होती ती मुलगी?" निखिलने विचारलं.

" कक्क कोण ..... मुलगी...... ????" अभय शुद्धीवर येत म्हणाला.

"अरे तीच, जिच्या कडे आता तू बघत होतास एवढे डोळे फाडुन."

" माहित नाही कोण आहे ते " अभय तसाच बोलत होता.

" बरं, चल असू दे. चहा पिऊ आणखी एक चल. भिजलायस पावसात तू."

निखिलने कपाळावर हात मारला. ह्याची तर विकेट पडली होती हे त्याने ओळखले. म्हणून तो आता तरी काही बोलला नाही. आणि ते दोघे टपरीकडे आले. आणि चहा घेतला. निखिल सुद्धा अभयला काही बोलला नाही. तो आपला चहा घेऊन गप्प उभा राहिला. कारण अभय ला आता छेडून काही उपयोग नव्हता. ते कारट त्या मुलीचाच विचार करत असणार हे त्याने ओळखलं आणि तो आपला मुकाट्याने बाजूला उभा राहिला. थोड्या वेळाने बघू त्याच्या कडे.


            सगळं पहिलं होतं तसं झालं. पूर्ववत. पण अभय मात्र अजून तिथेच होता. 'कोण असेल ती? हाच विचार होता त्याच्या मनात. आजवर एवढ्या मुली पहिल्या, पण अशी जादू आज पहिल्यांदाच. अच्छा.. म्हणून आपलं हृदय मघाशी एवढं जोरदार धडधड करत होततर. मन अस्वथ झालेलं ते ह्यासाठी. पण आपलं हृदय तिच्यासाठीच का धडकावं. कोण  होती ती? आणि अशी अचानक येऊन कशी काय गायब झाली.' अभय आपल्या विचारात होता.


कोण होती ती मुलगी? काय होईल आता अभयचं? निखिल काही बोलेल का ? ह्या सगळ्या गोष्टी आता पूढच्या भागात....

To be continued.... Part २


- By Prabhakar Waghmare