Search This Blog

Sunday, April 12, 2020

अनोळखी हे प्रेम - Part 3



                 बसून बसून निखिल कंटाळला होता. रात्री लवकर निघायला हवं, कारण इकडे आपण पहिल्यांदाच आलोय आणि परत जाताना रस्ता भेटला पाहिजे. नाहीतर इकडेच अडकून पडावं लागेल. विचार करत तो अभयला म्हणाला,
"अभ्या, यार कधी निघायचं आपण. लवकर निघालं पाहिजे, नायतर इकडेच बसावं लागेल जंगलात अडकून."

पण अभयचं लक्ष होतंच कुठं त्याच्याकडे. तो आपला ऋतिकाच्याच विचारात होता. कारण ऋतिका भेटल्यापासून तो काही ह्या दुनियेत नव्हताच. राहून राहून तो थोड्यावेळापूर्वीचा सीन त्याच्या डोळ्यांसमोर येत होता. कसा आपला ऍक्सिडेंन्ट झाला आणि कशी ती आपल्याला परत भेटली. पण ती अचानक इथे कशी काय आली किंवा आपण इकडे नेमकं कसं काय पोचलो, ते त्याला पडलेलं कोडंच होतं. कदाचित देवानेच  आपल्याला मदत केली असणार, म्हणून मनोमन त्याने देवाचे आभार मानले.

त्याचं लक्ष नाही पाहून निखिलने त्याच्या डोक्यात टपली मारली,
"अभ्या, अरे काय म्हणतोय मी मघापासून."

"हा बोल, काय बोलतोय?" अभयने त्याच्याकडे लक्ष दिले आणि म्हणाला.

"च्यायला तुझ्या, झालं माझं बोलून. तुझं तर काय सगळं लक्ष तिच्याकडेच आहे. तू कशाला माझ्याकडे लक्ष देतोय आता." निखिल नाटकी आवाजात म्हणाला.

"नाहि रे निख्या बोल काय बोलत होता."

"अरे मी म्हणत होतो, आपण कधी निघायचं? का इथेच राहायचं तुझ्या सासरवाडीत? परत जायला नको का"

"हो निघूया ना थोड्यावेळाने. आता थोडं थांब कि, ऋतिका एवढ्या जवळ आहे माझ्या आणि तूला कसली घाई झालीय रं? बस गप्प आजून थोडा वेळ" अभय म्हणाला. त्यालाही तिथून निघू वाटत नव्हतं.

"बरं थांबू साल्या. पण काहीतरी कर ना तोपर्यंत. काय इथे बसून नुसता विचारच करत बसलाय. आता नशिबाने भेटलीच आहे ती तर, बोल ना तिच्याशी. थोडी ओळख वाढव."

"हो पण कसं ते. अरे इकडे बघ किती लोकं आहेत. ह्यांच्यासमोर कसं बोलणार तिच्याशी. तेही काही ओळख न पाळख. खूप मोठी लोकं आहेत वाटतं हि."

"एवढंच ना. इथल्या लोकांशी तुला काय करायचं आहे. कुठे आपण अशी तशी मुलं आहोत. चांगले डिसेन्ट आहोत." आपली कॉलर टाईट करत निखिल म्हणाला. त्याची टाईट केलेली कॉलर बघून अभय म्हणाला,

"आता पर्यंत डिसेन्ट दिसत होता पण साल्या आता पक्का टपोरी दिसतोय. कॉलर खाली कर गप्प" अभयने त्याची कॉलर हातानेच खाली केली.

"हा हा असू दे. ते जाऊ दे थांब, बोलवतो तिला मी. फक्त तू थोडं विव्हळायचं नाटक कर बाकी मी बघतो तिला कास बोलवायचं." असं म्हणून निखिल तिथून उठला आणि राम्याला शोधायला गेला. तोच फक्त ऋतिकाला बोलावून आणू शकत होता. कारण त्या एवढ्या मोठ्या वाड्यात तो कसं घुसणार होता. इकडे अभयला समजलं निखल काय करणार ते आणि तो ऋतिकाला परत बघायला भेटणार म्हणून गालातल्या गालात हसला.


      इकडे ऋतिकासुद्धा वेगळ्याच विचारात होती. बेडरूम मध्ये बेडवर पडल्या पडल्या ती मघाशी घडलेल्या घटनेचा विचार करत होती. 'हा मुलगा कोण आहे आणि ह्याला आपण ओळखतोय आधीपासून असं का वाटतंय मला. कारण आपण तरी कधी भेटलो नाही अगोदर. मग असं कसं? आणि त्याला लागलेलं पाहून आपल्याला का दुःख व्हावं? आपण का तळमळावं? त्याच्या वेदना पाहून आपल्याला का वेदना व्हाव्यात? विचित्र आहे सगळं. त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. ती आपल्या ओळखीची आहे असं का वाटतंय आपल्याला? काहीच कळात नाहीय आणि सगळ्यात महत्वाचं, आपलं हृदय जे सकाळपासून नुसतं धडधडत होतं ते अचानक कसं शांत झालं त्याला बघून. काहीतरी आहे. शोधायला हवं. नाहीतर त्यालाच परत एकदा भेटून विचारावं. कदाचित त्याला काही माहीत असेल. ' ती विचार करत होती, तेवढ्यात तिचं खिडकीबाहेर लक्ष गेलं. ते दोघे आपसांत काही बोलत होते आणि  त्याचा मित्र इकडेच येतो. तिला शंका आली कि तो तिला बोलवायला तर नसेल आला ना? तिची शंका खरी ठरली. तो तिच्याकडेच येत होता. तिलापण सोपं झालं ते. मग तिने त्याच्याकडे जायचं ठरवलं.

        थोड्याच वेळात निखिल आला. पण ऋतिका नाही दिसली त्याच्यासोबत. म्हणून अभयने ती कुठाय हणून नजरेनेच विचारलं. तर निखिलने त्याला  इशाऱ्यानेच गप्प बसून ऍक्टिंग सुरु करायला सांगितली.  निखिल अभयच्या जवळ येताच त्याला ऋतिका घाईघाईने येताना दिसली.

"काय सांगितलं रे तिला? एवढ्या घाईघाईने का येतेय ती? " अभयने गोंधळून विचारलं.

"काही नाही जास्त सांगितलं. एवढंच बोललो कि तुला जास्त दुखतंय आणि परत रक्त येतंय तुझ्या जखमेतून" असं म्हणून निखिलने डोळा मारला. पण त्याचा परिणाम असा होईल असं नव्हतं वाटलं. कारण ऋतिका एवढ्या लवकर येईल हे नव्हतं वाटलं त्याला.

ती जवळ येताच तिच्या चेहऱ्यावरची काळजी अभयला स्पष्ट दिसली. तिचा चेहरा पाहून अभयला क्षणभरासाठी  असं वाटलं की, तिच्यासाठी आपण कोणी जवळचं आहोत. ती येऊन अभयच्या बाजूलाच बसली तसा निखिल उठून उभा राहिला.

"खूप दुखतंय का तुमचं. आणि बघू कुठे रक्त येतेय ते?" असं म्हणून ती अभयचा हात हातात घेतला.

"पायाला लागलंय ऋतिका. तुम्ही हात पकडलाय माझा" अभयने सांगितलं तेव्हा ती बावरली.

"अरे हो,  लक्षातच नाही माझ्या." तिने लाजून अभयचा हात सोडला आणि ती त्याची जखम पाहू लागली. पण काही रक्त वगैरे नव्हतं आलं. आपण मघाशी बांधून गेलो तशीच मलमपट्टी अजून आहे. हे बघून तिने एका डोळ्याची पापणी वर करून अभयकडे बघितलं. तसा अभय विव्हळू लागला. हे पाहून तिला हसूच फुटलं. 

"हे नाटक करायची काय गरज होती?" ऋतिकाने सरळ चोरीच पकडली त्याची. तिने सरळ अभयलाच विचारलं.
निखिल आपला प्लॅन फसला म्हणून इकडे तिकडे बघू लागला.
"नाटक....  नाही... मी नाटक नाही करत आहे. खरंच दुखतंय माझं" अभयने मान खाली घातली.

"कळतंय हो मला सगळं. मी वरतून सगळं पाहत होते. हा तुमचा मित्र काहीतरी बोलून तुमच्याशी रामूला शोधायला आला तेव्हाच ओळखलं मी. पण म्हटलं बघावं नेमकं काय कारण आहे ते, म्हणून मी काही न बोलता आले " तिने सांगितलं सगळं.

अभय आणि  निखिल तिच्याकडे पाहू लागले. म्हणजे तिला माहित असताना सुद्धा ती आली होती तर. निखिलला आलं लक्षात आणि आता आपण इथे थांबायची गरज नाही असं वाटलं, तो त्यांना प्रायव्हसी म्हणून मुद्दामच रामूला आवाज देत बाजूला गेला.

"अच्छा, म्हणजे तुम्हाला माहिती होतं का  मी नाटक करतोय ते" निखिल गेला तस त्याने ऋतिकाला विचारलं.

"हो" ती हळूच म्हणाली.

" मग तरीसुद्धा तुम्ही आलात? म्हणजे ... "अभयच बोलणं मधेच तोडत ऋतिका म्हणाली,
"म्हणजे असं कि, मी मुद्दामच आले तुम्हाला भेटायला." तिचं बोलणं ऐकून अभयला आश्चर्य वाटलं. तो तिच्याकडे पाहू लागला. तिने अभयच्या डोळ्यांत पाहत बोलायला सुरुवात केली,
" सकाळी जेव्हा तुम्हाला पहिल्यांदा बघितलं, तेव्हा मला असं वाटलं कि कोणीतरी ओळखीचं आहे. पण तुम्ही ओळखीचे वाटत नव्हता. पण मन म्हणत होतं कि, तुम्हाला कुठेतरी बघितलंय आणि आपण ओळखतो एकमेकांना. माहिती नाही का पण मी तेव्हापासून तुमचा विचार करतेय. आणि तुमच्याशी कसं बोलता येईल ह्याची वाट बघत होते. तर तुम्हीच स्वतःहून मला तो चान्स दिलात. थँक्स त्याबद्दल. आणि म्हणूनच मी आले घाईघाईने. पण येताना मी अशी का आले तेच कळलं नाही. तुमच्याबद्दल मला खुप काळजी वाटत होती. विनाकारणच. आश्चर्य आहे ना? ज्याला आपण याआधी कधीच भेटलो अगर पाहिलं नाही त्याच्याबद्दल एवढी काळजी का वाटावी? म्हणून मीच हैराण आहे. तुम्ही काही सांगू शकाल का ह्याबद्दल? "

अभय अजून तिच्याच डोळ्यांत पाहत होता. तिच्या बोलण्यात हरवून गेला होता. तिने परत विचारलं अभयला.
भानावर येत अभय म्हणाला,
"मला कसं माहिती असणार ऋतिका. मी पण पहिल्यांदाच भेटलोय ना तुम्हाला. " आपल्या मनातलं सुद्धा सांगावं तिला असं अभयला वाटलं. पण नको आताच. म्हणून त्याने टाळलं ते.

"हो ते पण आहे." ऋतिकाचा चेहरा पडला.  तिचा पडलेला चेहरा पाहून अभयला कसंतरी झालं. म्हणजे हि तळमळ फक्त आपल्याला नाहीय. तीसुद्धा आपल्यासाठी तळमळतेय जेवढं आपण तिच्यासाठी. हे पाहून अभयला खूप बरं वाटलं मनातून.

"बरं ते जाऊ द्या ऋतिका. आपण ह्या अगोदर भेटलो कि नाही ते आणि ओळखतो कि नाही तेसुद्धा आठवत नाहीय तुम्हालाही आणि मलाही. सो, आता आपण भेटलोय आणि ओळखायला लागलोय. हो ना?" अभयने ऋतिकाकडे पाहत तिला विचारले.

"हो. म्हणजे तसं नाही अगदी.  पण आपण भेटलोय आजच आणि लगेच ओळखायला लागलोय असं नाही म्हणता येणार ना" ती मस्करी करत म्हणाली.

"हा. पण आता आपण भेटलोय तर यापुढे ओळखू शकतो ना." अभय म्हणाला.

"चालेल.  पण त्यासाठी आधी आपल्याला मित्र व्हावं लागेल. " ऋतिका मनातल्या मनात हसत होती/ कारण तिलाही हेच हवं होतं.
"मग ना फ्रेंड्स आता आपण?" अभयने हात पुढे करत विचारलं.

"फ्रेंड्स" ऋतिका आनंदाने म्हणाली," आणि हे काय मघापासून तुम्ही तुम्ही म्हणताय तुम्ही. आता आपण फ्रेंड्स आहोत ना? मग हि फॉरमॅलिटी कश्याला?"

"नाही, ते आपलं असच" अभय डोकं खाजवत म्हणाला.

"असुद्या, पण आता तुम्ही वगैरे नाही बोलायचं. ऑड वाटतं."

"बरं ऋतिका. नाही म्हणत. पण तू हि अरे तुरेच म्हण. "

"हो  चालेल." असं म्हणत दोघे हसले.

                    अभयने तिचा हात हातात घेतलेला तसाच होता. ऋतिकाच्या लक्षात आले ते, तशी ती लाजली. पण काही बोलली नाही. कारण त्याचा तो स्पर्श तिला त्याच ओळखीचा वाटला आणि हवाहवासा देखील वाटत होता.  तेवढ्यात निखिल पण आला त्यांच्याजवळ.  तेव्हा तिने घाईघाईने आपला हात अभयच्या हातातून सोडवून घेतला. निखिलच्या नजरेतून हे सुटलं नाही.

"काय मग अभय, राहिलं का तुझं दुखायचं?" निखिलने डोळा मारत अभयला विचारले.

"हो. मग ऋतिकाने केलं नीट मला." अभय ऋतिकाकडे पाहत म्हणाला.  ती गालातल्या गालात हसली.

"हो का. बरं मग आता तू नीट झालाच आहेस, तर निघायला काही हरकत नाही आता. हो ना?"

"निघुयात ना थोड्यावेळाने" अभयने सांगितले.

ते लोकं निघायचं म्हणतायत हे ऐकून तिचा चेहरा उतरला. कारण कुठेतरी ऋतिकाला अभयचा सहवास आवडला होता. तो जाऊ नये असे तिला मनोमन वाटत होतं , पण त्यांना तसं सांगणं तिला बरोबर नव्हतं वाटत. कारणं खूप होती आणि सांगणार कोणाला?

"एवढ्यात निघताय?" न राहवून तिने विचारलंच.

"निघावं लागणार ना. कारण खूप लांब जायचं आहे आणि आम्ही इकडे नवीनच आहोत. त्यामुळे एकतर रस्ता शोधत जावं लागणार आहे. येताना आम्ही आलो असंच रस्ता दिसेल तसा, पण आता परत जायचा रस्ता शोधावा लागणार आहे आम्हाला." निखिलने सांगून टाकलं.

"गुगल मॅप आहे की, मग कशाला टेंशन घेताय." ऋतिका म्हणाली.

"हो, पण तरीसुद्धा. आता जर गेलो नाही तर परत कसं भेटणार ना आपण" अभय मध्येच म्हणाला. तसं ऋतिकाने चमकून त्याच्याकडे बघितलं.

"नाही म्हणजे आता गेलं पाहिजे आम्हाला असं बोलायचं होतं." अभयने लगेच सारवासारव केली.

"हम्म बरं चालेल. पण जेवण तर नाही करता येणार तुम्हाला कारण आताच निघायचं म्हणताय तुम्ही. निदान चहा तरी घेऊन जा. तेवढीच एनर्जी मिळेल तुम्हाला आणि आम्हाला पाहुणचारही करता येईल तुमचा. " ऋतिका काहीतरी कारण काढत म्हणाली. अभयला हेच हवं होतं. कारण निघायचा बहाणा केला नसता तर तसाच त्याला बोअर होत बसावं लागलं असतं तिकडे. यानिमित्ताने त्याला आणखी थोडावेळ थांबता येईल तिच्याजवळ.

  अभय लंगडत होता. एवढा वेळ एकाजागी बसून होता म्हणून काही जाणवलं नाही, पण आता चालताना त्याला दुखत होतं. निखिलने त्याचा हात खांद्यावर टाकून त्याला आधार देत चालायला लागला. पुढे ऋतिका आणि मागे हे दोघे चालत होते. वाड्यात पोचल्यावर बाहेरच ओसरीवर बसले सगळे. वर चढताना ऋतिकाने अभयला हात दिला होता. हे पाहून निखिल गालातल्या गालात हसत होता. रामूला अण्णांना बोलवायला सांगून ऋतिका चहा बनवायला निघून गेली. थोड्यावेळाने अण्णा पण आले. दोघांना बघून त्यांनी लगेच त्यांची विचारपूस केली. आणि त्यांच्यासोबतच बसले तिथे गप्पा मारत. एकूणच माणसं चांगली होती ती. एवढं सगळं केलं होतं त्यांनी ह्या दोघांसाठी अनोळखी असूनसुद्धा.

ऋतिका चहा घेऊन आली. चहा देऊन आपल्यासाठी एक कप घेऊन अण्णांच्या बाजूला बसली. आता निघायचं म्हणून ते सांगत होते त्यांना. निखिल बोलत होता त्यांच्यासोबत. इकडे अभय चोरून तिच्याकडेच बघत होता, हे तिला जाणवलं तसं तिने एक चोरटा कटाक्ष टाकला त्याच्यावर. दोघांची नजरानजर झाली तशी त्याने आपली कावरीबावरी नजर दुसरीकडे फिरवली.

 चहा पिऊन झाला तसं ते दोघे निघाले. त्या सगळ्यांचा निरोप घेत ते पायऱ्या उतरु लागले.
"खूप खूप थँक यु अण्णा तुम्हाला. कारण तुम्ही नसतात आज मदतीला तर माहिती नाही आम्ही तिथेच असतो अजून पडलेले. तुम्ही खूप मदत केलीत आम्हाला आणि आमच्यावर दवापाणी सुद्धा केलं लगेच. खरंच खूप थँक यु." अभय म्हणत होता.

"पोरांनो अरे मदत कसली त्यात. तुमचा अपघात झाला होता आणि तुम्हाला त्यावेळी मदतीची गरज होती आणि आम्ही ती केली. हे आमचं कर्तव्यच होतं. परमेश्वराच्या कृपेने जास्त काही झाली नाही तुम्हाला. आभार वगैरे काही मानू नका पोरांनो. गाडी नीट सांभाळून चालवा पोरांनो एवढंच. काळजी घ्या."  अण्णा म्हणाले.

 त्यांचा निरोप घेऊन ते निघालेच होते. आता ऋतिकाला परत ककसं भेटता येणार किंवा तिच्यासोबत कॉन्टॅक्ट कसा ठेवणार ह्या विचारात अभय चालत होता.  तेवढ्यात ऋतिकाने त्यांना आवाज दिला. सगळ्यांनी वळून तिच्याकडे पहिले. ती धावत अभयजवळ आली. तिने अभयच्या हातात कसलीतरी चिट्टी ठेवली आणि मोठयाने अण्णांना ऐकू जाईल अशा आवाजात म्हणाली,"ह्या गोळ्या आहेत. रात्री जेवण झाल्यावर खा झोपताना." आणि हळूच अभयला "अभय प्लिज तू नकोस बाईक चालवूस. तू मागे बस. ह्याला चालवू दे बाईक. काळजी घे " ऋतिका काळजीने म्हणाली आणि अभयला स्माईल देऊन वळली.

 अभयच्या क्षणभर लक्षात नाही आलं काय ते. पण तिची स्माईल बघून तो समजून  गेला. निखिलला सुद्धा कळलं. समझने वाले को इशारा काफी है बॉस. गोळ्यांच्या बहाण्याने तिने तिचा मोबाईल नंबर अभयला दिला होता आणि कळू नये म्हणून जोरात म्हणाली होती गोळ्या खा म्हणून. अभयला हे सगळं खूप सुखावून गेलं.

   ते दोघे चालत बाईकजवळ आले, हेल्मेट आणि चावी बाईकलाच होती. कोणीतरी त्यांची बाईक आत मध्ये घेऊन आलं होतं.  निखिलने बाईकची हालत बघितली. पुढची हेडलाईट थोडी डॅमेज झाली होती आणि बाजूने थोडी घासली होती.  जास्त नुकसान नव्हतं झालं काही. निखिलने बाईक स्टँडवरून काढली आणि स्टार्ट केली. अभय मागे बसला. एवढा वेळ कोणी काहीच बोललं नव्हतं. निखिल ने पण अभयला डिस्टर्ब नाही केलं. थोडं पुढे आल्यावर अभयने मागे वळून पाहिलं तर ऋतिका खिडकीत बसून त्याच्याकडेच पाहत होती. अभयने तिच्याकडे पाहत हात हलवत स्माईल दिली. तिनेसुद्धा स्माईल देत त्याला बाय केलं. जणू काही ते खूप आधीपासून एकमेकांना ओळ्खतायत. 

        अभयच्या मनात सगळ्या गोष्टी तशाच साचल्या  होत्या सगळ्या. कारण एकामागून एक गोष्टी आज घडत होत्या आणि त्याला विचार करायला वेळ मिळाला नव्हता. जिच्याबद्दल त्याला एवढी ओढ होती तीसुद्धा त्याच्याकडे तेवढ्याच ओढीने आली होती. प्रेमाची ओढ होती ती. आणि  देवानेही  दोघांना आज भेटवलंच होतं. सगळं अवघड वाटत असताना कसं सगळं अचानक  सोपं झालं होतं. त्याच खुशीत अभय निघाला तिला परत एकदा भेटू या इच्छेने. निखिलसुद्धा खुश होता अभयला ती भेटली म्हणून आणि तिकडे ऋतिका सुद्धा काहीतरी नवीन  घडतंय आपल्या आयुष्यात म्हणून हरकून गेली होती. सगळं कस ओळखी ओळखीचं वाटत असूनसुद्धा अनोळखी होतं.

To be continued in 4th part.