Search This Blog

Saturday, April 11, 2020

अनोळखी हे प्रेम - Part 2

                दुसऱ्या दिवशी निखिल अभय कडे आला. कॉलेजला सुट्टीच होती फायनल एक्झामच्या तयारीसाठी. त्यामुळे त्याचा काहीतरी प्लॅन होता बाहेर जायचा कुठेतरी. कारण अभ्यासाचं एवढं त्याला घेणंदेणं नव्हतं आणि अभयला त्याची गरजही नव्हती. त्यामुळे निखिलने त्यादिवशी झालेल्या सीनबद्दल आज अभयशी बोलायचं ठरवलं. म्हणून तो सकाळ सकाळीच त्याच्या घरी येऊन थबकला. अभय अजून अंथरुणातच लोळत होता, कारण काही काम नव्हतं. रात्री एक्झामची थोडीफार तयारी केली होती त्याने म्हणून आज तो कुठंतरी हिंडायला जाणार होता निखिलला घेऊन. तर इकडे निखिल स्वतःहूनच आलेला बघून त्याला बरं वाटलं.

" अभ्या, लेक अजून उठला नाहीस होय. चल ऊठ लवकर, जाऊ आज कुठंतरी बाहेर. जाम बोअर झालाय घरी राहून." निखिल तिथेच बसत म्हणाला.

"बरं झालं आलास. तसं पण आज माझं मन करत होतं बाहेर जायचं कुठंतरी. लेका शंभर वर्षं आयुष्य तुला. " उठून बसत अभय म्हणाला.

" हा मग, तुमनें याद किया और हम चले आये" हातवारे करत गाणं म्हणत निखिल म्हणाला.

"हो, तू थांब. मी  येतो फ्रेश होऊन." असं म्हणत अभय अंघोळीला गेला.


             थोड्यावेळाने ते दोघे बाईकजवळ आले. अभयने बाईक स्टार्ट केली, तसा निखिल मागे बसला आणि म्हणाला," चला मालक."

" कुठं जायचं निख्या."

" चल कुठंतरी, जाम दिवस झाले कुठं गेलो नाही बाहेर. तू बाईक घे मेन रोडला मग बघू कुठं जायचं ते"

ह्यादोघांचं हे नेहमीचं. कुठं जायचं ते माहीत नसतं. फक्त बाहेर निघायचं अन् पेट्रोल संपेपर्यंत भटकायचं. आणि जर कुठे जवळपास पेट्रोलपंप नसला की एकमेकांना शिव्या घालत बाईकला धक्का मारत पेट्रोलपंप शोधत राहायचं. म्हणून यावेळेस निघतानाच निखिल म्हणाला, "अभ्या, आताच पेट्रोल टाकून घे, परत मी नाही धक्का मारत बसणार" धक्का मारून काय हालत झाली होती लास्टटाईम हे आठवलं त्याला.

"हा बरं, चल पेट्रोल भरून घेऊ." असं म्हणत अभयने जवळच असणाऱ्या पंपाकडे बाईक वळवली. टाकी फूल करून घेत निघाले, पण ते बाईकलाच माहिती कुठं चालले ते. 


             सिटीमधून बाहेर पडल्यावर रहदारी कमी झाली. थोडं शांत वातावरण वाटू लागलं. कुठल्यातरी गावचा रस्ता लागला होता. अनोळखी नव्हता, पण इकडे कधी सहसा आले नव्हते ते. पण इकडे काय होणार आहे, ह्याची अभयला थोडीदेखील कल्पना नव्हती. तो त्यापासून पूर्ण अनभिज्ञ होता. शीळ वाजवत बाईक चालवत होता आणि मागे बसून निखिल हरियाळी बघत होता(?) त्या गावातली. ते गाव ओलांडून पुढं गेल्यावर रस्त्यात थोडा चढ लागला अन् घाट चालू झाला. आपण नवीनच कुठंतरी आलोय हे बघून निखिल म्हणाला,
"साल्या अभ्या, इकडे कुठं घाटात गाडी आणली रे.आणि एवढया लवकर कासाकाय घाट चालू झाला?"

"काय माहिती, पहिल्यांदाच आलोय इकडे आपण. थोडं गार पण वाटतंय, कदाचित इकडे पुढे नदी असेल बहुतेक." अभय ने आपला अंदाज बांधला.

"तू काय मॅन वरसेस वाईल्ड मध्ये कामाला होता काय रे, तुला काय माहिती पुढं नदी आहे का जंगल ते." त्याच्या तोंडाकडे पाहत निखिल म्हणाला.

"अरे निखिल, माझ्या मित्रा जंगलातल्या आणि नदीच्या गारव्यात फरक असतो. जंगलातला गारवा हा सुखावणारा असतो तर नादिवरच्या गारव्याने मन शांत होतं."

त्याचं बोलणं ऐकून निखिलने हात जोडले आणि म्हणाला,
"वा मेरे गुरू, काय फरक रे दोघांत, एकच ना दोन्ही? सुख काय अन् शांती काय दोन्ही एकच कि रे  "

"नाही रे, दोन्ही एकच नाही. सोड जाऊ दे तुला नाही कळायचं ते" असं म्हणून अभयने आपल्या बाईक चालवण्याकडे लक्ष केंद्रित केले. 

अभयच्या अंदाजाप्रमाणे खरंच पुढे एक नदी होती. घाट उतरल्यावर पायथ्याशी एक नदी आपल्या नादात मस्त वळण घेऊन पुढे जात होती. नदी जवळ आली तसं अभयने बाईक बाजूला घेऊन एका झाडाखाली उभी केली. निखिल उतरून तसच झाडामागे गेला. अभय नदीकिनारी आला आणि पायातले शूज काढून पॅन्ट वर करून गुडघाभर पाण्यात पुढे गेला. त्याला बघून निखिल पण तसाच आला त्याच्या मागे. नदीच्या थंड पाण्याने मस्त फ्रेश वाटत होतं. जवळच असणाऱ्या एका खडकावर अभय बसला. वाहत्या पाण्यात पाय सोडून पायाला स्पर्श करणारं ते नदीचं थंड पाणी आणि मधूनच पायाला गुदगुल्या करणाऱ्या त्या एव्हढाश्या लहान मासोळ्या, हे रिल्याक्सेशन अनुभवत होता. हा फ्रेशपणा कधीतरीच मिळतो अनुभवायला.

तिकडे निखिल तिथलेच लहान लहान खडे उचलून पाण्यात मारत भाकऱ्या खेळत होता. दोन... चार... सहा.. असे टप्पे काढत मजा घेत होता खेळण्याची. मध्येच निखीलचं अभय कडे लक्ष गेलं. त्याला तसा विचारमग्न बघून त्याला शंका आलीच, हे बेनं त्या मुलीचाच विचार करत असणार. दाखवत जरी नसला तरी, अभय नेहमी तिच्याच विचारात गुंग असे हल्ली. जेव्हापासून त्या मुलीला पाहिलंय, तेव्हापासून हे सटकलंय. सदानकदा तिचाच विचार. त्यामुळे आज त्याच्या मनातलं बाहेर काढायला निखिल त्याला बाहेर घेऊन आला होता. प्रेमात पडलेल्या माणसाच्या मनातून काय काढायचं म्हटलं की अवघडंच असतं हो.

"अभ्या, तुला ती मुलगी आठवतेय?" सहज बोलतो तसं निखिलने प्रश्न केला.

"कुठली रे? तसं पण तुला कुठल्या मुली आठवतात रे साल्या एक झाली की दुसरी, ती झाली की तिसरी. तुझ्या तुलाच आठवत नाहीयेत त्या मला कुठून आठवणार." अभयने त्यालाच उलट प्रश्न केला.

" अरे ये माणसा, मी माझ्याबद्दल नाही, तुझ्याबद्दल बोलतोय. तुला ती मुलगी आठवतेय का, ती त्या दिवशी पावसात भेटली होती. म्हणजे तू तिच्याकडे बघत होतास, पावसात तुम्ही दोघे भिजत होते. आणि तू तिच्या प्रेमात पडलास ती मुलगी? आठवलं?" निखिलने सरळ मुद्द्यालाच हात घातला.

"हो आठवली, पण मी कधी तिच्या प्रेमात पडलो रे साल्या?" अभय चाचपडला.

"हो ना. मग मी पडलो ना तिच्या प्रेमात? मीच सारखा विचारात असतो ना तिच्या? मीच त्यादिवशी तिच्याकडे येड्यासारखा बघत होतो ना? आणि आता सध्या पण मीच तिचा विचार करतोय ना? काय रे फुकणीच्या?" निखिल गरजला.

"हो... म्हणजे तसं नाही." आता याच्यापासून लपवता येणार नाही असं ओळखून अभय म्हणाला, 
" अरे म्हणजे, तसं प्रेमात वगैरे नाय रे पडलो तिच्या काय. आपलं असंच सहजच विचार करत होतो तिचा." अभयने सारवासारव केली.

"अरे हो की, फक्त विचार करतोस ना तिचा. तिच्या त्यादिवशीच्या फक्त दिसण्याने तू एवढा तिच्या विचारात बुडालाय. अरे चू** , ह्यालाच प्रेमात पडणं म्हणतात रे. त्या दिवशीच ओळखलं होतं. म्हटलं, सांगशील तू. पण कसलं काय लेका. तू तर अजून पण लपवतोय. खरं सांग अभ्या, तुला ती मुलगी आवडलीय ना, तिच्या प्रेमात पडलाय ना?" निखिल त्याच्या डोळ्यात बघत म्हणाला.

" हो... " बोलून अभय शांत बसला. त्याला काय बोलायचं सुचेना. निखिल फक्त त्याच्या कडे पाहत होता. हा कधी बोलतोय ते. आणि त्याने बोलायला सुरुवात केली,

"तुला माहितीय निख्या, त्या दिवशी पाऊस पडला होता,  त्या दिवशी माझं हृदय अचानक अस्वस्थ झालेलं आणि जोरजोरात धडकत होतं. ते विनाकारण नव्हतं. ते तिच्यासाठी धडकत होतं. कदाचित ती मला त्या दिवशी भेटणार होती म्हणून असेल. आणि ती दिसल्यावरच ते शांत झालं. मला माहीतही नाही ती कोण आहे? तिचं नाव काय? ती कुठं राहते? तिचं आणि माझं काय नातं आहे? का तिच्यासाठी माझं हृदय एवढ्या जोरात धडकत होतं? काहीच नाही महिती. तुझं बरोबर आहे, कि मी तिचा विचार करत असतो सारखा. पण मी प्रेमात वगैरे पडलोय का तिच्या? खरंच निख्या नाही माहिती रे मला." अभय मनातलं सांगत होता सगळं.

" हो अभ्या, लेका तू प्रेमातच पडलाय तिच्या. त्याशिवाय का तू एवढा तडपतोय तिच्यासाठी आणि ते पण ती कोण आहे हे माहित नसताना. साल्या तुझ्या जागी दुसरं कोणी असतं तर त्याला मी येडं समजून दोन चार शिव्या दिल्या असत्या. पण हे येडं आपलंच जिगरी आहे म्हणून काय करता नाही येत" कपाळावर हात मारून घेत निखिल म्हणाला.
"तुझ्यासाठी आपण शोधूया चल तिला. कुठं का असेना ती, कोण का असेना, तिला आपुन ढुंढ के लायेगा तेरे लिये " 


" हो" अभय ने स्माईल दिली. " तिला शोधायची गरज नाही रे निख्या, उलट तीच मला शोधत आलीय असं म्हण. त्यादिवशी जसं ती अचानक भेटली होती, तसंच आजही ती भेटेल असं मला वाटतंय आणि तेहि इकडेच जवळपास कुठंतरी. "

"काय बोलतो? म्हणजे आजपण तुला त्या दिवशी सारखा हार्टअटॅक आला का काय? " निखिल डोळे मिचकावत म्हणाला.

" नाही तसं  काही, पण मन म्हणतय माझं" अभय त्याच्या कडे पाहत म्हणाला.

"हो का. बरंय बरंय. अजून काय म्हणतंय बाबा तुझं मन" निखिल त्याची टेर खेचत म्हणाला.

अभयला कळलं तसं  तो म्हणाला,
"सध्या तरी ते म्हणतंय, काहीतरी खाऊन घेऊया. खूप भूक लागलीय"

"हो, म्हणजे आलं बाबा तुझ्या लक्षात. मला तर वाटलं तू तर आता उपाशी फिरवतोय का काय, आज तिच्या नादात." निखिल म्हणाला. त्याचं ते तोंड बघून अभयला हसायला आलं.

"चल बघू इकडे कुठे काय भेटतंय का ते. आपण आज नवीनच ठिकाणी आलोय वाटतं कुठंतरी. शोधावं लागेल आपल्याला जरा." पाण्याच्या बाहेर निघत अभय म्हणाला. तसा बघतो तर निखिल तर अगोदरच बाईक जवळ पोचला होता. चावी बाईकलाच होती. म्हणून निखिल जाऊन डायरेक्ट बसला. अभय मागे बसला तसं निखिलने बाईक स्टार्ट केली आणि ते कुठं काय खायला भेटतंय का ते शोधायला निघाले. पण इकडे अभयला त्याच्या मनात कुठंतरी असं वाटत होतं कि, त्या दिवशी सारखी आजही अचानकच भेटेल ती.


थोडं पुढे आल्यावर एक छोटा ढाबा दिसला त्यांना. निखिलने तिथेच बाईक घेतली. छोटाच होता ढाबा पण ऐसपैस होता. मोजकेच टेबल लावले होते. जास्त गर्दी नव्हतीच. एखाददुसराच बसलेला. इकडे जास्त काही मिळेल असं वाटत नव्हतं. पण जे काही मिळेल त्याच्यावर तुटून पडायचं त्यांनी ठरवलं.  कारण भूकच तेवढी लागली होती. खाऊन झाल्यावर निखिल बिल भरायला गेला. अभय बाइकजवळ आला. आता  थोडं भटकून परत निघायला हवं म्हणून त्याने निखिलला आवाज दिला. तो आल्यावर दोघे निघाले पुढच्या भटकंतीला.

   मस्त वाटत होतं. रस्ताच्या दोन्ही बाजूला गर्द हिरवी झाडं होती. त्या झाडांनी पूर्ण रास्ता झाकला होता. पलीकडं शेती होती. एकदम नॅचरल वातावरण होतं. तिथल्या झाडांमुळे त्या ठिकाणी मस्त गारवा निर्माण झाला होता. त्यामुळे मघाशी जाणवणारं ऊन तिथल्या गारव्याने आता कमी लागत होतं. दोघे शांतच होते. तिथला गारवा अनुभवत होते. तेवढा पट्टा पार केल्यावर, पुढच्या वळणावर येताच अभयचं हृदय परत एकदा जोरात धडधडू लागलं. तोच अस्वस्थपणा परत जाणवू लागला. तोच बेदर्दीपणा जाणवू लागला.  म्हणून न राहवून अभयने जोरात ब्रेक दाबला. तसं पुढचं चाक तिथल्या मातीत घसरलं आणि बाईक हेलकावे खात जोरात पडली. अभयचा कंट्रोल सुटून बाईक बाजूच्या झुडपात घुसली.

            निखिल तिथेच आडवा आणि अभय हातावर जोरात घासत सुपरमॅन सारखा जमिनीवर लँड झाला. आता तर आपण बाईकवर होतो आणि अचानक जमिनीवर धूळ का खातोय हे निखिलला लवकर समजेनाच. आणि अभयचा का असा सुपरमॅन झालाय हे लक्षात येईपर्यंत त्यांच्या आजूबाजूला तिथल्या जवळ असणाऱ्या वाड्यातली आणि तिथं बाजूलाच शेतात काम करणारी माणसं धावतपळत जमा झाली होती. त्यांनी दोघांना उठायला मदत केली. एकाने झुडपांत घुसलेली बाईक बाहेर काढली.  त्यांचा ऍक्सीडेन्ट झालेला बघून त्यांच्यातला एक वयस्कर म्हणाला,
" अरे तुम्ही बघत काय बसलाय आणि ये राम्या तू काय नुसता त्याला पकडून उभा राहिलाय. लागलं असेल त्यांना, वाड्याजवळ आणा दोघांना. जास्त लागलं का बघू ते" तस त्या राम्याने अभयला त्याचा हात खांद्यावर घेऊन चालायला सुरुवात केली. जमलेली इतर लोकं पण त्यांच्या मागे निघाली.  अभयच्या पायाला मार लागला होता, म्हणून तो लंगडत होता आणि निखिल खाली पडायच्या आधी अभयच्या हेल्मेटवर जोरात डोकं आदळल्यामुळे आलेलं टेंगुळ चोळत होता. त्याला काही जास्त दुखापत नव्हती झाली.  त्यामानाने अभयला जास्त लागलं होतं. म्हणून तो डोकं चोळायचं सोडून अभयच्या सपोर्टला आला.

            ती लोकं वाड्याजवळ पोचली  तसे, एकाने त्याना बसायला बाज दिली आणि पाणी आणायला पळाला.  अभयला त्यावर बसवत सगळी घोळका करून उभी राहिली. निखिल आणि अभय मध्ये आणि त्यांच्या अवतीभोवती तिथली लोकं. पाणी पिल्यावर अभयला थोडं बरं वाटलं. तो तिथल्या लोकांकडे बघू लागला आणि ती लोकं हे दोघे कोण आहेत म्हणून ह्यांची  तोंड न्ह्याळात होती. अभयला अजून नेमकं काय झालंय आणि आपण इथे काय करतोय आणि ही माणसं कोण आहेत, हे काही कळेना. बाजूला निखिलला बघून त्याला बरं वाटलं. त्याने नजरेनेच त्याला विचारलं. पण तोही काही बोलला नाही.
तितक्यात त्या मघाच्या वयस्कर व्यक्तीचा आवाज परत आला.  आणि सगळे बाजूला झाले. त्यांनी प्रेमाने त्यांना विचारलं,
"पोरांनो कोण रं तुम्ही? आणि इकडं काय करत होतात? आणि तुमची गाडी कशी काय घसरली. नाही म्हणजे इकडे तस तुमची दुचाकी घसरण्यासारखं काहीच नाहीय म्हणून म्हटलं."

"माहिती नाही ओ काका, आम्ही इथून जात होतो, तर अचानक मध्ये काहीतरी आलं आणि म्हणून जोरात ब्रेक दाबला. त्यामुळे बाईक स्लिप झाली." निखिल म्हणाला. कारण अभयकडे बघून वाटत नव्हतं कि तो काही बोलेल म्हणून त्यानेच सांगून टाकलं. अभयने नुसतं मुंडक हलवलं.

"बरं, पण कुठल्या गावचं आहात तुम्ही. ह्या गावचं तर नाही वाटत." त्यांनी विचारलं.

"आम्ही पलीकडे शहरात राहतो. इकडे असंच फिरायला आलो होतो" निखिलने सांगितलं.

"बरं असं करा, थोडावेळ तुम्ही इथंच आराम करा. म्हणजे थोडं बरं वाटेल तुम्हाला. आणि मग जा तुमच्या प्रवासाला. थांबा माझ्या नातीला बोलावतो मी, ती डॉक्टरकीचं शिकतेय. तुम्हाला मलमपट्टी करेल म्हणजे तेवढाच आराम तुम्हाला." असं म्हणून त्यांनी राम्याला तिला बोलवायला सांगितलं.

अभयच हृदय अजून धडधडतंच होतं. ते का धडधतंय ते त्याला लवकरच कळलं. राम्या त्यांच्या नातीला घेऊन आला आणि अभय पाहतच राहिला. कारण ती तीच होती जिच्या साठी त्याच्या हृदयाने धडधडायला सुरुवात केली होती. तिला बघितल्यावर त्याला काय करावं काहीच सुचेना. तो आपला भान हरपून तिच्याकडे पाहत होता. त्या धुंदीतच तो उठून उभा राहिला. तेव्हा निखिलला आपला ऍक्सीडेन्ट का झाला त्याचं कारण कळालं. 
एवढा वेळ लंगडणारा अचानक कस काय उठून उभा राहिला म्हणून सगळे दचकलेच. अभयचं लक्ष नव्हते कोणाकडेच. ह्या सगळ्याचा विसर पडला होता त्याला. तो फक्त तिलाच पाहत होता.

ती एखाद्या हवेच्या झुळकीप्रमाणे त्याच्याजवळ आली. त्याच्यासमोर येऊन उभी राहिली. तिच्यात काहीतरी असं खास होतं. ते अभय तिच्या डोळ्यांत पाहत होता. तोच  मनमोहक चेहरा, तेच गहिरे डोळे, तेच सौंदर्य. अभय तिच्या त्या डोळ्यांत  खोलवर बुडाला होता. बाकी त्याला काही आठवतंच नव्हतं ह्या क्षणी. ती आणि तो. सगळं अंधुक झालंय असं वाटत होतं. आणि आता तिच्या जवळ येण्याने त्याच हृदयहि धडधडायचं थांबलं होत. नव्हे सगळंच थांबलं होतं. चालू होतं तर फक्त नजरेचा संवाद. त्या दोघांच्या. एखाद्याच्या नजरेत हरवून जाणं काय असतं हे अभय त्या वेळेस अनुभवत होता.

"ऋतू" त्या आवाजाने अभय भानावर आला. आणि तशी तीसुद्धा वरमली. क्षणभर त्याला रागच आला. पण त्यांची ती नात आहे हे लक्षात येऊन तो वरमला आणि पटकन बाजेवर बसला. त्याची ती फजिती बघून ती खुद्कन हसली.

"बेटा, बघ ह्यांना जास्त लागलंय का? त्यांची पट्टी वगैरे कर बरं " असं सांगून ते निघाले. त्यांच्यासोबत बाकीची मंडळी सुद्धा निघाली. निखिलला तेवढंच बरं वाटलं. नाहीतर मघापासून तो नुसता घुसमटत होता त्या गर्दीमध्ये. इकडे त्यानेसुद्धा त्या मुलीला ओळखले आणि पुढे काय होणारे ते पाहू लागला.

" हो अण्णा." तिने हो म्हणून मान डोलावली. राम्या सोबत तिचा फर्स्टएड चा बॉक्स घेऊन आलेला. तो घेऊन ती अभयच्या जवळ बसली. तिने अभयचे पूर्ण निरीक्षण केले, कुठे आणि किती लागलाय ते बघितलं. आणि डेटॉल ने त्याची जखम पुसायला घेतली.

अभय तर सातवे असमानपर होता. त्याला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. सकाळपर्यंत जिच्यासाठी तो व्याकुळ झालेला, आता तीच त्याच्या जवळ बसून त्याला झालेल्या जखमेवर मलमपट्टी करत होती. तिच्या स्पर्शाने आतून तो खूप सुखावला होता. आपलं नशीब किती भारीय, म्हणून मनोमन खुश झालेला. निखिल तर फक्त त्याची मज्जा बघत होता. ती काही एक न बोलता फक्त आपलं काम करत होती. तिचं अभयकडे लक्ष नव्हतं, पण  अभयने एक सेकंद सुद्धा तिच्यावरून नजर हटवली नव्हती. एव्हाना तिच्या हे लक्षात आलं असणार. म्हणूच तिने त्याची जखम बांधून झाल्यावर त्याच्या कडे फक्त एक तिरपा कटाक्ष टाकला.

"खरचटलंय खूप तुम्हाला, मी मलमपट्टी केलीय त्यावर. थोडावेळ आराम करा तुम्ही इथेच. एक पेनकिलर देते तुम्हाला मी." ती म्हणाली.

"हो" अभय कसातरी म्हणाला. त्याच्या तोंडून तो आवाज एवढा विचित्र निघाला कि ते ऐकून ती हसायलाच लागली. निखिलपण हसत सुटला त्याला बावचळलेला बघून. 

तिने आपला मोर्चा निखिलकडे वळवला. त्याला फारसं काही लागलं नव्हतं. पण डोक्याला आलेल्या टेंगळामुळे तो एकदम कार्टून वाटत होता. 

" तुम्हाला फारसं काही लागलेलं दिसत नाहीय, त्यामुळे काही मालमपट्टीची आवश्यकता नाहीय. एक पेनकिलर देते तुम्हाला. ती खा म्हणजे मुकामार जर लागला असेल कुठे तर जास्त ठणकणार नाही." असं म्हणून तिने त्याला एक गोळी खायला दिली. 


"तुम्ही दोघेही आराम करा थोडावेळ इथे आणि मी सांगितल्याशिवाय जाऊ नका. ओके." असं म्हणून ती जायला निघाली. पण काहीतरी आठवलायसारखं करून तिने अभयकडे बघितलं आणि म्हणाली,

"तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. आठवत नाही कुठे पण असं वाटतंय आपण कुठेतरी भेटलोय याआधी." 

अभय दचकलाच. च्यायला, हिला कसं माहिती आपण? त्यादिवशी हिने बघितलं कि काय आपल्याला आपण तिच्याकडे बघत होतो तेव्हा. म्हणून तर हि विचारत नसेल ना ?

"नाही, मला नाही वाटत आपण कधी भेटलो असेल." अभय पटकन म्हणाला. 

"हा असेल कदाचित. पण मला मनापासून असं वाटतंय कि आपण भेटलोय पहिले" ती आठवायचा प्रयत्न करत म्हणाली" जाऊ दे, नाही आठवत. बरं  तुम्ही आराम करा. मी येते." असं म्हणून ती निघाली. 

"एक्सक्यूज मी मिस... आपलं नाव? नाही म्हणजे तुम्हाला थँक यु म्हणायचं आहे. पण तुमचं नाव नाही माहिती ना. तुम्ही आम्हाला ओळखत सुद्धा नसताना आम्हाला एवढी मदत केलीत. आम्हाला एवढं काळजीने ट्रीट केलात, त्याबद्दल खरंच खूप मनापासून आभारी आहोत आम्ही." अभयला तिला जाऊ द्यायचं नव्हतं म्हणून तो वेळ काढत होता. 

"ऋतिका माझं नाव आणि काही थँक्स वगैरे म्हणायची काही गरज नाहीय एवढी प्लिज हा. कारण माझं ते कर्तव्यच आहे एक प्रकारे. अशावेळी मदत केली तरच मी एक चांगली डॉक्टर होऊ शकते ना. मी जर ओळखी अनोळखी करत बसले तर ते शक्य नाही ना " तिने आपलं नाव सांगून अभयला कारण स्पष्ट केलं. 

"नाईस नेम आणि स्वभावही खूप छान आहे तुमचा. बरं वाटलं तुम्हाला भेटून." अभय म्हणाला. 

"हो. गप्पा नंतर मारुयात आता तुम्ही अराम करा पाहू. मलाही अभ्यास करायचा आहे.  टेक केअर. रामू ह्यांना बघ काय हवं ते." ऋतिका रामूला त्यांच्याकडे लक्ष द्यायला सांगून गेली. 


अभय आणि निखिलने रामूला काही नको म्हणून सांगून त्याला घालवून दिला. निखिलने अभयकडे बघितले. आपल्या जिवलग मित्राच्या चेहऱ्यावरचं हसू बघून त्याला खूप बरं वाटलं. खूप दिवसांनी त्याला असं हसताना पाहून छान वाटलं. 

"अभ्या, लेका मी आहे कि रे इथे. असा काय हसतोय एकटाच? का ती भेटली म्हणून विसरला लगेच आपल्याला?" निखिल त्याच्याकडे पाहत म्हणाला. 

" नाय रे तुला नाही विसरत मी एवढ्यात. साल्या तुझ्याशिवाय आहे कोण मला. निख्या ती भेटली आज मला. बघ तुला म्हटलं होतं ना, ती आज भेटेल म्हणून. खरंच आज खूप खुश आहे मी. खूप खुश. ऋतिका भेटली आज माझी" अभय फक्त उड्या मारायचा बाकी होता. आता जर त्याला लागलेलं नसतं आणि ते लोक तिकडे नसते तर त्याने एवढ्यात नाचायला पण सुरवात केली असती. 

"हो माहितीय अभ्या. बघ तू एवढे दिवस ती तिच्यासाठी तरसत होतास आणि आज शेवटी ती स्वतःहूनच भेटली तुला. तुझी ऋतिका. नाव आणि स्वभाव पण खूप छान आहे पोरीचा. म्हणजे आपल्याला ओळखत नसताना पण तिने एवढं केलं आपल्यासाठी" निखिल म्हणाला. 

" हा निखिल. म्हणजे माझी चॉईस चुकीची नसणार हे माहिती होतं मला." अभय कौतुकाने म्हणाला. 

" हो बरोबर. अपने भाई कि चॉईस है, गलत कैसे होगी" निखिलने मान हलवली आणि मघाची घटना आठवून म्हणाला " नाहीतर आज आपलं काही खरं नव्हतं लेका. तू लंगडा आणि माझं टकलं  फुटलं असतं इकडेच. वहिनीने वाचवलं आपल्याला  " आणि हसायला लागला. 


                            निखिलपण खूष झालेला खूप त्याच्यासोबत. शेवटी आपल्या जिगऱ्याचं प्रेम त्याला भेटलं होतं. अभय तर जामच खुश झाला होता. कारण जिच्या भेटण्याची तो एवढी वाट पाहत होता आज ती अचानकच त्याला भेटली होती. निमित्त होतं ते झालेल्या ऍक्सीडेन्टचं. पण इतना तो चलता है ना यार. कारण कुछ पाने के लिए कुछ खोना तो जरूर पडता है. आणि तसंही देवाच्या मनात असणारच आज अभय आणि ऋतिकाला भेटवायचं. म्हणूनच देवाने आजचा दिवस नक्की प्लॅन केला असणार. म्हणूनच हे सगळं घडलं. खरंय, जेव्हा आपण एखाद्या गोष्टीसाठी तयार असलो कि, ती गोष्ट आपल्याला नक्की भेटते. काहीही कारण असू दे मग.  शेवटी ती गोष्ट आपल्या आयुष्यात नक्की येते. मग एखादी व्यक्ती असो, एखादी घटना असो किंवा आपलं प्रेम असो. नक्की भेटतं.....!


To be continued in Part 3...............