Search This Blog

Friday, March 5, 2021

अनोळखी हे प्रेम - Part 6


            

                               समोरच्या गार्डन मध्ये अभय, आजी आणि निखिल नाश्ता करायला बसले होते. आजी आणि अभयचं इकडचं तिकडचं बोलणं चालू होतं. इकडे निखिल आपल्याच विचारांत  गुरफटलेला होता. चिऊ आणि म्याऊ ची भानगड काय आहे हे निखिलला कळली नाही. तो आपला गुमान नाश्ता करत होता. कारण हि भानगड त्याला नवी होती. अभय ने त्याला ह्याबद्दल कधीच काही सांगितले नव्हते. त्यामुळे तो विचार करत होता कि, नक्की चिऊ आणि म्याऊ हे काय प्रकरण असेल. त्याला असं विचार करताना पाहून अभय म्हणाला,

"काय विचार करतोय रे निख्या एवढा?"

अभयचा प्रश्न येताच निखिलने अभयकडे पहिले आणि म्हणाला,

"अभ्या, हे चिऊ आणि म्याऊ काय लफडं आहे जरा सांगशील?"

निखिलच्या तोंडून चिऊ म्याऊ ऐकताच आजीने अभयकडे पहिले. तिला कळून चुकले कि अभय अजून त्याच्या चिऊला विसरलेला नाहीय. इतक्या वर्षांनी सुद्धा त्याची लहानपणीची चिऊ त्याच्या लक्षात आहे. क्षणभर तिला आपल्या नातवाचं कौतुक वाटलं. कारण आजकाल मुलं स्वार्थापलीकडली मैत्री ठेवत नाहीत. स्वार्थ संपला कि ते आपली मैत्री  विसरून जातात. तिथे अभयने आपल्या लहानपणीच्या मैत्रिणीला लक्षात ठेवले होते. निःस्वार्थपणे. त्यांचं प्रेम तिला माहिती होतं. 

"तुला रे कोणी सांगितलं हि चिऊ म्याऊची गोष्ट?" आजीने अभयकडे पाहत निखिलला प्रश्न केला. 

"काही नाही आजी, मघाशी अभयच्या कपाटात  एक फ्रेम बघितली. त्यात एक लहान मुलगा नि एक लहान मुलगी होती. तेच मी अभयला विचारलं कि हे कोण आहेत? तेव्हा अभय मला म्हणाला कि हे चिऊ आणि म्याऊ आहेत म्हणून. एवढंच माहिती आहे मला." निखिल म्हणाला. 

अभय आपला शांतच होता. कसल्यातरी विचारात गुरफटलेला. त्यामुळे तो काहीच बोलला नाही. नुसताच बघून हसला. आणि "येतो " म्हणून उठून गेला. ते पाहून आजीच पूढे म्हणाली,

"काही नाही रे. अभयची लहानपणीची मैत्रीण आहे चिऊ. १५ वर्षांपूर्वी आम्ही जेव्हा कोकणात राहायचो तेव्हा तिथे आमच्या शेजारीच राहायची. ह्या दोघांची छान मैत्री होती. पण नंतर अभयचे आई बाबा गेल्यानंतर आम्ही तिकडचे घर सोडले आणि इकडे आलो राहायला. तिकडच्या घरी आई बाबांच्या आठवणी  खूप होत्या त्याच्या. त्यामुळे त्याचं कशातच मन लागत नव्हतं. म्हणूनच मला त्याला घेऊन इकडे यावं लागलं. निदान नवीन ठिकाणी आल्यावर मागच्या अंधारातून तो बाहेर पडेल ह्या आशेने. आम्ही इकडे तर आलो पण त्याची चिऊ तिकडेच राहिली. घाईगडबडीत तिला भेटणं सुद्धा जमलं नाही त्याला. नंतर तिची आठवण काढायचा तो सारखी पण हळूहळू ती त्याच्या विस्मरणात गेली असं वाटलं मला. पण आज जेव्हा तो विषय निघाला तेव्हा कळलं कि तो अजून तिच्याच आठवणीत आहे.  "

निखिल ऐकत होता. आपल्या मित्राबद्दल त्याला खूप काही गोष्टी कळत होत्या. त्याला वाटायचं कि मी अभयला खूप ओळखतो, पण त्याला आता कळत होतं कि, आपण त्याला काहीच ओळखत नाही आहोत. 

 दोघांचं बोलणं झालं आणि तेवढ्यात अभय पण आला. मघासारखा तो मरगळलेला दिसत नव्हता आता. रिलॅक्स वाटत होता.  निखिल फक्त त्याच्याकडे पाहून हसला. काही म्हणाला नाही.
अभय स्वतःहूनच म्हणाला,

"चल निखिल, थोडं बाहेर फिरून येऊ. कंटाळा आलाय थोडा ट्रॅव्हल करून."

"अभय अरे आराम कर थोडा. नंतर जा बाहेर मग." आजी म्हणाली. 

"नको आजी. नंतर आल्यावर एकदमच आराम करेल निवांत." अभयने सांगून टाकले आणि ते दोघे निघाले. आजीदेखील काही बोलली नाही. तिला माहिती होतं तिचा अभय कसा आहे ते. प्रवासात कितीही थकला असला तरी बाईकने बाजूच्या टेकडीवर आणि तिथेच असलेल्या नदीवर जाऊन आल्याशिवाय तो घरी स्थिरावत नसे. 

              अभय आणि निखिल पार्किंग जवळ आले. तिकडे यायलाच त्यांना १० मिनिटे चालावं लागलं. कारण अभयच्या बंगल्याच्या एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे जायलाच १५ मिनिटे लागायची. त्यातल्या त्यात पार्किंग जवळ होती. निखिल फक्त अभयच्या मागून चालत होता. कारण त्याला अभयकडून खूप काही जाणून घ्यायचं होतं आणि तो ते त्याला एकदमच विचारणार होता. अभयला पाहताच बॉबी अंकल समजले कि, अभय त्याच्या रायडींगला चाललाय. त्यांनी लगेच पुढे येऊन तिथल्या एका नोकराला सांगून पार्किंग चे शटर उघडले. आणि निखिल पाहतच राहिला. तिकडे एकापेक्षा एक अशा भारीतल्या स्पोर्ट्स आणि क्रुजर बाईक्स उभ्या होत्या. आणि दुसऱ्या बाजूला लक्झरी कारचा खजिना होता. अभयने पूढे होऊन त्याची आवडती ब्लॅक मॅट कलरची हार्ले अँड डेव्हिडसन्स बाईक बाहेर काढली. सगळ्या बाईक्स आधीच व्ययवस्थित साफसफाई करून आणि सर्विस करून ठेवल्या होत्या. त्याची जबाबदारी बॉबी अंकल वर होती. कारण त्यांना माहिती होतं कि, अभय कधीही अचानक येतो आणि त्याला आल्यावर कुठली बाईक लागेल ते सांगता नाही येत. 

                  निखिल एक एक करत सगळ्या गाड्या न्ह्याहाळत होता. कारण ह्यातल्या बहुतेक गाड्या त्याने फक्त TV मध्येच बघितल्या होत्या. अभय बाईक घेऊन त्याच्या जवळ आला. तरी पण निखिलचं लक्ष नव्हतं त्याच्याकडे. कुठे तो आपण बघितलेला अभय होता. त्याच्याकडे असलेली ती खटारा स्प्लेंडर. तिच्यात तो कधीकधी आपल्याकडून घेऊन शंभरच पेट्रोल टाकायचा आणि कुठे हा अभय जो हार्ले अँड डेव्हिडसन्स घेऊन उभा आहे. दोघात किती फरक आहे साला. कुठे तो फिर हेरा फेरीचा राजू आणि कुठे हा प्रिन्स चार्ली. दोन्ही एकच आहेत. त्याचा अजिबात विश्वास बसत नव्हता. नक्की अभय काय कॅरॅक्टर आहे ते. सगळं मूवी मध्ये दाखवतात तसंच होतं अभयच्या बाबतीत. 

अभयने ते पाहून जोरात रेस केलं. तसा निखिल दचकला. अभय ते बघून हसायला लागला आणि निखिलला म्हणाला,

"दचकतोय काय येड्या. चल बस, तुला माझ्या आवडीच्या ठिकाणी नेतो."

"हो, पण हि बाईक कुणाची आहे आणि ह्या सगळ्या गाड्या कुणाच्या आहेत रे?" निखिलचं लक्ष अजून तिकडेच होतं सगळं. 

"भाड्याने आणल्यात साल्या. काय विचारतो तू पण. हि बाईक आपलीच  आहे आणि ह्या सगळ्या गाड्या पण आपल्याच आहेत." अभय म्हणाला. 

"साल्या अभ्या, आधी सांग च्यायला नक्की आहेस कोण बे तू?" निखिल म्हणाला. 

"सांगतो सगळं तुला, आधी बस तर. जिथे आपण जाणार आहोत तिकडे गेल्यावर सांगतो सगळं बाकीचं." 

"आज सगळं सांग बाबा, काही बाकी ठेऊ नकोस. आधीच हे सगळं बघून माझं डोकं गरगरायला लागलंय. नक्की आहेस तरी बाबा कोण तू?" निखिल त्याच्यासमोर हात जोडून मागे बसत म्हणला. 

"चल सांगतो आधी बस आणि घे हि बाईक चालव. मला जाम कंटाळा आलाय " असं म्हणून अभय मागे सरकला. 

"च्यायला नको रे पागल आहेस का, नको मला हि बाईक चालवायला. आधीच किती महाग आहे आणि काय झालं हिला तर माझ्याकडून तर आपल्याला काय झेपायच नाही खर्चाचं."

"अबे साल्या निख्या, बसतो का गुमान का घाऊ लाथ एक. आणि खर्चाचं काय घेऊन बसलाय सांगितलं ना जो मेरा है वो तेरा. बस गप्प आता आणि घे चालव. "

निखिल नाही होय करत बसला. कारण त्याने अशी बाईक कधी चालवली नव्हती. जास्तीत जास्त वडिलांच्या बुलेट वर हात साफ करायचा. पण अशी ऐश नव्हती कधी. विचार करत त्याने बाईक स्टार्ट केली आणि पहिला गियर शिफ्ट केला आणि स्मूथली रेस केलं. तशी बाईक पुढे झेपावली.  कारण हि हार्ले अँड डेव्हिडसन्स होती, अभयची ती जुनी खटारा स्प्लेंडर नव्हती. 


                           अभयच्या त्या बंगल्यातून बाहेर पडल्यावर अभय सांगेल तसा निखिल वळणे घेत चालला होता. थोड्या वेळाने ते दोघे एका टेकडीवर येऊन थांबले. तिथेच बाईक उभी करून थोडे वर चालत आले. आणि समोरचं दृश्य बघून निखिल स्तब्ध झाला. समोर एक नदी झोकदार वळणे घेत वाहत येत होती. आणि टेकडीच्या पायथ्याशी येऊन तिचा समुद्र झाल्यासारखा भास होत होता. कारण तिथून तिचं वळण नक्की कुठे आहे ते पहिल्यांदा पाहणाऱ्याला समजत नसे. नदीच्या आजूबाजूला खूप हिरवळ पसरलेली होती. मधेच पिवळी, लाल पानांची झाडे तिथलं सौंदर्य अजून वाढवत होती. पाण्यात लहान लहान बोटी रांगेने उभ्या होत्या आणि एखादीच पाण्यात फेरफटका मारायला निघालेली.  आणि समोर पसरलेल्या डोंगररांगात थोडीशी धुक्यात दडलेली हिरवळ तर काही औरच होती. एकूणच एखाद्या निसर्गचित्रात असतो तसा देखावा तिथे होता. 

                                     तिथेच पिवळ्या पानांच्या एका झाडाखाली  बेंच होता. तिथे येऊन अभय बसला होता. आणि समोरचं दृश्य न्ह्याहाळात होता. खूप दिवसांनी असं शांत बसलेला इथे येऊन.  निखिल अजून तिथेच उभा राहून गुंग झालेला. त्याला कालच्यापासून स्वप्नात असल्यासारखं वाटत होतं. कारण दोन दिवसापासून तो जे अनुभवत होता ते त्याने याआधी कधी अनुभवलं नव्हतं. कधी स्वप्नातसुद्धा बघितलं नव्हतं ते त्याच्यासोबत रिअल मध्ये घडत होतं. आणि त्याला ते सगळं अभयच समजावून सांगू शकत होता. म्हणून त्याने अभयकडे पाहिलं, तर अभय समोरच्या दृश्याकडे टक लावून पाहत होता. त्याच्या डोळ्यात हलकेच पाणी आलं होतं. ते पाहून निखिलला राहवलं नाही. आणि त्याने अभयला विचारलं. 

"अभय, सांग मला सगळं आता. नक्की काय आहे ते सगळं. तू कोण आहेस साल्या ? तुझी  फॅमिली वगैरे आणि ते चिऊ म्याऊ ची गोष्ट ते सगळं सांग स्टार्ट टू  एन्ड."
निखिलने सांगितले. 

"हम्म बरं सांगतो. बस इथे." असं म्हणून अभयने सुरुवात केली. 

"माझं नाव अभय देशमुख." 

"हो माहितीय रे, पुढे काय? पुढे सांग." निखिल काहीतरी इंटरेस्टिंग ऐकायला भेटेल या उद्देशाने ऐकत होता. 

"तू AD and Group of Companies चं नाव ऐकलं आहेस ना?" अभयने विचारले. 

"हो ऐकलंय रे, खूप मोठी इंटरनॅशनल लेवलची कंपनी आहे ती. पण तिचं काय मधेच आता."

"तिचा फुलफॉर्म माहितीय का तुला काय आहे ते?" अभयने परत विचारले. 

" नाय माहिती. पण हे सगळं तू काय सांगत बसलायस? मुद्द्याचं बोल ना."

"अरे बाबा तेच तर सांगतोय. तुलाच सगळं ऐकायचं आहे ना स्टार्ट टू एन्ड. ऐक ना मग."

"हो बरं बोल"निखिल वैतागला. 

"तर AD & Group of Companies फुलफॉर्म आहे ABHAY DESHMUKH & Group of Companies. " 

"काय बोलतोस???????" निखिल एकदम आश्चर्यने उद्गारला " म्हणजे ती कंपनी तुझी आहे. म्हणजे तू त्या कंपनीचा मालक आहेस?"

"हो, I am the owner of AD & Group of Companies " अभय सहजपणे म्हणाला आणि शांत नजरेने निखिलची काय प्रतिक्रिया येते याची वाट पाहू लागला. पण निखिल अजून शॉक मध्येच होता. त्याच्या डोळ्यांसमोरून लगेच मागचा सगळा फ्लॅशबॅक तरळून गेला. आपल्यासोबत राहिलेला अभय इतका श्रीमंत असू शकतो आणि तो एवढ्या मोठ्या कंपनीचा मालक असू शकतो हे त्याला कधीच वाटलं नव्हतं. हा अभय तोच का ह्याच्यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. 

"आम्ही अगोदर कोकणात राहायचो. तिथेच माझ्या बाबांनी हा बिझनेस चालू केला. आजीचं खूप मार्गदर्शन होतं त्यांना.  त्यांनतर लग्न झाल्यावर माझ्या आईने सुद्धा त्यांना त्यांच्या बिझनेसमध्ये खूप मदत केली. दोघांनी खूप मेहनतीने हा बिझनेस खूप वाढवला आणि इंटरनॅशनल लेवल ला पोचवला. त्यातच माझा जन्म झाला.  थोड्या दिवसांतच हा बिझनेस इतका वाढला कि, त्यामध्ये अनेक कंपन्यांचे ग्रुप्स ऍड झाले. माझ्या जन्मानंतर हा बिझनेस आणखी वाढला म्हणून बाबांनी त्यांच्या कंपनीचं नाव माझ्या नावाने ठेवलं. खूप छान चाललं होतं. सगळं सुरळीत  होतं. सगळे खूप आनंदात होते. पाहिजे ते सुख होतं. श्रीमंती अफाट होती. कशाचीच कमी नव्हती. नोकर-चाकर, पैसा, गाड्या, बंगले खूप होतं. पण म्हणतात ना सगळं सुखात चाललेलं असताना काही ना काही अघटित घडतंच. तसंच झालं आमच्या बाबतीत. ह्या सुखाला कुणाची तरी नजर लागली बहुतेक. एके दिवशी आई आणि बाबा एका बिझनेस मिटिंग वरून येत असताना त्यांच्या गाडीचे ब्रेक्स फेल होऊन त्यांचा ऍक्सीडेन्ट झाला. त्यातच माझे आई बाबा मला सोडून गेले." अभयच्या डोळ्यात आई बाबांच्या आठवणीने पाणी आले. तो थांबला. निखिलसुद्धा काही बोलला नाही. त्याने फक्त अभयच्या खांद्यावर सांत्वनाचा हात ठेवला. 

थोड्या वेळात अभय पुढे सांगू लागला,
" त्यानंतर एवढा मोठा बिझनेस सांभाळणार तरी कोण? कारण मी खूप लहान होतो त्यावेळेस. ७-८ वर्षांचा असेन. मागेपूढे हि कोणी नव्हतं. अशा वेळी विश्वासातलं कोणीतरी हवं होतं. आजीने मग माझी आणि बाबांच्या बिझनेसची सगळी जबाबदारी स्वतःवर घेतली. बाबांचे एक जवळचे आणि विश्वासू असे बॉबी अंकल त्यावेळेस आजीच्या मदतीला आले. त्यांनी आजीला खूप मदत केली. एवढा मोठा माणूस तो. अनुभव खूप बिझनेसचा. बाबांच्या  बिझनेसच्या  सगळ्या गोष्टी आणि एक एक बारकावे त्यांना माहिती. पण त्यांनी कधी विश्वासघात नाही केला त्यांचा. ते गेल्यानंतर देखील ते इथेच राहिले. आजींना मदतीला. विरोधकांनी त्यांना खूप आमिषे दाखवली पण त्यांनी सगळं नाकारलं आणि ते आमच्यासोबतच लॉयल  राहिले. त्यांनी कधीच मोठेपणा नाही केला. 

                  नंतर मग आम्ही तिथून शिफ्ट झालो आणि इकडे या शांत ठिकाणी आजीने घर घेतले. आजीने मला एकदम साध्या शाळेत घातलं शिकायला. कारण तिला माहित होतं कि, इथल्या साध्या मुलांसोबत राहून मी सुद्धा साधं राहिलं पाहिजे. असलेल्या श्रीमंतीचा गर्व नाही झाला पाहिजे मला कधी. कारण आजीचा अट्टाहास होता कि, मी सगळ्यांत आधी माणुसकी शिकली पाहिजे. पैशांपेक्षा माणुसकी जास्त किमती आहे. म्हणूनच माझ्या अंगी कधी पैशाचा माज नाही चढला. आकाशात राहून देखील जमिनीवर कसं राहायचं हे आजीने मला शिकवलं. अशातच मी माझं शाळा आणि कॉलेजचं शिक्षण पूर्ण केलं. त्यातच तूझी आणि माझी मैत्री झाली. आणि तुला घेऊन आज इकडे आलो. कारण कि, तू माझा एकच असा मित्र होता, ज्याला मी माझी असली ओळख सांगू शकत होतो. कारण जो मला, माझ्याकडे काहीच नसताना साथ देऊ शकतो, त्याला मी  माझ्या कडे सगळं असताना कधीच एकटं सोडू शकणार नव्हतो. कारण तुला मी आधीच सांगितलं कि, माझी अशी माणसं खूप कमी आहेत ह्या जगात आणि त्यांना मला गमवायचं  नाहीय."

 असं बोलून अभय शांत झाला. निखिल आपली मान  डोलावत त्याच्या कडे बघत होता. कारण नक्की त्याला प्रतिक्रिया द्यायची ते काळात नव्हते. तो आपला अभयला स्माईल देत होता. 

"आणि ते चिऊचं सांग कि." अभय काही बोलत नाहीय हे पाहून निखिल म्हणाला. 

"ह्म्म्म सांगतो."अभयने निखिलकडे पहिले  आणि पुढे सांगू लागला. 

"मी लहान असताना आमच्या शेजारी माझ्याएवढीच एक लहान मुलगी तिच्या घरच्यांसोबत राहत होती. जास्त श्रीमंत नसले तरी घरंदाज घराणं होतं त्यांचं. आमची शाळा एकच. माझी अन् तिची काय ओळख नव्हती सुरुवातीला. तेव्हा अगदीच लहान असल्याने ओळख वगैरे करून घेणे असलं काही जमत नव्हतं. पण का माहित नाही, तिला पाहिलं किंवा ती कुठे जवळपास असेल तर मला ते नक्कीच जाणवायचं. असं वाटायचं कि ती जवळपास आहे कुठेतरी. आणि ती तिथेच कुठेतरी असायची. असं का होत असेल हे कळण्याएवढं वय नव्हतं माझं. 

       शाळा एकच आणि जायचा यायचा रस्ताही एकच असल्याने झाली  ओळख. असंच एकदा शाळेत चालत जात असताना कोणीतरी रडत असल्याचा आवाज आला. मी इकडे तिकडे पहिले, पण कोणीच दिसलं नाही. मग थोडं पुढं गेल्यावर एका झाडाखाली एक मुलगी रडत बसली होती. जवळ जाऊन बघितलं तर तीच होती. ओळख नसल्याने काय बोलू काही कळलं नाही. फक्त तिच्या पुढे जाऊन उभं राहिलो आणि ती शांत होण्याची वाट  बघू लागलो. एवढ्या सकाळी सकाळी हि का रडतेय हेच कळत नव्हतं मला. जेव्हा तिचं माझ्याकडे लक्ष गेलं, तेव्हा ती रडतच माझ्याकडे बघून तिच्या चिखलात फसलेल्या बुटाकडे बोट दाखवू लागली. मी तिच्या  एका फसलेल्या बुटकडे आणि तिच्या पायातल्या दुसऱ्या बुटाकडे बघितले आणि हसायला लागलो. कारण तिचा एक बूट चिखलात फसला होता म्हणून ती रडत होती एवढा वेळ. मला हसताना पाहून तिने रागानेच माझ्याकडे बघितले आणि जोरात ओरडली,

"हसतोस काय तू बावळट. बूट काढून दे मला शाळेत जायला उशीर होतोय."

तिने तरतरीत शब्दांत सरळ ऑर्डर सोडली मला. आणि मी देखील काही न बोलता गुपचूप तिला चिखलात फसलेला बूट काढून दिला. तशी तिची कळी खुलली आणि तिच्या त्या गोड चेहऱ्यावर हसू  उमटले.  हसताना किती छान दिसत होती. मी तिच्याकडेच पाहत होतो तेव्हाही. 

"थँक यु हा." असं म्हणत ती उड्या मारायला लागली तिथेच. आणि तिचा आनंद साजरा करून झाल्यावर मग ती मला तिच्या सोबतच घेऊन शाळेत गेली. एवढ्या वेळामध्ये मी तिच्याशी काहीच बोललो नव्हतो. फक्त माझ्या युनिफॉर्म वरून मी तिच्याच शाळेतला आहे, हे समजून तीने मला आपल्यासोबत नेले.  अशा प्रकारे आमची पहिली ओळख झाली तेव्हा. 

      मला सोडायला बॉबी अंकल यायचे गाडी घेऊन. पण तिच्यासोबत जाता यावं म्हणून मी त्यांना म्हटलं कि, तुम्ही नका येऊ मी जाईन चालत शाळेत. घरी आई आणि बाबांना देखील सांगितलं. त्यांनी कारण विचारल्यावर त्यांना, सकाळी सकाळी चालत गेलेलं चांगलं असतं शाळेत. आमच्या मॅडमनी सांगितलं आम्हाला. असं काहीतरी खोटंच कारण सांगितलं. आणि तशीही शाळा काही जास्त लांब नव्हती. घरापासून अर्धा किलोमीटर पण नसेल. कसंतरी समजावून मी चालत जायची परमिशन घेतली. पण तरीदेखील बॉबी अंकल यायचेच मागाहून. 

             रोज ती तिथेच थांबायची झाडाखाली माझी वाट बघत आणि मी आलो, कि मग आम्ही दोघे मिळून शाळेत जात असू. हळूहळू आमची खूप छान मैत्री झाली. ती मला खूप आवडू लागली होती. त्यापेक्षा जास्त तिच्यावर प्रेम करू लागलो होतो. कळत तर काही नव्हतं पण तिच्यासाठी सगळं करू वाटायचं. काय माहिती नाही काय जादू होती तिच्यात. तिच्याशिवाय मला चैन पडत नसे. मला प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळेला ती हवी असे. तिचंदेखील माझ्याशिवाय पान हलत नसे. आमच्या दोघांची अशी काही केमिस्ट्री जुळली होती कि, आमच्या दोघांचं एकमेकांशिवाय काहीच काम होत नसे. आणि आम्ही तिसऱ्या कुणाला आमच्यात घेतही नव्हतो. अभ्यास करताना एकत्रच अभ्यास करायचो नेहमी. आम्ही दोघेही हुशार होतो, पण ती थोडी जास्तच हुशार होती माझ्यापेक्षा. त्यामुळे कधी कधी मी माझा अभ्यास तिच्यावरच टाकायचो. काही खाऊ आणला किंवा तिच्या घरात काही बनलं छानपैकी तर ती सगळ्यात आधी मला घेऊन यायची. मला भरवून मगच ती खायची. मीसुद्धा काही चॉकलेट वगैरे असेल तर आधी तिला द्यायचो मगच मी खायचो. खूप बडबड करायची. सारखा चिवचिवाट असायचा  माझ्या मागे तिचा नेहमी. आणि महत्वाचं म्हणजे तिला चिमणीदेखील खूप आवडायच्या. म्हणून मी तीच नाव 'चिऊ' ठेवलं होतं. आणि माझं नाव तिने 'म्याऊ' ठेवलं होतं. कारण मी सारखा मांजरींसोबत खेळायचो म्हणून. 

                 अशी आम्ही आमची नावे ठेवली होती. एकमेकांना मॅचिंग. लहानपणीची ती निरागस मैत्री खरंच खूप ग्रेट होती. मस्त चाललं होतं आमचं. तिच्या प्रत्येक गोष्टीवर माझा हक्क आणि माझ्या प्रत्येक गोष्टीवर तिचाच अधिकार. एवढ्या लहान वयात पण असं वाटायचं कि, तिची सोबत  कधीच सुटू नये. अशीच नेहमी ती माझ्यासोबत राहावी. कायमची. होतीच तशी ती. आमची मैत्री माझ्या आणि तिच्या घरी देखील माहिती होती. त्यांनादेखील हेवा वाटायचा आमचा. माझी आजी नेहमी म्हणायची, असेच राहा रे पोरांनो सोबत नेहमी.  एकमेकांची साथ सोडू नका. कारण हल्लीच्या काळात अशी निःस्वार्थ  मैत्री हरवत चाललीय. खरंच आमची मैत्री देखील अशीच होती निःस्वार्थ. कसलाच स्वार्थ नाही. फक्त एकमेकांसाठी सगळं काही करायचा निरागसपणा होता. 

              पण एकमेकांशिवाय कधीच न राहू शकणारे आणि एकमेकांपासून कधीच वेगळे नाही होऊ शकणारे  आम्ही अचानक वेगळे झालो. आणि तेही अशा परिस्थितीमध्ये कि, आम्हाला एकमेकांचा निरोप घ्यायला सुद्धा वेळ मिळाला नाही. आमची ती निःस्वार्थ मैत्री तिथेच अर्धवट राहून गेली. तो निरागसपणा  अर्ध्यात सुटून गेला." एवढं बोलून अभय शांत झाला.


                 एक प्रकारची शांतता पसरली होती तिथे. कारण अभय म्हणजे म्याऊ त्याच्या चिऊच्या आठवणीत बुडाला होता. आणि इकडे निखिल त्याची लहानपणीची लव्हस्टोरी ऐकून विचार करत होता कि आता पुढे काय करायचं. 

"मग पुढे काय झालं? म्हणजे नंतर ती  तुला कुठे भेटली नाही का? तिचा काही पत्ता नाही लागला का तुला?" निखिलने अभयला त्याच्या आठवणीतून बाहेर काढले. 

"नाही ना यार निख्या. आम्ही इकडे आल्यावर मला तिची खूप आठवण यायची. सारखं मन बेचैन व्हायचं. तिची एवढी सवय झाली होती कि मला  खूप दिवस उदास वाटत होतं. एकावेळेस माझी जिवाभावाची दोन्हीकडली माणसं गमावली होती. इकडे आईबाबा आणि तिकडे माझी जिवलग मैत्रिण. मला वाटलं होतं कि, आई बाबा नंतर तिचा खूप सपोर्ट होईल मला. पण तिच्यापासून देखील दूर आलो होतो मी. तेव्हा आजीने खूप सांभाळलं मला. ह्या सगळ्यातून तिनेच बाहेर काढलं मला आणि आयुष्याकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन  दिला. ते वय तरी काय होतं रे माझं. ७ -८ वर्षांचा असेल मी. ज्या वयात मुलांची खेळणी तुटतात त्या वयात माझी माणसं माझ्यापासून तुटली होती. त्यामुळे माझी अशी माणसं खूप कमी आहेत.  म्हणूनच मी आहेत त्यांना खूप जपतो. कारण आई बाबा आणि चिऊ नंतर मला कोणालाच आता गमवायचं नाहीय रे निख्या." अभयच्या डोळ्यात ह्यावेळेस पाणी होते. त्याच्या डोळ्यांत पाणी बघून निखिलला कससंच झालं. त्याच्या खांद्यावर हात ठेवत निखिल अभयला म्हणाला, 

"नको काळजी करू अभ्या, नाही जाणार सोडून कोणी तुला आता. मैं तो हमेशा तेरे साथ रहुंगा मेरे यार आणि तुझ्या चिऊला पण आपण नक्की शोधून काढू. डोन्ट वरी." निखिल त्याला समजावत म्हणाला. " नको जास्त विचार करुस अभ्या"

"हम्म..." अभय नुसता उद्गारला. 

"बरं मला एक सांग अभ्या. जेव्हा तुम्ही लोकं तिथून शिफ्ट झाले, त्यानंतर तुझ्या चिऊला तू कधी भेटला नाहीसच का? म्हणजे तिला कुठे बघितले तरी का?"

"नाही यार, इकडे आल्यावर जसं काय ती मागेच राहून गेली होती माझ्या आयुष्यात. परत ती कधी दिसलीच नाही मला. कुठे दिसली पण नाही. एकदा मी बॉबी अंकल सोबत आमच्या जुन्या घरी गेलो होतो, ते घर विकण्या संदर्भात. पण तेव्हा देखील ती दिसली नाही. मला अचानकच आठवलं म्हणून मी बघायला गेलो तर तिथे कोणीच राहत नव्हतं. म्हटलं जर ती असेल तिथे तर घर नको विकायला. पण ते घर कोणीतरी दुसर्याने विकत घेतलं होतं आणि त्यावेळी त्या घराला कुलूप होतं. जर कोणी असतं तर निदान त्यांच्या कडून काही माहिती तरी मिळाली असती. तो शेवटचा चान्स होता. पण काहीच नाही भेटलं हाती. तेव्हा वाटलं कि तिला परत भेटणं माझ्या नशिबात नाहीय."

"असं कसं नशिबात नाहीय साल्या. एवढी तुमची मैत्री होती आणि तुझं पहिलं प्रेम होतं ते. तुमचं मिलन मी घडवून आणणार बघ अभ्या. तुझे तेरे प्यार से अब मैं मिलाकर रहुंगा मेरे भाई." निखिल एकदम उठून उभा राहत म्हणाला. 

ते बघून अभयला हसायला आलं. 
"अबे ये नौटंकी. साल्या, ते सगळं ठीक आहे. पण तिला आपण शोधणार कशी?"

"कशी म्हणजे? तुझ्याकडे फोटो आहे ना तुमचा लहानपणीचा, त्याच्यावरून." निखिल म्हणाला. 

अभयला एकदम अक्षयकुमारच्या एका पिक्चरची आठवण झाली. त्यात पण असाच लहानपणीचा फोटो घेऊन शोध घेत होता. ते आठवून तो हसू लागला. 
"अरे निख्या, काय पण काय साल्या. लहानपणीच्या फोटोवरून कसं शक्य आहे तिला शोधणं."

"आहे रे अभ्या. माझ्याकडे एक आयडिया आहे.  हे बघ तुमच्या दोघांचा तो फोटो तू फेसबुक वरती टाकायचा खाली काहीतरी मस्त लिहून. बाकी सोशल नेटवर्किंग साईटवरती पण टाकू, म्हणजे जर कोणी तिला बघितलं असेल तुमच्या लहानपणी आणि ते तुमच्या दोघांना ओळखत असेल तर नक्की मदत होईल आपल्याला." निखिलने आपला प्लॅन सांगितला. 

"च्यायला निख्या तुझं डोकंपण एवढं चालतं होय. व्वा क्या बात है!" असं म्हणून अभय टाळ्या वाजवत हसू लागला. 

"हसतो काय अभ्या. बघ असं केलं तर नक्की भेटेल ती आपल्याला." निखिल म्हणाला. 

"कसं शक्य आहे निख्या सांग बरं हे. अरे तो आमचा लहानपणीचा फोटो आहे एकदम आणि तेव्हा तिथे कोणी जास्त राहत पण नव्हतं. त्यामुळे आम्हाला कोणी जास्त ओळखण्याचा प्रश्नच येत नाही आणि त्यावेळेस जर कोणी बघितलं असेलच तर कोणाच्या लक्षात राहणार आहे आताच्या घडीला." अभयने आपला डाऊट क्लिअर केला. 

" कसा रे एवढा हुशार असून काय फायदा तुझा फुकणीच्या. जरा दिमाग वापर ना साल्या. आजकाल अशाच ट्रिकचा वापर करून बिछडलेली  लोकं भेटायला लागलीत एकमेकांना. तुला अजून फेसबुकची पावर नाय माहित."

"हो पण..." अभयचं बोलणं मध्येच तोडत निखिल म्हणाला, 
"पण बिन काय नाय रे. एकदा करून तरी बघू. असा पण काही चान्स नाहीय वहिनीला शोधायचा. जर ह्याद्वारे सापडली वाहिनी तर तूच मला खांद्यावर घेऊन नाचशील."

"आणि जर नाही सापडली तर तसाच खांद्यावरून तुला खाली आपटीन." अभय म्हणाला. पण निखिलने त्याच्या चिऊला वाहिनी म्हटलेलं अभयला आतल्या आत आवडलं होतं. 

"नहीं भिडू. तुला बघ खांद्यावर घेऊन नाचवायला लावतो का नाय फक्त बघत राहा." निखिलने अभयला चॅलेंज केलं. 

"देखते है भाई." असं म्हणून अभयने हसत हसत चॅलेंज लावलं. काही का असेना पण त्याला मनातल्या मनात कुठेतरी आशा निर्माण झाली होती कि, चिऊ परत एकदा भेटावी म्हणून. निखिलचं काय खरं नाही, पण त्याच्या डोक्यात एकदा आलं म्हटल्यावर तो काही ना काही खटाटोप करून तिला शोधून काढणार हे अभयला माहिती होतं. 

"बरं चल आता निघायला हवं निख्या,जाम  भूक लागलीय. लवकर घरी जाऊयात आता. आणि खूप वेळ पण झालाय. आजी आपली वाट बघत असेल." अभय म्हणाला. 

"हो चल यार. मला पण जाम भूक लागलीय." असं म्हणून ते दोघेही टेकडी उतरू लागले. आता काही न बोलता निखिल गुपचूप मागे बसला, कारण त्याला आता विचार करायचा होता, पूढे काय करायचं त्याचा. 

               अभयने बाईक स्टार्ट केली आणि ते दोघे घराकडे निघाले. दोघेही आपल्या आपल्या विचारात होते. निखिल, चिऊ म्याऊला कसं एकत्र आणता येईल याच्या आणि अभय, कुठेतरी आपल्या चिऊला परत एकदा भेटता येईल याच्या. दोघांचा हि परतीचा प्रवास सुरु झाला होता पण एका नवीन सुरुवातीकडे वाटचाल होण्याआधीचा. 

             मागे बसून निखिलच्या मनात एक विचार चमकून गेला की, च्यायला अभयला जर त्या मुलीला बघून धडधडल्यासारखं होतं, तर तीच मुलगी नसेल ना चिऊ? त्याचवेळी त्याच्या डोक्यात एक नवीन प्लॅन आकार घेत होता.



To be continued in Part 7.....