Search This Blog

Friday, May 1, 2020

अनोळखी हे प्रेम - Part 4

                 
              फायनल एक्झाम झाली. आता पुढे मास्टर्स करायचं होतं पण रिझल्ट येईपर्यंत वेळ होता. पुढे काय करायचं हे अभयने आधीच ठरवलं होतं. पण निखिलला आपण शिकलो तेवढंच खूप झालं असं वाटत होतं. आता रिझल्ट लागला कि, काही असो पास किंवा नापास त्याला बिझनेस स्टार्ट करायचा होता स्वतःचा. म्हणून तो आपला मजेत होता. घरी वडिलांना सांगून त्याने तसं भांडवल जमवायला सुरुवात केली होती. थोड्याच दिवसात तो एक हॉटेल सुरु करणार होता हायवेला. सुरुवातीला छोट्या हॉटेलपासून सुरुवात करून मग पुढे त्याच मोठं रेस्टोरंट बनवायचं होतं त्याला. निखिलचा प्लॅन अभयला माहित होता. पण अभय पुढे काय करणार आहे याची त्याला काहीच आइडिया नव्हती.  अभयचा वेगळाच काहीतरी प्लॅन होता, पण काय होता ते त्याला कळत नव्हतं. मागे अभय म्हणाला तसं काहीतरी असेल आणि ते त्याच्या सोबत गेल्यावरच कळेल म्हणून निखिल जास्त विचार नव्हता करत त्या गोष्टीचा. अभय आता परत घरी जायच्या विचारात होता. पण अभयचं घर वगैरे कुठे आहे याची निखिलला काहीच माहिती नव्हती. त्याच्या माहितीप्रमाणे अभयचं कोणीच नव्हतं. पण हेच खरं सरप्राईझ होतं निखिलसाठी. 

        अभयने निखिलला कॉल केला आणि त्याला जवळच्या टपरीवर बोलावलं. निखिलला यायला वेळ लागेल म्हणून अभयने चहा मागवला आणि तो पीत पीत विचार करू लागला.
'ऋतिका. खरंच यार कोण असेल हि मुलगी. तिच्यासाठी आपलं मन एवढं झुरत होतं. तिला एकदाच बघून आपली विकेट पडली होती. आणि हे हृदयाचं तर वेगळंच आहे साला. ती जवळपास असली कि स्वतःहून धडधडायला चालू होतं. कुछ तो बात है. पण काय ते समजत नाहीय. ना तिला आपण कधी भेटलो अगोदर ना तिने आपल्याला कधी पाहिलंय. तरीसुद्धा आम्ही दोघे एकमेकांना खूप जुने ओळखत असल्यासारखं वागत होतो त्यादिवशी. नशिबाने त्यादिवशी आम्ही तिकडे गेलो आणि ती भेटली तिथेच. नाहीतर देव जाणे काय काय करायला लागलं असतं तिला शोधण्यासाठी. पण आता ती भेटलीच आहे, तरी पुढे काय? तिने स्वतःहून तिचा मोबाईल नंबर तर दिलाय पण साला आपणच नाही अजून फोन केला. इतके दिवस झाले फोन करेन म्हणतो पण साला भीती वाटते. काय करू? करू का आता कॉल? पण यार एवढे दिवस झालेत ती काय म्हणेल? ओरडेल का? मुर्खा एवढे दिवस लागतात का एक फोन करायला? असं काहीतरी म्हणेल?पण ती का असं म्हणेल? आपण तिच्या लक्षात तरी असू का? नाही. असं कसं लक्षात नसू. तिच्या डोळ्यांत मी ती ओढ बघितलीय. ती एक जुनी ओळख बघीतलीय. त्याशिवाय का तिने दिला आपला नंबर? कदाचित तीसुद्धा वाट बघत असेल आपल्या फोनची. असू दे चल. आता होउदे काहीही. करतो कॉल तिला'  विचार करत त्याने खिशातला मोबाईल बाहेर काढला. पण अरे नंबर कुठाय? अरे देवा! असं म्हणत तो शोधायला लागला. खिसे चाचपडले. शेवटी पाकिटात घडी करून ठेवलेली तीन दिलेली ती चिट्ठी मिळाली. त्यातला नंबर डायल करत असताना त्याला तिने ती चिट्ठी देण्यासाठी केलेली धडपड आठवली आणि त्याला हसू आले. रिंग वाजून वाजून फोन कट झाला. परत एकदा अभयने ट्राय केलं. परत तेच. दोन वेळा फोन केला पण तिने उचलला नाही  म्हणून अभय मनातल्या मनात थोडा खट्टू झाला. काहीतरी कामात असेल किंवा अभ्यास करत असेल म्हणून तिचं लक्ष नसेल असं म्हणून स्वतःची समजूत काढत फोन खिशात ठेवला.


     एवढा वेळ झाला तरी निखिल कसा आला नाही म्हणून त्याने निखिलला फोन करायला घेतला तर तोच मागून निखिलने त्याला आवाज दिला.

"अभ्या.. "

 त्याचा आवाज ऐकून अभयने मागे बघितले तर निखिल तिथेच उभे राहून सिगारेटचा धूर सोडत होता. अभयने आश्चर्याने त्याच्याकडे बघितले.

"काय रे निख्या कधी आलाय तू? मला वाटलं अजून तू कसा आला नाहीस म्हणून तुलाच फोने करणार होतो मी." अभय म्हणाला.

"अबे साल्या, मला  येऊन अर्धा तास झाला इथे. तुझंच लक्ष नाहीय." निखिल म्हणाला.

"काय बोलतोस? मग मला नाही दिसलास आलेला ते?" अभयने त्याला विचारले.

"हो ना. अरे कसं दिसणार ना तुला. आमच्या वाहिनीसाहेबांच्या विचारात होतास ना तू." निखिल म्हणाला.

"हा बरं बरं. असू दे."

"काय विचार करत होतास रे एवढा साल्या."

"काय नाही रे. तिने दिलेला नंबर वर फोन केलेला मी आता. तेच करू का नको हा विचार करत होतो. खूप दिवस झाले तिला भेटलो नाही. म्हणून निदान फोन तरी करून बघावा म्हणून ट्राय करत होतो " अभयने सांगितलं.

"म्हणजे तू अजून कॉल नव्हता केलास तिला?" निखिलने प्रश्न केला.

"नाही म्हणजे जमलं नाही रे करायला." अभय म्हणाला.

"काय? अबे चुत्या आहेस का तू? साल्या एवढे दिवस झाले तुला तिने नंबर देऊन आणि तू आज कॉल करतोय तिला. आणि वरतून सांगतोय जमलं नाही म्हणून" निखिल रागात म्हणाला.

"हो अरे, विचार करत होतो करू कि नको ते" अभय आपला काय बोलायचं म्हणून बोलला.

"वा भाऊ, धन्य आहेस लेक तू. माझ्यासारखा असता तर त्याच दिवशी घरी पोचल्या पोचल्या पहिला फोन तिला केला असता. ती तिकडे वाट बघत बसली असेल तू फोन करशील तिला म्हणून आणि तू फुकणीच्या इकडे विचार करत बसलाय फोन करू का नको म्हणून."

"तस नाही रे निख्या, पण मला भीती वाटत होती तिला फोन करायची. म्हणून नव्हतो करत."

" कसली भीती रे साल्या? तिने स्वतःहून सांगितलं नंबर देऊन कॉल कर म्हणून आणि तू भितोय. गजब आहेस लेका तू."

"अरे हो. पण आज केलेला ना कॉल पण तिनेच नाही उचलला."

"हो. मग थोड्या वेळाने परत कर ना"

"हा करतो."

"कर पण नक्की. " निखिल म्हणाला "
  
       अभय अजून विचारात होता. त्याला तसं बघून निखिल परत म्हणाला,
"एक काम कर आता परत एकदा कर कॉल. बघू उचलते का ते."

      अभयने लगेच तिचा नंबर डायल केला.रिंग वाजत राहिली. यावेळी पण ऋतिकाने फोन नाही उचलला. अभय हिरमुसला. ते बघून निखिल म्हणाला,
"परत बघू करून नाहीतर जाऊन येऊ तिकडे, जिथे लास्ट टाईम भेटली होती तिकडे."

"हो चालेल." अभय म्हणाला.

"बरं सांग मला का बोलावलंय आज अचानक?"

"हा. मी म्हटलं होत तुला आठवतंय का, कि आपली एक्झाम झाल्यावर तुला माझ्यासोबत यायचं आहे म्हणून."

"हो . त्याचं काय? आताच जायचं आहे का?

"आता नाही. आपला रिझल्ट लागला कि जाऊयात दुसऱ्या दिवशी. कदाचित तुला थोडे दिवस राहावे लागेल माझ्यासोबत म्हणून घरी आताच सांगून ठेव म्हणजे काही प्रॉब्लेम नाही." 

"हा मग वेळ आहे ना त्याला. मला वाटलं आजच निघायचं म्हणतो कि काय? आणि घरचं टेंशन नको घेऊ तू. मी आधीच सांगून ठेवलंय अभयसोबत चाललोय म्हणून त्याच्या गावी. त्यामुळे ते नाही काय बोलणार मला."

"अच्छा बरं."

"हम्म.. आणि काय रे अभ्या काय सरप्राईझ आहे रे. तू बोलत होतास ते. म्हणजे तू ऋतिकाला पळवून वगैरे न्यायचा काय प्लॅन तर करत नाहीयेस ना?" निखिल संशयाने अभयकडे पाहत म्हणाला. "तू कसला पळवून नेशील फट्टू साल्या. साधा कॉल करायला एक महिना लावतोय" असं म्हणून निखिल हसायला लागला.

"अबे नाहि रे. हे असं करायची काही गरज नाही मला. वेगळा प्लॅन आहे माझा. फक्त तू ये माझ्यासोबत तुला कळेल आपोआपच" अभयने सांगितले.

"बरं ठीके बघू तेव्हाच मग."

         बोलत असताना अचानक अभयच्या फोनची रिंग वाजली. निखिल आणि अभय एकदमच फोनकडे बघायला लागले. नंबर अनोळखी होता. कारण ऋतिकाचा नंबर त्याने सेव्ह करून ठेवला होता मघाशीच. निखिलला वाटलं तिचाच आहे.

"काय रे तिचाच फोन आहे का?"

"नाही. तिचा नंबर सेव्ह आहे. हा दुसराच नंबर आहे कोणाचा."

"बरं बघ कोणाचा आहे मग" निखल म्हणाला.

    अभयने फोन कानाला लावला. तसा त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले आणि तो निखिलपासून थोडा लांब जाऊन उभा राहिला. पलीकडली व्यक्ती फक्त बोलत होती आणि अभय ऐकत होता. चेहरा तसाच स्थिर ठेवून त्याने सगळं ऐकून घेतलं आणि फोन कट केला. आणि परत निखिलजवळ आला. एकदम नॉर्मल होत त्याच्या बाजूला बसला.

"काय रे कोणाचा फोन होता? ऋतिकाचा ?"

"नाही." अभय थंड आवाजात म्हणाला.

"नाही ? मग कोणाचा होता" निखिल अभयकडे पाहत होता. कारण फोन ठेवला तरी अभयने काही सांगितलं नव्हतं.  

 "होता असंच जाऊदे ते. बोल तू" अभयने काहीच सांगितलं  नाही.

 "खरं सांग अभ्या, कोणाचा फोन होता आणि तू एवढा सिरिअस झालाय" 

"काय नाही. फक्त एवढं समज कि तुला सरप्राईज थोडं लवकरच मिळणार आहे, कारण आपण उद्या निघतोय."

"का? असं अचानक ? आणि नेमकं झालं तरी काय असं" निखिलने काहीतरी सिरिअस मॅटर आहे हे ओळखलं.

"सांगतो उद्या वाटेत जाताना. आता नको काही विचारूस" अभय म्हणाला. "चल निघुयात आता. उद्या सकाळी बॅग घेऊन ये. ७ वाजता भेट मला इथेच टपरीजवळ." आणि घाईघाईने निघून गेला.

     अभयला असं निघून गेलेला बघून निखिल काहीच बोलला नाही. कोणाचा फोन असेल? घरचा तर नसेल त्याच्या? पण तो अजून कधीच त्याच्या घरच्यांबद्दल काही बोलला नव्हता. इन फॅक्ट ते आहेत की नाहीत याबद्दलच त्याला डाउट होता. त्यामुळे हा फोन कोणाचा असेल आणि अभयला सिरिअस व्हायचं काय कारण असेल हे त्याला कळत नव्हतं. म्हणून आता उद्या तो काय सांगणार त्यावर सगळं अवलंबून आहे, असा विचार करून निखिल गप्प झाला . अभयला एवढं सिरिअस त्याने कधीच बघितलं नव्हतं याआधी. 


            दुसऱ्या दिवशी सकाळी निखिल बरोबर ७ वाजता टपरीजवळ हजर झाला. अभयला फोन करणार तेवढ्यात तो पण आला. कालचं टेंशन नव्हतं आज त्याच्या चेहऱ्यावर. उलट असा काही भाव होता चेहऱ्यावर त्याच्या, जो निखिल पहिल्यांदयाच बघत होता. जसं काय हा आपला अभय नव्हेच. त्याला असं बघून काय बोलणार एवढ्यात अभय जवळ पोचला त्याच्या.

"चल निघुयात. रेडी ना."

"हो. चल भिडू." निखिल म्हणाला

"चल." असं म्हणत अभय चालू लागला.

"अभ्या, साल्या काय चालत जायचं आहे का? बाईक कुठाय तुझी?" निखिलने त्याला तसेच चालत पुढे जाताना बघून म्हटले.

"आज बाईकने नाही जायचं. गाडीने जायचं." अभय गालातल्या गालात हसत म्हणाला.

"हो का? कुठल्या गाडीने जायचं रे साल्या? बस बीस ने मी नाही येणार पहिलेच सांगतोय." निखिल वैतागून म्हणाला. अभय तसाच पुढे चालत होता. थोडं पुढे आल्यावर टपरीजवळच्या बस स्टॉप वर येऊन थांबला. मागून निखिल त्याला शिव्या घालत येतंच होता.

          दोघेजण तिथे थांबल्यावर दोनच मिनिटात एक आलिशान पांढऱ्या रंगाची बीएमडब्ल्यू त्यांच्या समोर येऊन उभी राहिली. कारचा ड्रायव्हर उतरला आणि त्याने अभयला एक सॅल्यूट मारला. आणि दरवाजा उघडून उभा राहिला. निखिलला काहीच कळलं नाही. तो तसाच त्या ड्रायव्हर कडे आणि अभयकडे आलटूनपालटून बघत होता. नक्की काय चाललंय हेच कळत नव्हतं त्याला. हि एवढी आलिशान कार कोणाची आहे आणि हा ड्रायव्हर अभयला एवढा सॅल्यूट वगैरे मारून त्याच्यासाठी दार उघडून उभा आहे. क्षणभर त्याला वाटलं हे खोटं आहे, पण हे खरं होतं. त्याला तसा बघून अभय हसू लागला.

"निख्या. चल कि लेका बस लवकर."

निखिल तसाच त्याच्याकडे आश्चर्याने पाहत होता.

"अरे ये बघत काय बसलाय चल बस. म्हटलं होतं ना तुला कि आज बाईक ने नाही जायचं गाडीने जायचं म्हणून. आता बस चल लवकर." अभय गालातल्या गालात हसत म्हणाला.

" हो. मला वाटलं आपण बसनेच जाणार.  पण हे काय रे?हि कार कोणाची आहे? आणि हा ड्रायव्हर तुला सॅल्यूट वगैरे का मारतोय. काय गेम आहे अभ्या हा." निखिलला काहीच समजत नव्हतं काय चाललंय ते. 

"सांगतो सगळं तुला. आधी बस तरी गाडीमध्ये." असं म्हणून  अभयने त्याला गाडीत बसवले. "बॉबी अंकल ह्या बॅग घ्या प्लिज." असं सांगून अभयपण गाडीत बसला.

"होय छोटे मालक" म्हणून त्यांनी बॅग घेऊन मागच्या डिकीत ठेवल्या आणि आपल्या सीटवर येऊन बसले.

"चला छोटे मालक. मालकीणबाई आपली वाट बघतायत."

"हो बॉबी अंकल चला. पण जाताना आपल्याला मध्ये एका ठिकाणी थांबायचं आहे हा. सांगेन कुठे  ते."

"जी छोटे मालक." असं म्हणून त्यांनी गाडी स्टार्ट केली आणि ते निघाले. गाडी कधी स्टार्ट झाली आणि कधी चालायला लागली हे निखिलला कळलेदेखील नाही. एवढ्या आरामदायक गाडीमध्ये बसायची त्याची पहिलीच वेळ. वडिलांच्या अल्टो मध्ये तो फिरत आणि फिरवत होता पण एवढ्या आलिशान गाडीने पहिल्यांदाच. आणि ते हि अभयच्या. साधी बाईक असलेला अभय कधी पन्नास आणि शंभरच्या वरती त्याने पेट्रोल नाही टाकलं. त्याला हा बीएमडब्ल्यू चा ड्रायव्हर सॅल्यूट मारून छोटे मालक म्हणतोय, हे सगळं त्याच्या समजण्यापलीकडे होतं. म्हणून तर तो आणखीनच पेचात पडला कि नक्की भानगड काय आहे. आता फक्त तो अभय बोलण्याची वाट पाहत होता. 


      अभय निखिलची चलबिचल पाहून गालातल्या गालात हसत होता. शेवटी अभयने त्याला सांगायला सुरुवात केली.

"निखिल. तुला म्हटलं होतं ना कि एक सरप्राईझ आहे तुझ्यासाठी. चल तुला थोडक्यात सांगतो "

"हा, ह्याच्यापेक्षा पण आहे का अजून काय ?" निखिलने विचारले.

"लवकरच कळेल तुला ते. आपण माझ्या घरी पोचल्यावर."

"काय? तुझं घर ? तुला घर पण आहे का?"

"हो आहे. खूप लांब आहे पण इथून ते. आपल्याला एक दिवस लागेल पूर्ण तिकडे पोचायला."

"आणि घरचे?"

"आजी आहे फक्त" अभय हे सांगताना दुःखी झाला.

"हम्म." त्याचं असं बोलणं ऐकून निखिलने घरच्यांबद्दल काही आणखी विचारलं नाही.

"तुला कदाचित विश्वास नाही होणार पण मी सांगतो ते खरं आहे. माझे वडील एक बिजनेसमॅन होते. खूप मोठा फॅमिलीबिजनेस आहे आमचा. मी लहान असताना माझे आईवडिल एका कार ऍक्सीडेन्ट मध्ये गेले. तेव्हापासून आजीने मला सांभाळलं. आणि मी थोडा मोठा झाल्यावर मला शिक्षणासाठी इकडे पाठवलं. आजीने ठरवलं असतं तर तिने मला परदेशी पण पाठवलं असतं पण तिने नाही पाठवलं. कारण तिचा अट्टाहास होता कि मी इथेच शिकून मोठं व्हावं. आपल्या मातीमध्ये राहावं.  सामान्य माणसाचं जीवन काय असतं हे अनुभवावं. त्यांची सुखदुःखं समजावीत मला. त्यांचं जीवन कसं असतं हे जाणवावं.  आणि  सगळ्यांत महत्वाचं म्हणजे आजीने गरीब आणि श्रीमंतीचा भेदभाव माझ्या मनातून काढून टाकला. एवढी घरची श्रीमंती असून सुद्धा आजीला जरासुद्धा गर्व नव्हता त्याचा आणि तोच तिने मला कधीच होऊ दिला नाही. करोडो रुपयांची मालकी आहे पण आजीने दिलेल्या शिकवणीमुळे मी माझे पाय जमिनीवर ठेवू शकलो. आजीने दिलेल्या शिकवणीमुळे पैशांचा कधीच माज केला नाही. माणूस जाणायला शिकलो. पैशांपेक्षा माणूस मोठा आहे आणि त्याहीपेक्षा माणुसकी मोठी आहे हि आजीची शिकवण आहे. तेच शिकलो मी आणि इकडे राहून मला तुझ्यासारखा मित्रसुद्धा भेटला. तेच मी जर तिकडे राहिलो असतो तर कदाचित नसता भेटला. आणि जे काही शिकलोय आजवर, जे काही अनुभवलंय ते नसतं भेटलं. कारण पैसा तर खूप आहे रे पण तुझ्यासारख्या जीव लावणाऱ्या मित्रावर सगळं कुर्बान." अभय सांगत होता.

निखिल हे सगळं ऐकून शॉक्ड झाला होता. साला आपला मित्र अभ्या ज्याच्याकडे खायचे प्यायचे वांदे होते. तसली खटारा बाईक घेऊन यायचा तो आणि त्यात पण कधी शंभरच्यावर पेट्रोल नाही टाकलं कधी याने. कितीतरी वेळा मीच पेट्रोल टाकलंय याच्या बाईकमध्ये आणि हा साला एक करोडपती आहे. चहा प्यायला पण माझ्याच खात्यावर लिहून ठेवायचा. ट्रॅफिकवाल्याने पकडल्यावर पैसे जाऊ नये म्हणून मला बाईक चालवू देण्याची रिस्क घ्यायचा. एका छोट्याश्या होस्टेलवर राहत होता हा.  एवढं सामान्य कसा राहू शकला हा अभ्या? एवढ्या करोडोच्या संपत्तीचा मालक असूनसुद्धा एका दमडीचा घमेंड नाही साल्याला. त्याने कधी जाणवू देखील नाही दिला कि तो इतका श्रीमंत आहे ते. कधीच नाही. कॉलेजमध्ये पण स्कॉलरशिप वर शिकत होता. मनात आलं असतं तर हा तेच कॉलेज विकत घेऊ शकत होता. नव्हे अशे कितीतरी कॉलेज विकत घेऊन पाहिजे तेवढ्या डिग्र्या छापल्या असत्या त्याने. पण नाही. एकदम सामान्य राहिला तो इतके दिवस. माझ्यासारख्या मुलासोबत मैत्री करून मला आपला जिवलग यार करून टाकलं याने. जिंकलस मित्रा.


   दोघे शांत होते. अभय खिडकीच्या बाहेर बघत होता आणि इकडे निखिल आपल्या डोळ्यांत आलेले पाणी पुसत होता. आपण किती नशीबवान म्हणून अभयसारखा मित्र आपल्याला भेटला. त्याची असली श्रीमंती त्याच्या पैशांत नाही तर त्याच्या स्वभावात होती. जरी करोडोंचा मालक असला तरी त्यापेक्षा जास्त मौल्यवान होता अभय.

"अभय, साल्या काय हे?" 

"काय?" अभयने त्याच्याकडे पाहत विचारले.

"एवढं सगळं लपवलंस साल्या माझ्यापासून तू?"

"हम्म. अरे निख्या तुला जर सगळं आधीच सांगितलं असतं तर मला हे सगळं नसतं अनुभवता आलं. आपली मैत्री कधीच झाली नसती जी आता आहे." अभय म्हणाला.

"हो. तरी पण यार. एकदा तरी बोलायचं मला. मी किती काय काय बोललो तुला. काय चुकलं असेल तर माफ कर यार" निखिल भावनाविवश झाला होता.

"अरे निख्या, वेडा आहेस का साल्या तू. अपनी जान है बे तू. आणि तू असं बोलतोय. मैत्रीमध्ये काही नसतं असलं सॉरी वगैरे आणि गरीब श्रीमंत. फक्त असते ती जिवलग मैत्री. परत नको बोलू असलं काही " अभय त्याला समजवत म्हणाला. कारण त्याला माहित होतं कि, निखिलला हे सगळं माहिती पडल्यावर त्याला किती ऑकवर्ड वाटेल ते.

"हम्म." म्हणून निखिल शांत बसला.

          अभय त्याला इतर काही गमतीजमती सांगत होता त्याला. निखिलला एक एक गोष्ट समजत होती अभयबद्दल आणि मधेच बॉबी अंकल पण त्याला दूजोरा देत होते. मध्येच अभय म्हणाला,
"निखिल तुला बिजनेस करायचा आहे ना?"

"हो. का रे?"

"काही नाही. मला पण घेशील का तुझ्या बिजनेस मध्ये?"

"काय चेष्टा करतोय राव गरीबाची. तुला काय गरज रे."

"नाही असंच. सांगेन तुला नंतर काय ते." अभय म्हणाला.

"साल्या आणखी काय काय सांगणार आहेस तू काय महिती?" निखिल विचार करता करता म्हणाला. ते ऐकून अभय हसायला लागला.


     थोड्या वेळाने अभयने बॉबी अंकलला गाडी थांबवायला सांगितली. निखिलने गाडी का थांबवली असं विचारलं असता त्याचं उत्तर त्याला गाडीतून उतरल्यावर मिळालं. कारण अभयने ऋतिकाच्या वाड्याजवळ गाडी थांबवली होती. अभय आणि निखिल वाड्याकडे चालत निघाले.

"व्वा भाई. कॉल कर म्हटलं तर तू डायरेक्ट भेटायलाच आला कि तिला." निखिल म्हणाला.

"हो ना यार. काय करणार. कालपासून फोन ट्राय करतोय. पण उचलत नाहीय. आणि तेवढा वेळही नाहीय ना. म्हणून म्हटलं जाता जाता तिला सांगून जावं "

अभय आणि निखिल वाड्याजवळ पोचले. पण कोणी दिसत नव्हते तिकडे. त्यादिवशी सारखी माणसांची गर्दी पण नव्हती. एखाददुसरा दिसत होता. दाराजवळ पोचल्यावर अण्णा दिसले तिथेच खुर्चीवर बसलेले. पण ऋतिका कुठे दिसत नव्हती.
"नमस्कार अण्णा" अभयने त्यांना  नमस्कार केला.

"नमस्कार नमस्कार. कोण हवंय तुम्हाला." अण्णांनी अनोळख्या नजरेने पाहत त्यांना विचारले.

"अण्णा आम्ही. तुम्ही ओळखलं नाही का आम्हाला"

"नाही बाबा. कोण तुम्ही. नाही आठवत कोण ते?" अण्णांनी परत विचारले.

"आम्ही नाही का ते बाईकचा अपघात झालेला आमच्या आणि तुम्ही आम्हाला मदत केली होती. परत आम्हाला तुमच्या मुलीने मलमपट्टी केली होती. आम्ही थांबलो होतो थोडावेळ इकडेच." निखिल पुढे येऊन म्हणाला.

" हा हा आठवलं, ते दोघे तुम्ही आहेत होय. बसा बसा. ओळखलंच नाही तूम्हाला मी. खूप दिवसांनी बघितलं म्हणून पटकन लक्षात नाही आलं. बरे आहात ना आता " अण्णांनी शेवटी ओळख दिली. नाहीतर निखिलला अवघड वाटत होतं आता.

"हो. बरे आहोत आम्ही. तुम्ही कसे आहात?"

"हो एकदम मजेत. तुम्ही लोक इकडे कसं अचानक. काय परत गाडी कुठे ठोकली तर नाय ना?' अण्णांनी एकदम विचारलं.

"नाही नाही अण्णा. आम्ही इथूनच जात होतो. तेव्हा आठवलं आम्हाला. म्हणून म्हटलं आम्हाला मदत करणाऱ्या माणसांना परत एकदा भेटावं म्हणून. परत भेट होईल न होईल"

" हो. चांगलंय. आजकाल लोकं  त्यांना मदत केलेल्याना विसरतात लगेच. पण तुम्ही लक्षात ठेवलं ह्यातच सगळं आलं. " अण्णांना ऐकून बरं वाटलं.

"हो अण्णा." अभय म्हणाला.

"बसा थोडं. ऋतू येईलच इतक्यात. कॉलेज ला गेलीय. मग चहा वगैरे घेऊन जा तुम्ही."

"नको नको अण्णा. निघतो आम्ही. उशीर होतोय आम्हाला" निखिल मध्येच म्हणाला.

"अरे असं कसं नको. पाहुणचार न घेता कसं जाणार तुम्ही. लांब जायचं असेल तुम्हाला. चहा घेऊनच जा तुम्ही. बसा गुमान." अण्णा म्हणाले.

                               
           थोडावेळ बसले ते इकडच्या तिकडच्या गप्पा मारत. तेवढ्यात अभयला तेच जाणवू लागलं. हृदय जोरजोरात धडधडू लागलं. मन अस्वस्थ झालं. त्याने लगेच ओळखलं कि ऋतिका आलीय ते. आज एवढ्या दिवसानी त्याने असं धडधडणं अनुभवलं होतं. त्याने मागे वळून पाहिलं तर ऋतिका थेट अभयच्याच नजरेला नजर भिडवत हळुवार पाऊले टाकत येत होती. तिचं ते तसं येणं पाहून अभय आपसूकच उठून उभा राहिला. ऋतिकाच्या डोळ्यांत हरवून जायचा योग बऱ्याच दिवसांनी आला होता. अभय असा गमावणार नव्हता तो. अभय आणि ऋतिकाचा नजरेनेच संवाद चालू होता. ती त्याला नजरेनेच एवढे दिवसाच्या विरहाचं कारण विचारत होती तर अभय तिला नजरेनेच प्रतिउत्तर करत होता. दोघे एकमेकांच्या नजरेत खोलवर बुडाले होते. तोपर्यंत निखिलने  इकडे अण्णांना आपल्या बोलण्यात गुंतवून ठेवले होते.

   "आलीस तू ऋतू." अण्णांच्या आवाजाने ऋतिका भानावर आली. अभयपण बाजूला झाला.

"हो अण्णा."

"हे बघ, ह्यांना ओळखतेस का तू." अण्णांनी विचारले.

"हो हो अण्णा. चांगलंच ओळखते ह्यांना तर मी" ऋतिकाने तिखटपणे उत्तर दिले. तिला राग आला आहे आपला हे तिच्या बोलण्यावरून अभयला जाणवलं.  तसा तो डोकं खाजवत इकडे तिकडे बघू लागला.  ऋतिका तशीच अभयला धक्का मारून निघून गेली. ते चहा घेऊनच बाहेर आली. सगळयांना चहा देऊन ती परत आत गेली. चहा पिऊन झाल्यावर ते असेच गप्पा मारत बसले होते. गप्पा मारत असतानाच मधेच निखिल अण्णांना बाहेर वाडा बघण्याच्या बहाण्याने घेऊन गेला. जेणेकरून अभय आणि ऋतिकाला प्रायव्हसी मिळेल. ते दोघे बाहेर गेले तसा अभय ऋतिकाला शोधू लागला. पण त्याला जास्त शोधाशोध करायची गरज नाही पडली. कारण ती तिथेच पडद्याआड उभी होती आणि तिनेच नजरेने निखिलला अण्णांना बाहेर घेऊन याला सांगितले होते.

       ऋतिका बाहेर आली तशी ती अभयवर तुटून पडली.
"मूर्खा, नालायक , बिनडोक तुला काही अक्कल वगैरे आहे कि नाही. किती छळशील अजून मला. किती दिवस वाट पाहायची तुझ्या फोनची. तुला एक साधा फोन पण करता येत नाही का नालायका?'

"अरे हो हो श्वास तरी घे कि, का सगळं शिव्यांचा स्टॉक  संपल्यावर शांत होणारेस." अभय तिला कसंतरी थांबवत म्हणाला.

"नाही होणार मी शांत. का होऊ?"

"मी म्हणतोय म्हणून"

"तू फोन का केला नाहीस एवढे दिवस मला ते सांग आधी."

"केलेला मी काल. पण तूच उचलला नाहीस. मग काय करू मी. म्हणून आज डायरेक्ट आलो तुला भेटायला." अभय पटकन म्हणाला. तसा तिचा राग मावळला.

"एवढ्या हक्काने भांडतेयस माझ्याशी?" अभयने सरळ प्रश्न केला.

"हो भांडणार मी, आहे माझा हक्..." बोलता बोलता ऋतिका मध्येच थांबली. काय होतंय आपल्याला आणि आपण काय बोलतोय हेच तिला कळलं नाही. आणि कळलं तेव्हा ती गोड लाजली. तिला तसं लाजताना पाहून अभय खल्लास.

"एवढ्याश्या ओळखीत एवढा हक्क. वा क्या बात है!" अभय म्हणाला.

"हो मग मैत्री मध्ये हक्क दाखवू शकतो ना आपण ?"

"हो. दाखवू शकतो ना. पण हा हक्क मैत्रीचा नाहीय. त्याहीपलीकडला आहे." अभय म्हणला.

"तुला काय माहित?"

"नाही माहित मला. पण जाणवतोय मला तुझ्यात. तुझ्या नजरेत. तुझ्या वागण्यात. तुझ्या बोलण्यात. तुझी माझी एवढ्या अनामिक ओढीने वाट पाहण्यात. माझ्याशी एवढं हक्काने भांडण्यात. सगळ्यांतच."

            ऋतिका ह्यावर काहीच बोलली नाही. फक्त लाल झालेल्या नाकाने अभयकडे बघत होती. तिला तसं बघून अभय हसू लागला तशी ती वरमली. त्याला मारायला त्याच्या अंगावर धावली. अभय बाजूला झाली आणि पाय अडकून पडणार तेवढ्यात अभयने तिचा हात पकडला आणि तिला सावरलं. त्याच्या हातातला हात पाहून ती लाजून आणखीनच लाल झाली. अण्णा कधीही येतील म्हणून तिने पटकन आपला हात सोडवून घेतला. आणि त्याच्या समोर मान खाली खालून उभी राहिली. अभयच्या खूप मनात येत होतं कि तिला आपल्या मिठीत घ्यावं, पण आता ती वेळ नव्हती. निखिल आणि अण्णा कधीही येऊ शकत होते.

"खरंय ना?" अभयने विचारलं.

"काय?" ऋतिका म्हणाली.

"तुझ्या मनातलं." अभय.

"तू ओळखलंस?" ऋतिका.

"जाणवलं मला ते" अभय.

"समजलं तुला " ऋतिका.

"उमजलं मला " अभय.

"काय आहे हे" ऋतिका.

"एक अनामिक ओढ" अभय.

"तुलाही आहे" ऋतिका.

" हो तुझ्याकडेच " अभय.

"ओळखीचं आहे" ऋतिका.

"अनोळखी वाटत नाही"  अभय.

"तुझ्यासाठीच आहे रे" ऋतिका .

"तुझ्याकडेच आहे" अभय

                   शब्दांचं युद्ध चालू होतं. आपल्यामध्ये जे काही होतं ते दोघेही जाणून घ्यायचा प्रयत्न करत होते. ओळखीच्या वाटत असलेल्या अनोळखी नात्याला दोघेही समजून घेत होते. खूप काही होतं पण नव्हतंही तेवढंच. या एवढ्याश्या भेटीत कितीसा गुंता सुटणार होता.

                    तेवढ्यात निखिल आणि अण्णा सुद्धा आले. पण त्यांना येताना बघून ऋतिका आधीच आत गेली होती आणि अभय तिथेच उभा होता. ते दोघे आत आल्यावर परत जाण्याची चर्चा चालू झाली.  दोघे जण त्यांचा निरोप घेऊन चालू लागले . तशी ऋतिका तिथे आली. तिच्या नजरेत जे काही होतं ते अभयला खूप अस्वस्थ करून गेलं. ह्या सगळ्याचा लवकर शेवट करायचा ठरवून अभय तिथून निघाला.

                   जाताना त्याने मागे वळून नाही पाहिलं कारण तिच्या नजरेतला तो अनामिकपणा त्याला तिच्याकडे खेचू पाहत होता. आणि आता ह्यावेळेस तरी ते शक्य नव्हतं. नेहमीसारखी याहीवेळेस भेट अर्धवट राहून गेली होती त्यांची. पण ती लवकरच पूर्ण होण्यासाठी. कारण अशा कित्येकी अर्धवट राहिलेल्या भेटीच शेवटी पूर्ण भेट घडवून आणतात. त्या अर्धवट राहिलेल्या भेटींची ती ओढच ते काम करत असते. 

To be continued in Part 5....